मियामी (अमेरिका) : भारताच्या रोहन बोपण्णाने सर्वात वयस्क टेनिसपटू म्हणून व्यावसायिक स्पर्धा जिंकण्याची मोहीम मियामीतही कायम राखली. बोपण्णाने आपला ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एब्डेनच्या साथीने मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवले.

अंतिम लढतीत बोपण्णा-एब्डेन जोडीने क्रोएशियाचा इवान डोडिग आणि अमेरिकेचा ऑस्टिन क्राजिसेक या जोडीचे आव्हान ६-७ (३-७), ६-३, १०-६ असे मोडून काढले.

हेही वाचा >>> IPL 2024 DC vs CSK: धोनी तडाख्याची झलक पण मुकेश-खलीलने दिल्लीला तारलं

गतवर्षी बोपण्णाने वयाच्या ४३व्या वर्षी इंडियन वेल्स स्पर्धा जिंकली होती आणि ‘एटीपी मास्टर्स १०००’ मानांकन स्पर्धा जिंकणारा तो सर्वात वयस्क खेळाडू ठरला होता. आता वयाच्या ४४व्या वर्षी त्याने मियामी स्पर्धेत विजेतेपद मिळवताना आपलाच विक्रम मोडीत काढला. याच वर्षी बोपण्णा-एब्डेन जोडीने ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेतही विजेतेपद पटकावले होते.

आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत बोपण्णाने दुहेरीच्या एकूण ६३ अंतिम लढती खेळल्या असून, यात २६ विजेतीपदे मिळवली आहेत. एटीपी मास्टर्स मालिकेतील सर्व नऊ स्पर्धात अंतिम फेरी गाठणारा बोपण्णा हा लिएंडर पेसनंतर दुसरा भारतीय टेनिसपटू ठरला आहे.

क्रमवारीत पुन्हा अव्वल

या वर्षांच्या सुरुवातीला झालेली ऑस्ट्रेलियन खुली ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकताना बोपण्णाने दुहेरीच्या क्रमवारीत अग्रस्थान मिळवले होते. मात्र, पुढील दोन स्पर्धात कामगिरीत सातत्य न राखता आल्याने त्याची दुसऱ्या स्थानी घसरण झाली होती. परंतु मियामी स्पर्धेतील जेतेपदानंतर त्याने अग्रस्थान पुन्हा काबीज केले आहे. विशेष म्हणजे, बोपण्णा आणि एब्डेनचे समान गुण आहेत. त्यामुळे हे दोघे संयुक्तरीत्या अग्रस्थान मिळवणार आहेत.