पश्चिम विभागीय ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्याच लढतीत महाराष्ट्राला ६२ धावांनी पराभूत करत गुजरातने विजयी सलामी दिली. कर्णधार पार्थिव पटेलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरातने १७१ धावा फटकावल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना महाराष्ट्राचा डाव १०९ धावांवरच संपुष्टात आला आणि त्यांना प्रशिक्षक सुरेंद्र भावे यांना वाढदिवसाची विजयी भेट देता आली नाही.
प्रथम फलंदाजी करताना गुजरातच्या पटेलने ५३ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ७० धावा फटकावल्या. पटेल बाद झाल्यावर वेणुगोपाल रावने २७ चेंडूंत ४ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ४७ धावा फटकावत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच षटकात महाराष्ट्राने तीन फलंदाज गमावले आणि त्यांच्या हातून सामना निसटला.
संक्षिप्त धावफलक
गुजरात : २० षटकांत ६ बाद १७१ (पार्थिव पटेल ७०, वेणुगोपाल राव ४७; डॉमिनिक जोसेफ ३/३३) विजयी वि. महाराष्ट्र : १७.१ षटकांत सर्व बाद १०९ (श्रीकांत मुंडे ४२; जसप्रीत बुमराह २/१०).
गुजरात ६२ धावांनी विजयी
गुण : गुजरात : ४; महाराष्ट्र : ०.