मोहालीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर ७ गडी राखून मात करत टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कर्णधार विराट कोहलीने नाबाद ७२ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या १५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात आश्वासक झाली होती. सलामीवीर रोहित शर्माने नॉर्ट्जेच्या गोलंदाजीवर लागोपाठ दोन षटकार खेचत आपले इरादे स्पष्ट केले. मात्र रोहितची ही खेळी फारकाळ टिकू शकली नाही. फेलुक्वायोच्या गोलंदाजीवर रोहित पायचीत होऊन माघारी परतला. मात्र या छोटेखानी खेळीतही रोहितने आपल्या नावावर विक्रमाची नोंद केली आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये एकत्रितपणे सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. मोहालीच्या मैदानात दोन षटकार खेचत रोहितने आपल्या षटकारांची संख्या १४ वर नेली आहे. त्याने सुरेश रैनाचा १३ षटकारांचा विक्रम मोडीत काढला. या यादीमध्ये आफ्रिकेचा जे.पी.ड्युमिनी १६ षटकारांसह अव्वल स्थानावर आहे. तर विराट कोहली-महेंद्रसिंह धोनी आणि डेव्हिड मिलर हे फलंदाज सहा षटकारांसह संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत.

आफ्रिकेविरुद्ध मालिकेत रोहित शर्माचं प्रमोशन झालं आहे. टी-२० क्रिकेटसोबतच कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीराची भूमिका रोहीतला मिळाली आहे. त्यामुळे या मालिकेत रोहितच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. दरम्यान रोहित शर्मा झटपट माघारी परतल्यानंतर विराट कोहलीने आधी शिखर धवन आणि त्यानंतर श्रेयस अय्यरच्या साथीने भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.