भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका न झाल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) यांच्या सर्व स्पर्धामध्ये यापुढे भारताशी कोणताही सामना आम्ही खेळणार नाही, असा इशारा देणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरियार खान यांनी मंगळवारी मात्र नरमाईचे धोरण स्वीकारले.
लाहोरमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना शहरियार खान यांनी डिसेंबरमध्ये प्रस्तावित असलेल्या भारत-पाकिस्तान मालिकेसंदर्भात सावध भूमिका प्रकट केली. मी एकटा पुढे कोणते धोरण स्वीकारायचे, हे ठरवू शकत नाही, असे खान यांनी सांगितले.
‘‘भारताने प्रस्तावित मालिकेला नकार दिल्यास आम्ही काय भूमिका घ्यायचे निश्चित करू. परंतु मी वैयक्तिकपणे कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. पंतप्रधान आणि पीसीबीच्या कार्यकारिणी समितीशी सल्लामसलत करून हा निर्णय घेतला जाईल,’’ असे खान यांनी सांगितले.
भारताविरुद्धच्या सामन्यांवर बहिष्काराची धमकी खान यांनी दिल्यानंतर बीसीसीआयचे वरिष्ठ पदाधिकारी राजीव शुक्ला यांनी त्यांना गांभीर्याने इशारा दिला. आयसीसीच्या स्पर्धामध्ये भारताविरुद्ध पाकिस्तान खेळणार नसेल, तर त्यांना आयसीसीच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.
डिसेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्ध मालिका होण्याची शक्यता कमीच आहे. कारण बीसीसीआयला यासाठी केंद्र सरकारच्या हिरव्या कंदीलाची प्रतीक्षा आहे. याचप्रमाणे पीसीबीशी काही प्रकरणांबाबत चर्चा करण्याची आवश्यकता आहे.
पीसीबीने २८ ऑगस्टला बीसीसीआयला पत्र लिहून संयुक्त अरब अमिरातीला प्रस्तावित असलेल्या मालिकेबाबत विचारणा केली होती. मात्र बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी उत्तर पाठवले आहे, असे खान यांनी सांगितले. याबाबत आयसीसीच्या पुढील बैठकीत चर्चा होईल, असे ते म्हणाले.