डेक्कन जिमखानातर्फे शुक्रवारपासून राज्यस्तरीय जलतरण व  वॉटरपोलो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत मुंबई, ठाणे, रायगड, कोल्हापूर, चंद्रपूर, अमरावती, अहमदनगर, नाशिक, पुणे आदी ठिकाणचे ४२५ हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. डेक्कन जिमखानाचे स्पर्धा सचिव शौर्य करंदीकर व जलतरण विभाग सचिव सोनल दीक्षित यांनी याबाबत सांगितले की, ही स्पर्धा टिळक तलावावर होणार आहे. दररोज सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेत ही स्पर्धा होईल. वॉटरपोलोमध्ये मुंबईच्या पी. एम. हिंदू बाथ क्लबसह सहा संघांनी भाग घेतला आहे. वॉटरपोलोचे सामने दुपारच्या सत्रात घेतले जातील तर जलतरणाच्या शर्यती सकाळच्या सत्रात होतील. जलतरणाकरिता ७, ९, ११, १३, १५, १७ वर्षांखालील मुले व मुली, पुरुष, महिला, मास्टर्स (४० ते ६० वर्षे तसेच ६० वर्षांवरील) असे गट ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेसाठी दीड लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये अक्षयकुमार कुंडू, अर्जुन कावळे, विराज परदेशी, कुणाल वणकुद्रे यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंचा समावेश आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेने होणार आहे.