पीटीआय, नवी दिल्ली

भारताचा कर्णधार रोहित शर्माने आपला इतक्यातच निवृत्ती घेण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच २०२७ मध्ये होणाऱ्या पुढील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळायला आपल्याला आवडेल, असेही ३६ वर्षीय रोहित म्हणाला.

दक्षिण आफ्रिकेत २००७ मध्ये झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघात रोहितचा समावेश होता. मात्र, एकदिवसीय विश्वचषकात तो अद्याप जेतेपदापासून दूर आहे. गेल्या वर्षी मायदेशात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात भारताला जेतेपदाची उत्तम संधी होती. मात्र, अंतिम सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्यात अपयश आल्याने रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यामुळे रोहितला आफ्रिकेत होणाऱ्या पुढील एकदिवसीय विश्वचकात आपले जेतेपदाचे स्वप्न पूर्ण करायला आवडेल.

हेही वाचा >>>कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: फिरुझाकडून गुकेश पराभूत

‘‘मी निवृत्तीचा अद्याप विचारही केलेला नाही. मात्र, आयुष्यात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. सध्या तरी माझ्याकडून चांगली कामगिरी होत आहे. त्यामुळे मी आणखी काही वर्षे खेळत राहण्यास उत्सुक आहे. एकदिवसीय विश्वचषक जिंकणे हे माझे स्वप्न आहे आणि ते पूर्ण करायला मला आवडेल,’’ असे रोहित एका मुलाखतीत म्हणाला.

‘‘एकदिवसीय विश्वचषक हा खरा विश्वचषक आहे असे मी मानतो. एकदिवसीय विश्वचषक पाहतच आम्ही लहानाचे मोठे झालो. त्यामुळे या स्पर्धेबाबत वेगळी आपुलकी आहे. तसेच २०२५ मध्ये लॉर्ड्सवर जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. या सामन्यासाठी आमचा संघ पात्र ठरेल अशी आशा आहे,’’ असेही रोहितने नमूद केले. या वर्षी जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात रोहित भारतीय संघाचे नेतृत्व करणे अपेक्षित आहे.

तो’ पराभव विसरणे अशक्य

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अहमदाबाद येथे झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता. भारतीय संघ सलग १० सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र, जेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने भारताला पूर्णपणे निष्प्रभ केले होते. तो पराभव विसरणे अशक्यच असल्याचे रोहितने नमूद केले. ‘‘विश्वचषक स्पर्धा भारतात होती. आम्ही अंतिम सामन्यापर्यंत खूप चांगले क्रिकेट खेळलो होतो. अशी कोणती एक गोष्ट आहे ज्यामुळे आपण अंतिम सामन्यात पराभूत होऊ शकतो, असा मी उपांत्य फेरीनंतर विचार करत होतो. मला एकही गोष्ट सापडली नाही. मात्र, एखाद दिवशी तुम्हाला सर्वोत्तम कामगिरी करण्यात अपयश येऊ शकते आणि हेच आमच्याबाबतीत अंतिम सामन्यात घडले. तो दिवसच आमचा नव्हता,’’ असेही रोहित म्हणाला.