भारताची महिला ग्रँडमास्टर सौम्या स्वामिनाथन हिने महिलांच्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. ही स्पर्धा अस्ताना (कझाकस्तान) येथे आयोजित करण्यात आली होती. भारताने या स्पर्धेत पाचवे स्थान मिळविले. युक्रेन संघाने विजेतेपद मिळविले तर चीन, रशिया व जॉर्जिया यांना अनुक्रमे दोन ते चार क्रमांक मिळाले. शेवटच्या फेरीत त्यांना चीन संघाकडून १.५-२.५ असा निसटता पराभव स्वीकारावा लागला. त्या वेळी पहिल्या लढतीत ईशा करवडेला चीनच्या जु वेनजिया हिने चिवट झुंजीनंतर हरविले. पद्मिनी राऊतने हुआंग कियान हिच्याविरुद्ध बरोबरी स्वीकारली. मेरी अ‍ॅन गोम्सने तान झोंगयेई हिला बरोबरी रोखले. शेवटच्या लढतीत सौम्यापुढे विद्यमान कनिष्ठ विश्वविजेती गुओ क्वेई हिचे आव्हान होते. फ्रेंच ओपनिंग तंत्राचा उपयोग करीत सौम्याने आपली बाजू वरचढ केली होती, मात्र शेवटच्या चालींमध्ये तिला डाव जिंकण्याची संधी साधता आली नाही व अर्धा गुण स्वीकारावा लागला.