टेनिसमध्ये उत्तेजक चाचणीत फारसे कोणी दोषी आढळणार नाही, मात्र क्रीडा क्षेत्राची स्वच्छ प्रतिमा राखण्यासाठी जागतिक स्तरावर उत्तेजक चाचणी नियमित घेतली जावी, असे अव्वल टेनिसपटू रॉजर फेडररने सांगितले.
फेडररने कारकीर्दीत आतापर्यंत सतरा ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपदे मिळविली आहेत. तो म्हणाला, ‘‘मी जेव्हा मायदेशात असतो तेव्हा मी स्वत:हून उत्तेजक चाचणी करून घेत असतो. त्यामध्ये मला कोणताही कमीपणा वाटत नाही. गेली दहा वर्षे मी दुबईत खेळत आहे, मात्र केवळ एकदाच माझी तेथे चाचणी घेण्यात आली आहे. मला ते योग्य वाटत नाही. त्यामुळेच मी तेथील स्पर्धेला येण्यापूर्वी उत्तेजक चाचणी करून घेत असतो. गेल्या काही वर्षांमध्ये टेनिसमध्ये खूप सुधारणा झाल्या आहेत. खेळाडूही अधिकाधिक व्यावसायिक होत चालले आहेत.’’

 

शारापोवाचे वृत्त खेदजनक
‘‘मारिया शारापोव्हासारखी श्रेष्ठ खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी आढळली हे अतिशय खेदजनक वृत्त आहे. जेव्हा तिच्या पत्रकार परिषदेचे वृत्त दाखविले गेले, त्या वेळी ती निवृत्त होण्याचे जाहीर करीत आहे असेच मला वाटले होते, मात्र आपण उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याची कबुली तिने दिल्याचे वृत्त मी पाहिले तेव्हा सुरुवातीला माझा विश्वासच बसला नाही. तिने उत्तेजकाच्या यादीबाबत अद्ययावत माहिती घेतली नव्हती व त्यामुळे ती दोषी आढळली हे जरी खरे असले तरी आपण कोणती औषधे घेतो याची माहिती आपल्या वैद्यकीय सल्लागारांना दिली पाहिजे. काही खेळाडू उत्तेजकाच्या तावडीतून सुटतात, हे जरी सत्य असले तरी काही वेळा हे खेळाडू अडचणीत येऊ शकतात, असे फेडरर म्हणाला.‘‘पारितोषिकांच्या रकमेबाबत पुरुष व महिला खेळाडू यांच्यात तफावत करणे चुकीचे आहे. मी जेव्हा पारितोषिकांच्या रकमेत वाढ व्हावी यासाठी आग्रह धरत असतो, तेव्हा मी दोन्ही गटांतील खेळाडूंना समान रक्कम दिली जावी याच मताचा मी पुरस्कार करीत असतो. महिला खेळाडूही खूप कष्ट घेत असतात. त्यांच्याकडेही गुणवत्ता आहे,’’ असेही फेडरर याने सांगितले.