भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर इंग्लंडच्या संघाने ३ बाद २६३ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या सत्रात दोन गडी गमावल्यानंतर संपूर्ण दिवस सलामीवीर डॉम सिबली आणि जो रूट यांनी खेळून काढत संघाला भक्कम स्थितीत आणले. रूटने नाबाद शतक ठोकलं, पण सिबली शेवटच्या सत्रात ८७ धावांवर पायचीत झाला आणि दिवसाचा खेळ थांबण्यात आला.

डॉम सिबली आणि जो रूटने २०० धावांची भागीदारी केली. सिबली आपल्या शतकाच्या दिशेने आगेकूच करत होता. दिवसाचा खेळ संपण्यासाठी केवळ २ षटकं शिल्लक होती. त्यावेळी विराटने बुमराहला गोलंदाजी दिली. बुमराहने ठेवणीतील अस्त्र म्हणजेच वेगवान यॉर्कर चेंडू सिबलीला टाकला. हा अनपेक्षित चेंडू त्याला खेळता आला नाही आणि त्याने जमिनीवर हातच टेकले. त्याच चेंडूवर पायचीत झाला आणि शतकाने त्याला हुलकावणी दिली. सिबलीने १२ चौकारांसह ८७ धावा केल्या. त्यानंतर दिवसाचा खेळही थांबवण्यात आला.

त्याआधी, जवळपास वर्षभराने भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन झालं. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीला शुक्रवारी सुरूवात झाली. नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर रॉरी बर्न्स आणि डॉम सिबली यांनी अत्यंत संथ सुरूवात केली. काही वेळाने अश्विनच्या गोलंदाजीवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न करताना रॉरी बर्न्स झेलबाद झाला. त्याने ६० चेंडूत ३३ धावा केल्या. त्यानंतर नवखा डॅन लॉरेन्स शून्यावर बाद झाला. पाचव्या चेंडूवर त्याला बुमराहने पायचीत केले. नंतर रूट-सिबलीने २०० धावांची भागीदारी केली. सिबली पायचीत झाला, पण जो रूट १४ चौकार आणि १ षटकारासह १२८ धावांवर खेळत आहे.