भारतात सुमारे वर्षभरानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले जात आहे. इंग्लंडविरूद्ध भारतीय संघ चार सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेच्या माध्यमातून अंदाजे वर्षभराने कर्णधार विराट कोहली आणि स्टार खेळाडू रोहित शर्मा एकत्र भारतासाठी खेळताना दिसत आहेत. त्यामुळे या दोघांपैकी सर्वोत्तम कोण? याची पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरू झाली आहे. ‘रणजी किंग’ वासिम जाफर याला नुकताच यासंबंधी एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने जे उत्तर दिलं त्यामुळे त्याने चाहत्यांची मनं जिंकली.

IPL 2021: तब्बल ८ वर्षांनंतर ‘या’ खेळाडूने केली लिलावासाठी नोंदणी

वासिम जाफर आपल्या ट्विटर अकाऊंटवर खूपच सक्रीय असतो. काही विषयांवर तो शेलक्या शब्दात भाष्य करतो. अनेकदा हटके अंदाजात तो इतर खेळाडूंना टोला लगावतो. त्याला नुकताच एका चाहत्याने ट्विटरवर प्रश्न विचारला होता. विराट आणि रोहित यांच्यापैकी तुझा आवडता खेळाडू कोण? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर जाफरने उत्तर दिलं, “रोहित आणि विराट.. एकत्र असले की संघ अधिक भक्कम होतो..” जाफरच्या या उत्तराने चाहते अगदी खुश झाले.

Video: बुमराहचा सुसाट यॉर्कर इंग्लंडच्या फलंदाजाच्या पायावर लागला अन्…

दरम्यान, न्यूझीलंडविरूद्धच्या क्रिकेट मालिकेत विराट आणि रोहित फेब्रुवारी २०२० मध्ये एकत्र खेळले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेसोबतची मालिका रद्द करण्यात आली. मग करोना संकटामुळे अनेक क्रिकेट बंदच होतं. करोनानंतर IPLमध्ये विराट आणि रोहित वेगवेगळ्या संघाचे नेतृत्व करत होते. आणि नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट-रोहितमध्ये लपंडाव रंगला होता. टी२०, वन डे आणि पहिली कसोटी इतकं क्रिकेट खेळून विराट मायदेशी परतला. तर रोहित थेट दुसऱ्या कसोटीनंतर संघात दाखल झाला. त्यामुळे जवळपास वर्षभराने चाहत्यांना या दोघांना एकत्र पाहायला मिळालं आहे.