न्यूझीलंड क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ६ वर्ष न्यूझीलंडच्या संघासोबत काम केल्यानंतर हेसन यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. गुरूवारी ऑकलंडमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली.

कुटुंबियांसोबत वेळ घालवता यावा यासाठी हेसन यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. सध्यातरी कोणत्याही अन्य संघासोबत काम करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. आता मला माझ्या कामात १०० टक्के योगदान देता येणार नाही. माझ्या कामासोबत मी आता न्याय करु शकत नाही, पत्नी आणि मुलीसोबत वेळ घालवण्याची इच्छ असल्याचं हेसन यांनी सांगितलं.

पुढील वर्षी होणाऱ्या विश्व चषकापर्यंत हेसन यांनी संघासोबत कायम राहावं यासाठी न्यूझीलंड क्रिकेट मंडळाकडून प्रयत्न करण्यात आले, पण हेसन यांनी त्यास नकार दिला, न्यूझीलंड क्रिकेट मंडळानेही त्यांच्या निर्णयाचा आदर राखण्याचा निर्णय घेतला. क्रिकेट मंडळाकडून मला नेहमीच पूर्ण समर्थन आणि सहकार्य मिळालं. माझं काम करताना मला संपूर्ण स्वातंत्र्य मिळालं होतं, यासाठी मी त्यांचा आभारी आहे. असं हेसन म्हणाले.

वर्ल्ड कप सुरू होण्याच्या १० महिने आधी हेसन यांनी राजीनामा दिल्याने न्यूझीलंड क्रिकेट मंडळाला नवीन प्रशीक्षक शोधण्यासाठई पुरेसा वेळ मिळणार आहे.