मागील विश्वचषकाप्रसंगी ‘वाका, वाका’च्या सुरावटींवर अख्ख्या जगाला ठेका धरायला लावणारी पॉपस्टार शकिरा सलग तिसऱ्या विश्वचषकात आपली अदाकारी पेश करणार आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना १३ जुलैला रिओ दी जानिरो येथे होणार आहे. या सामन्याआधी होणाऱ्या समारोप कार्यक्रमात शकिरा ‘ला ला ला (ब्राझील २०१४)’ हे गाणे ब्राझिलियन गायक कार्लिन्होस ब्राऊन याच्यासोबत सादर करणार आहे. याशिवाय गीटार वादक कार्लोस सांताना आणि ‘रॅप’ संगीत गायिका विक्लीफ जीन हेसुद्धा या कार्यक्रमात सादरीकरण करणार आहेत, अशी माहिती फिफाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
मॅराकाना स्टेडियमवर होणाऱ्या या कार्यक्रमात सांताना, विक्लेफ आणि ब्राझीलचा गायक अ‍ॅलेक्झांडर पिरेस हे तिघेजण विश्वचषक स्पध्रेचे अधिकृत गाणे ‘डार उम जीतो..’ सादर करतील. पीरेस हा इव्हेटो सांगालोसोबत ब्राझीलचे स्थानिक गाणेही या वेळी सादर करणार आहे.
‘‘ला ला ला हे माझे गाणे मला विश्वचषकाच्या समारोप कार्यक्रमात सादर करायची संधी मिळते आहे, ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. फुटबॉल या खेळाशी अनेक कारणांनी माझे ऋणानुबंधाचे नाते आहे. त्यामुळे माझ्यासहित अनेक व्यक्तींच्या आयुष्यात फुटबॉलचे काय स्थान आहे, हे मला खऱ्या अर्थाने ठाऊक आहे,’’ असे शकिराने सांगितले.