ICC Men’s T20I Team of the Year for 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) २०२३ चा सर्वोत्कृष्ट टी-२० संघ जाहीर केला आहे. भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. त्याच्याशिवाय इतर तीन भारतीय खेळाडूंना वर्षातील सर्वोत्तम संघात स्थान मिळाले आहे. या संघात सूर्यकुमार व्यतिरिक्त यशस्वी जैस्वाल, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या आयसीसी संघात भारताचे चार, झिम्बाब्वेचे दोन, इंग्लंडचा एक, वेस्ट इंडिजचा एक, आयर्लंडचा एक आणि न्यूझीलंडच्या एका खेळाडूचा समावेश आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आयसीसीने २०२३ च्या सर्वोत्कृष्ट टी-२० संघात युगांडाच्या एका खेळाडूची देखील निवड केली आहे. त्याचवेळी आयसीसीने आपल्या सर्वोत्तम टी-२० संघात पाकिस्तानच्या एकाही खेळाडूची निवड केलेली नाही.

फलंदाजीच्या क्रमवारीत सर्वोच्च स्थानावर सूर्यकुमार आणि यशस्वी या भारतीय जोडीला पहिली पसंती होती, तर इंग्लंडचा फिल सॉल्ट तिसऱ्या क्रमांकावर आला. जैस्वालने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारताकडून पदार्पण केले आणि २०२३ मध्ये १५९ च्या स्ट्राइक रेटने १४ डावात ४३० धावा केल्या. दुसरीकडे, सॉल्टने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत ३३१ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – IPL 2024 : आयपीएलचा यंदाचा हंगाम कधी सुरू होणार? बीसीसीआयच्या योजनेचा झाला खुलासा

वेस्ट इंडिजचा यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरन चौथ्या स्थानावर आहे, तर न्यूझीलंडचा मार्क चॅपमन संघात पाचव्या स्थानावर आहे. झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा सहाव्या स्थानावर आहे. युगांडाचा अल्पेश रामजानी आणि आयर्लंडचा मार्क अडायर ही कदाचित दोन नावे आहेत ज्यांचा संघात समावेश होण्याची अनेकांना अपेक्षा नव्हती.

झिम्बाब्वेचा रिचर्ड नगारावा आणि भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगसह फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईचा गोलंदाजीत समावेश करण्यात आला आहे. अर्शदीपने गेल्या वर्षी भारतासाठी २१ सामन्यांत २६ विकेट्स घेतल्या, तर बिश्नोईने संपूर्ण वर्षात केवळ ४४ षटके टाकत १८ विकेट्स घेतल्या. नगारावाने १५ सामन्यात २६ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – IND vs ENG : टीम इंडियाला मोठा धक्का! इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून विराट कोहली बाहेर

आयसीसीचा २०२३ मधील सर्वोत्तम टी-२० संघ:

यशस्वी जैस्वाल, फिल सॉल्ट, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), मार्क चॅपमन, सिकंदर रझा, अल्पेश रामजानी, मार्क अडायर, रवी बिश्नोई, रिचर्ड नगारावा आणि अर्शदीप सिंग.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suryakumar yadav has been named captain by icc mens t20i team of the year for 2023 vbm
Show comments