विदर्भविरुद्ध निर्णायक विजय मिळविण्यात तामिळनाडूला यश मिळाले नाही. मात्र पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर त्यांनी रणजी क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. त्यांना कोलकाता येथे २५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्राशी खेळावे लागणार आहे.
तामिळनाडूला निर्णायक विजय साधता येणार की नाही हीच शेवटच्या दिवसाची उत्सुकता होती. त्यांनी ६ बाद १९३ धावांवर दुसरा डाव पुढे सुरू केला. त्यांनी उर्वरित चार गडय़ांच्या मोबदल्यात ७३ धावांची भर घातली व विदर्भपुढे विजयासाठी ४११ धावांचे आव्हान ठेवले.
विदर्भने दुसऱ्या डावात ८ बाद १४२ धावा करीत सामना अनिर्णीत ठेवण्यात यश मिळविले. त्यांच्या गणेश सतीश याने झुंजार खेळ करीत नाबाद ५९ धावा केल्या.
मधल्या फळीत शलभ श्रीवास्तव (३३) व राकेश ध्रुव (२२) यांनी संघाचा पराभव टाळण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.
 तामिळनाडूने गुरुवारच्याच धावांवर डाव घोषित केला असता तर कदाचित त्यांना निर्णायक विजय मिळविता आला असता.
संक्षिप्त धावफलक
तामिळनाडू : ४०३ व २६६ (दिनेश कार्तिक ६४,
विजय शंकर ८२, बाबा इंद्रजित ४९, एम.रंगराजन ३२; स्वप्नील बंदीवार
३/४२, रवीकुमार ठाकूर २/६२, राकेश ध्रुव २/८८)
विदर्भ : २५९ व ४९ षटकांत ८ बाद १४२ (गणेश सतीश नाबाद ५९, शलभ
श्रीवास्तव ३३, राकेश ध्रुव २२; बाबा अपराजित ३/४१, पी.परमेश्वरन २/२६)