रांची : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तीनही कसोटी सामन्यांत खेळपट्टी या फिरकी गोलंदाजांनाच मदत करणाऱ्या होत्या. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना अतिरिक्त मेहनत घ्यावी लागत होती. पण, यानंतरही महत्त्वाच्या क्षणी भारतीय वेगवान गोलंदाजांनी केलेली कामगिरी हीच खऱ्या अर्थाने निर्णायक होती, असे भारतीय फलंदाज शुभमन गिलने सांगितले.

तीन सामन्यांत आतापर्यंत अश्विन (११), रवींद्र जडेजा (१२), कुलदीप यादव (८) आणि अक्षर पटेल (५) यांनी एकत्रित ३६ गडी बाद केले आहेत. वेगवान गोलंदाजांनी २२ गडी बाद केले आहेत. हे आकडे फिरकी गोलंदाज आणि गोलंदाजीची ताकद दाखवून देत असले, तरी ते फक्त आकडे आहेत. वेगवान गोलंदाजांनी परिस्थितीनुसार गोलंदाजी करून भारतीय संघाचे पाऊल पुढे ठेवले, असे गिल म्हणाला.

हेही वाचा >>> लोकप्रिय मॉडेलची आत्महत्या, शेवटच्या कॉलमुळे IPL मधला प्रसिद्ध खेळाडू अडचणीत

चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ रांची येथे दाखल झाल्यावर पहिल्या सराव सत्रानंतर पत्रकार परिषदेत बोलताना गिलने फिरकी आणि वेगवान गोलंदाजीची तुलना केली. ‘‘जेव्हा आपण भारतात खेळतो तेव्हा खेळपट्टी फिरकीला साथ देणार हे निश्चित असते. अश्विन, जडेजा गडी बाद करणारच. पण, अशा खेळपट्टीवर भारताच्या वेगवान गोलंदाजांनी आपली छाप पाडली हे विसरून चालणार नाही. त्यांच्या गोलंदाजीमुळे नक्कीच फरक पडला,’’असे गिलने सांगितले.

‘‘चौथ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराला विश्रांती देण्यात आली असली, तरी अन्य गोलंदाज कामगिरी उंचावण्यात सक्षम आहेत. मोहम्मद सिराज जबाबदारी घेण्यात सक्षम आहे. राजकोटमध्ये त्याने चार गडी बाद केले होते. विशेषत: भारतीय हवामानात गोलंदाजी करण्याचा अनुभव त्यालाही आहे,’’असेही गिल म्हणाला.

‘‘विराट नसल्याचा फायदा उदयोन्मुख फलंदाजांना त्यांची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी झाला. पण, ही मिळालेली संधी त्यांच्याबरोबर फार काळ राहणार नाही, ही कल्पना देखील त्यांना होती. त्यामुळे प्रत्येक संधीचे सोने कसे करता येईल हा विचार नवोदित खेळाडूंनी केला. यशस्वीने तर ही संधी जणू दोन्ही हाताने साधली असे म्हणता येईल. लागोपाठच्या सामन्यात द्विशतक झळकावणे सोपे नसते. तो खरच गुणी फलंदाज आहे,’’असे गिलने सांगितले. यशस्वीने विशाखापट्टणम व राजकोट कसोटीत द्विशतक झळकावत आपली छाप पाडली. त्यामुळे रांची येथील सामन्यातूनही त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

स्वत:बद्दलच्या अपेक्षा पूर्ण न झाल्याने निराशा

स्वत:बद्दलच्या अपेक्षा वाढवल्यामुळेच मला निराशेचा सामना करावा लागत आहे, असे गिलने सांगितले. ‘‘जेव्हा बाहेरून लोक बोलत असतात तेव्हा काही फरक पडत नाही. पण, जेव्हा आपण स्वत:च आपल्याबद्दलच्या अपेक्षा उंचावतो तेव्हा त्याचा सामना करणे कठीण असते. माझ्याबाबतीत असेच काहीसे झाल्यामुळे मी निराश आहे. सलामीला खेळणे आणि मधल्या फळीत खेळणे यात वेगळी जबाबदारी आहे. त्यासाठी तुम्हाला मानसिकतेतही काहीसा बदल करावा लागतो. सलामीला खेळता तेव्हा तुम्हाला डावाचा पाया रचायचा असतो. विचार करण्यासाठी तुम्हाला फार वेळही मिळत नाही. मधल्या फळीत खेळताना परिस्थितीनुसार फलंदाजी करणे अनिवार्य असते,’’असे गिल म्हणाला.

विराट आणि बुमरा यांच्यासारखे प्रमुख खेळाडू खेळत नसताना संघातील युवा खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची पूर्ण संधी असते. सर्फराजने हे सिद्ध करून दाखवले.

शुभमन गिलभारतीय फलंदाज