ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेतेपदाबद्दल प्रशिक्षक गोपीचंद यांना आशा

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यात मी घडवलेल्या तीन आघाडीच्या बॅडमिंटनपटूंपैकी किमान एक जण तरी यशस्वी ठरेल, असा विश्वास भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केला. १८ वर्षांपूर्वी ऑल इंग्लंड स्पर्धेचे विजेतेपद गोपीचंद यांनी मिळवल्यानंतर एकाही भारतीय खेळाडूला त्या स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवता आलेले नाही.

‘‘यंदाच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत किमान एक भारतीय बॅडमिंटनपटू विजेतेपद मिळवेल, अशी मला आशा वाटते. भारताची सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत हे तिघेही अत्यंत चांगल्या लयीत खेळत असून हे तिघेही ऑल इंग्लंडचे संभाव्य दावेदार आहेत,’’ असे गोपीचंदने सांगितले.

‘‘सायनाने नुकतेच इंडोनेशियनचे विजेतेपद मिळवले असून सिंधूदेखील बहरात खेळत आहे. त्या दोघीही महिलांच्या गटात चांगली कामगिरी करतील. तसेच पुरुषांच्या गटात श्रीकांतसह अन्य काही खेळाडूदेखील चांगली कामगिरी करून यंदा विजेतेपद खेचून आणतील. त्यामुळे तब्बल १८ वर्षांपासून न सुटलेले हे कोडे यंदा सुटू शकेल, असा मला विश्वास वाटतो. श्रीकांतने अनेकदा अफलातून खेळ करीत त्याच्या गुणवत्तेचे दर्शन घडवले आहे. त्यामुळे यंदा पुरुष गटात श्रीकांतकडून अधिक अपेक्षा आहे,’’ असे गोपीचंद यांनी नमूद केले.  श्रीकांतने २०१७ या वर्षांत चार सुपर सीरिज स्पर्धा जिंकल्यानंतर गतवर्षी एकही विजेतेपद त्याला मिळवता आले नव्हते. मात्र यंदा तो पुन्हा लयीत असून दमदार कामगिरीसह पुनरागमन करील, असा विश्वास गोपीचंद यांना आहे.

प्रतिष्ठेची स्पर्धा

सुपर सीरिज दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धापैकी ऑल इंग्लंड बॅडमिंटन ही सर्वाधिक प्रतिष्ठेची गणली जाते. भारताच्या प्रकाश पादुकोण यांनी १९८०मध्ये ऑल इंग्लंडचे विजेतेपद मिळवले होते. अशी कामगिरी करणारे ते पहिले भारतीय बॅडमिंटनपटू होते. त्यानंतर तब्बल २१ वर्षांनी २००१मध्ये गोपीचंद यांनी या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. दुसऱ्या अजिंक्यपदासाठी दोन दशकांहून अधिक काळ गेला होता. त्यामुळे निदान या वेळी त्यापेक्षा कमी काळात तिसरे यश मिळावे, अशी भारतीय बॅडमिंटनप्रेमींची अपेक्षा आहे.