नवीन वर्षांत नव्या उमेदीने खेळायला सज्ज झालेल्या ‘इंडो-पाक एक्स्प्रेस’ रोहन बोपण्णा आणि ऐसाम कुरेशी यांना सिडनी आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पण आतापर्यंतची त्यांची कारकीर्द पाहता त्यांच्यासाठी हा शिकण्यासाठी नक्कीच मोठा अनुभव असेल. या स्पर्धेनंतर होणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेसाठी त्यांच्यासाठी हा अनुभव नक्कीच महत्त्वाचा ठरेल. अंतिम फेरीत बोपण्णा-कुरेशी जोडीवर डॅनियल नेस्टोर आणि नेनाद झिमोनिजक यांनी मात करत जेतेपद पटकावले.
दुसऱ्या मानांकित बोपण्णा-कुरेशी जोडीला अटीतटीच्या अंतिम लढतीमध्ये नेस्टोर-झिमोनिजक या कॅनडा आणि सर्बियाच्या बिगरमानांकित पण अनुभवी जोडीने ६-७ (३), ६-७ (३) असे पराभूत करून जेतेपदाला गवसणी घातली.
एक तास आणि ३५ मिनिटे चाललेल्या या घमासान लढतीमध्ये बोपण्णा-कुरेशीने चांगला खेळ केला. त्यांनी आपल्या सव्‍‌र्हिसवर प्रतिस्पध्र्याना जास्त गुण मिळवू दिले नाहीत, पण दुसरीकडे त्यांना प्रसिस्पध्र्याची सव्‍‌र्हिस भेदताही आली नाही. त्यामुळेच ऐन मोक्याच्या क्षणी त्यांच्या हातून काही चुका झाल्या आणि त्याचाच फटका त्यांना
बसला.