भारताचा अनुभवी नेमबाज नरेश कुमार शर्माने रिओ येथे पुढील वर्षी होणाऱ्या पॅराऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची पात्रता पूर्ण केली आहे.
अमेरिकेतील फोर्ट बेनिंग येथे झालेल्या पॅरा खेळाडूंच्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत त्याने ५० मीटर रायफल प्रकारात १२वे स्थान मिळविले. त्याला पाचव्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळणार आहे. यापूर्वी त्याने २००४ची ऑलिम्पिक वगळता १९९६पासून आतापर्यंत सर्व ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आहे. २००८ मध्ये बीजिंग येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये त्याला पाचवे स्थान मिळाले होते. ही
त्याची आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
ऑलिम्पिक पात्रता पूर्ण केल्याबद्दल नरेश कुमार म्हणाला, ‘‘ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे, हा माझ्यासाठी अतिशय अभिमानास्पद क्षण आहे. मात्र माझी पात्रता पूर्ण झाल्याबद्दल आमच्या महासंघाच्या एकाही पदाधिकाऱ्याकडून मला अभिनंदनाचा दूरध्वनी आलेला नाही. पात्रता निकष पूर्ण करण्यासाठी गेले दोन वर्षे मी झगडत होतो. परदेशातील स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी मला प्रायोजक मिळाले नाहीत. त्यातच आमच्या महासंघावर बडतर्फीची कारवाई झाल्यामुळे मला खूपच समस्यांना तोंड द्यावे लागले. तथापि, मला भारतीय क्रीडा प्राधिकरण व क्रीडा मंत्रालय यांचे चांगले सहकार्य लाभले. त्यामुळेच मी हे यश मिळवू शकलो.’’