दिमाखदार सांघिक प्रदर्शनाच्या बळावर मुंबईने मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत सेनादलावर विजय मिळवला.
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भेदक गोलंदाजी करताना सेनादलाला १२७ धावांत गुंडाळत त्यांनी हा निर्णय सार्थ ठरवला. यशपाल सिंगने ४० धावांची खेळी केली. रजत पालीवालने २६ धावा करत त्याला चांगली साथ दिली. मुंबईकडून शार्दूल ठाकूर आणि रोहन राजे यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. धवल कुलकर्णी, अभिषेक नायर आणि प्रवीण तांबे यांनी प्रत्येकी एक बळी घेत चांगली साथ दिली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबईतर्फे अखिल हेरवाडकर आणि श्रेयस अय्यर यांनी ३६ धावांची सलामी दिली. श्रेयस १७ धावांवर बाद झाला. यानंतर अखिलला आदित्य तरेची साथ मिळाली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४२ धावा जोडल्या. अखिलने ३ चौकार आणि एका षटकारासह ३३ चेंडूत ३९ धावांची खेळी केली. आदित्य तरे आणि सिद्धेश लाड जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी करत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आदित्यने ५ चौकारांसह ४२ चेंडूत ४९ तर सिद्धेशने १९ चेंडूत २० धावांची खेळी केली. विजयासह मुंबईने ४ गुणांची कमाई केली.
संक्षिप्त धावफलक
सेनादल : २० षटकांत ७ बाद १२७ (यशपाल सिंग ४०, रजत पलीवाल २६, शार्दूल ठाकूर २/१७) पराभूत विरुद्ध मुंबई : १८.१ षटकांत २ बाद १२८ (आदित्य तरे नाबाद ४९, अखिल हेरवाडकर ३९, रजत पालीवाल १/१५)