आत्मचरित्राच्या प्रकाशनापूर्वीच प्रसिद्धी मिळवण्याचा भारताचा माजी महान फलंदाज मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा प्रयत्न यशस्वी ठरल्याचेच चित्र दिसत आहे. सोमवारी सचिनच्या आत्मचरित्रातील भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्या बाबतीतील काही गोष्टी सर्वासमोर आल्या आणि त्याबद्दल चांगलेच चर्वितचर्वण सुरू झाले आहे. सचिनच्या या वक्तव्याने चॅपेल यांना आश्चर्याचा धक्का बसला असून, त्यांनी हे सारे खोडसाळपणाचे असल्याचे म्हटले आहे, तर दुसरीकडे भारतीय संघाचा माजी शैलीदार फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, वेगवान गोलंदाज झहीर खान आणि फिरकीपटू हरभजन सिंग या सहकाऱ्यांनी सचिनपाठोपाठ चॅपेल यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.
२००७ च्या विश्वचषकाच्या महिन्याभरापूर्वी चॅपेल माझ्या घरी आले होते. तेव्हा त्यांनी राहुल द्रविडची कर्णधारपदावरून हकालपट्टी करून तुला कर्णधारपदी नियुक्त करतो आणि आपण दोघे मिळून भारतीय क्रिकेटवर राज्य करू या, असे सचिनने ‘प्लेइंग इट माय वे’ या आत्मचरित्रात म्हटल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताने चॅपेल यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
‘‘मला शाब्दिक युद्धामध्ये पडण्यात काहीही रस नाही. जेव्हा मी भारतीय संघाचा प्रशिक्षक होतो, तेव्हा मी कधीही राहुल द्रविडऐवजी सचिनला कर्णधारपद देण्याबाबत भाष्य केले नाही,’’ असे चॅपेल यांनी आपल्या पत्रकामध्ये म्हटले आहे.
याबाबत त्यांनी पुढे म्हटले आहे की, जेव्हा पुस्तकातील वृत्त माझ्या कानी आले तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला. भारताचा प्रशिक्षक असताना मी फक्त एकदाच सचिनच्या घरी गेलो होतो. त्यावेळी सचिन दुखापतीतून सावरत होता. त्यामुळे त्याची भेट घेण्यासाठी मी सहाय्यक प्रशिक्षक आणि फिजिओ यांच्यासहित गेलो होतो. पुस्तकामध्ये ज्या काळाचा उल्लेख केला आहे, त्याच्या वर्षभरापूर्वी मी सचिनच्या घरी गेलो होतो. त्यामुळे या गोष्टी मला खोडसाळपणाच्या वाटत आहेत.’’
चॅपेल यांनी द्रविडला कर्णधारपदावरून दूर करण्याच्या विचाराबाबत सांगितल्यावर मला धक्का बसल्याचे सचिनने या पुस्तकात म्हटले आहे. पण चॅपेल यांनी याबाबत खुलासा करताना सांगितले की, मी फक्त त्याच्या तब्येतीबाबत चर्चा करण्यासाठी गेलो होतो, त्यावेळी कर्णधारपदाबाबत कोणताच मुद्दा चर्चेत आला नव्हता.
सचिनने आत्मचरित्रामध्ये चॅपेल हे रिंगमास्तर असल्याचे म्हटले होते. ‘‘चॅपेल हे सर्व निर्णय आमच्यावर लादत असत, त्याबाबत कोणतीही चर्चा ते आमच्याशी करत नसत,’’ असे सचिनने म्हटले आहे. याबाबत सहकारी व्ही. व्ही.एस लक्ष्मण, झहीर खान आणि हरभजन सिंग यांनी सचिनच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

जेव्हा पुस्तकातील वृत्त माझ्या कानी आले तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला. भारताचा प्रशिक्षक असताना मी फक्त एकदाच सचिनच्या घरी गेलो होतो. त्यावेळी सचिन दुखापतीतून सावरत होता. त्यामुळे त्याची भेट घेण्यासाठी मी सहाय्यक प्रशिक्षक आणि फिजिओ यांच्यासहित गेलो होतो. पुस्तकामध्ये ज्या काळाचा उल्लेख केला आहे, त्याच्या वर्षभरापूर्वी मी सचिनच्या घरी गेलो होतो. त्यामुळे या गोष्टी मला खोडसाळपणाच्या वाटत आहेत.

59‘‘चॅपेल यांच्या प्रशिक्षकपदाचा काळ भारतीय क्रिकेटसाठी सर्वात वाईट होता. चॅपेल यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्यावर ते एकदा माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की , ‘जोपर्यंत मी भारताचा प्रशिक्षक आहे, तोपर्यंत तू संघात खेळू शकणार नाहीस.’ चॅपेल हे नेहमी त्यांच्या विचारानेच काम करायचे, यामध्ये ते खेळाडूंचा विचार करत नसत. ते त्यांचे विचार खेळाडूंवर लादत असत. त्यांनी माझी कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न केला होता.’’
झहीर खान, भारताचा वेगावान गोलंदाज

60‘‘झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर असताना कर्णधार सौरव गांगुली फलंदाजी करत असताना, त्याचे भलामण करणारा ई-मेल चॅपेल बीसीसीआयला लिहित होते. सामन्याबाबत कोणताही रस चॅपेल यांना नव्हता. याप्रकारची कृत्ये करण्याकडेच त्यांचा कल अधिक होता. सात खेळाडूंना त्यांना संघाबाहेर काढायचे होते. यामध्ये सौरवचे नाव अग्रस्थानी होते, त्यानंतर माझ्यासह वीरेंद्र सेहवाग, आशीष नेहरा, झहीर खान आणि युवराज सिंग यांचाही यामध्ये समावेश होता.’’
हरभजन सिंग, भारताचा फिरकीपटू

61चॅपेल यांच्यामुळे भारतीय क्रिकेटची अधोगती – लक्ष्मण
पीटीआय, नवी दिल्ली
हरभजन सिंग आणि झहीर खान यांच्याबरोबरच भारताचा माजी शैलीदार फलंदाज व्ही.व्ही.एस. लक्ष्मणनेही सचिन तेंडुलकरची पाठराखण करताना माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. चॅपेल यांच्यामुळे भारतीय क्रिकेटची अधोगती झाली, हे सांगत असताना चॅपेल मला घरी बसवायला निघाले होते, असेही सांगितले आहे.
‘‘२००६ मध्ये वानखेडे स्टेडियमवर भारताचा इंग्लंडविरुद्ध सामना होता, त्यानंतर आम्ही वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार होतो. त्यावेळी चॅपेल यांनी मला सलामीला जाण्याबाबत विचारणा केली होती. त्यावर त्यांना मी २००० सालीच सलामीला न खेळण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. त्यावेळी त्यांनी माझे वय विचारले आणि मला म्हणाले की, हे वय घरी बसण्याचे नाही का? त्यांच्या या वक्तव्याने मी अवाक् झालो. कारण त्यांच्या प्रशिक्षकपदाखाली खेळत असताना मी सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर होतो,’’ असे लक्ष्मण म्हणाला.