महाराष्ट्राच्या सचिन सर्जेराव खिलारीने जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या गोळाफेक क्रीडा प्रकारातील एफ-४६ गटात आशियाई विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. तसेच धरमबीरने क्लब थ्रो क्रीडा प्रकारातील एफ-५१ गटात कांस्यपदक मिळवताना भारताला यंदाच्या स्पर्धेत १२ पदकांचा टप्पा गाठून दिला. यात पाच सुवर्णपदकांचा समावेश आहे. भारताची जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेतील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. यापूर्वी भारताने २०२३ मध्ये पॅरिस येथे झालेल्या स्पर्धेत तीन सुवर्णपदकांसह एकूण दहा पदके जिंकली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सचिनने १६.३० मीटर लांब गोळाफेक करत सुवर्णपदकाची कमाई केली. यासह त्याने आपलाच १६.२१ मीटरचा आशियाई विक्रमही मोडीत काढला. तसेच आता पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेसाठीही पात्रता मिळवली आहे.

सचिन हा सांगली जिल्ह्यातील करगणी गावचा असून, त्याचा शालेय जीवनात अपघात झाला, ज्यामुळे त्याच्या डाव्या हाताला अपंगत्व आले. गँगरीनमुळे सचिनने कोपराचे स्नायू गमावले आणि अनेक शस्त्रक्रिया करूनही त्याचा हात बरा झाला नाही. मात्र, गोळाफेकीत एफ-४६ गटात त्याने जागतिक स्तरावर ठसा उमटवला आहे. सचिनने गेल्या वर्षी हांगझो पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णयश संपादन केले होते.

हेही वाचा >>>RCB vs RR: विराट कोहलीच्या या रॉकेट थ्रोला काय म्हणावं? सीमारेषेवरून ध्रुव जुरेलला केलं धावबाद, पाहा VIDEO

दुसरीकडे, पुरुषांच्या क्लब थ्रो क्रीडा प्रकारातील एफ-५१ गटाच्या अंतिम फेरीत धरमबीरने पाचव्या प्रयत्नात ३३.६१ मीटरचे अंतर गाठत कांस्यपदक मिळवले. सर्बियाचा झेलिको डिमित्रिएविच (३४.२० मीटर) आणि मेक्सिकोचा मारिओ हर्नांडेझ (३३.६२ मीटर) हे अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदकाचे मानकरी ठरले.

भारताने एकूण १२ पदकांसह (पाच सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्यपदके) पदकतालिकेतील तिसरे स्थान राखले आहे. अव्वल स्थानी असणाऱ्या चीनच्या नावे १८ सुवर्ण, १६ रौप्य आणि १४ कांस्यपदके, तर दुसऱ्या स्थानावरील ब्राझीलच्या नावे १७ सुवर्ण, आठ रौप्य आणि पाच कांस्यपदके आहेत. स्पर्धा आणखी तीन दिवस चालणार आहे.

या स्पर्धेत मला सुवर्णपदकाचीच अपेक्षा होती आणि ती पूर्ण झाल्याचा खूप आनंद आहे. आता या कामगिरीच्या जोरावर मी पॅरिस पॅरालिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे. तिथेही सुवर्णयश संपादन करण्याचा माझा प्रयत्न राहील. – सचिन खिलारी

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World para athletics championships maharashtra sachin khilar wins gold sport news amy