|| शीतल चिंचोळकर

स्वयंपाकघर म्हणजे घरातली अतिशय महत्त्वाची जागा. घरच्या सगळ्यांचे उदरभरण करणारे स्वयंपाकघरही तितकेच सुंदर असायला हवे. ताजी-टवटवीत अशी मॉडय़ुलर किचन ही संकल्पना गेल्या काही वर्षांत मूळ धरू लागली आहे. तरुण पिढी तर खास आपल्या मनाप्रमाणे डिझाइन केलेल्या स्वयंपाकघराशिवाय गृहप्रवेशही करत नाही..

पूर्वी घरातले स्वयंपाकघर ही दुर्लक्षित जागा असायची. आता मात्र संपूर्ण घराबरोबरच स्वयंपाकघरही आकर्षक, अत्याधुनिक आणि घराच्या रंगसंगतीला साजेसे, थोडक्यात हटके असावे,  याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. आजकालची बदलती जीवनशैली त्यासाठी कारणीभूत आहे. शिक्षणामुळे, पर्यटनामुळे, समाजमाध्यमांमुळे, लोकांमध्ये घराच्या सजावटीविषयी जागरूकता निर्माण होऊ लागली आहे. या सगळ्याचा परिपाक म्हणून मॉडय़ुलर किचन ही संकल्पना आता आपल्याकडे चांगलीच रुजू लागली आहे.

घर घेताना लोकांचा कल खास डिझाइन करून घेतलेल्या स्वयंपाकघराकडे वाढू लागला आहे. घरात मॉडय़ुलर किचन असायलाच हवे हा आता हट्ट राहिला नसून, ती काळाची गरज बनू लागली आहे. शिवाय समाजमाध्यमांतून, पर्यटनाच्या माध्यमातून स्वयंपाकघराच्या बदलत्या चौकटीचे आकर्षक रूपही लोकांना खुणावत असते. त्यामुळेच गृहसजावटीचा विषय निघाला की लििव्हग रूम, बेडरूम, गॅलरी यांच्याबरोबरच स्वयंपाकघराचाही चेहरामोहरा बदलण्याला अग्रक्रम दिला जाऊ लागला आहे. त्यातच नवरा-बायको दोघेहीजण कमावते असल्याने स्वयंपाकघर ही काही आता एकाचीच मक्तेदारी राहिलेली नाही. कार्यालयीन कामाची वेळ आणि स्वरूप दोन्हीही बदलले असल्याने स्वयंपाकघरातील कामाची विभागणी कमावत्या दोघांमध्ये होऊ लागली आहे. त्यामुळे घर घेताना पारंपरिक पद्धतीच्या स्वयंपाकघराला फाटा देत त्याऐवजी खास डिझाइन करून घेतलेल्या आणि आपल्याला सोयीच्या ठरेल अशा मॉडय़ुलर किचनला प्राधान्य दिले जाऊ लागले आहे.

प्रत्येक ग्राहकाला उत्तम दर्जाचे स्वयंपाकघर तयार करून देण्याची जबाबदारी सजावटकाराची असते. ग्राहक म्हणेल तसे, त्याच्या खिशाला परवडेल तेवढय़ा किमतीत आणि दिलेल्या कालमर्यादेत सर्वोत्तम दर्जाचे काम करून देणे यावर आमचा भर असतो. गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड नाही, हे ब्रीदवाक्य कटाक्षाने पाळावे लागते. ज्यांना आपल्या स्वयंपाकघराची पुनर्रचना करायची आहे वा नवीन घरात राहायला जाण्यापूर्वी डिझाइन केलेले स्वयंपाकघर करायचे आहे अशा लोकांकडे सर्वप्रथम स्वयंपाकघरासाठी उपलब्ध असलेल्या जागेचे निरीक्षण केले जाते. त्याची विविध कोनांतून छायाचित्रे काढली जातात. संबंधित ग्राहकांची नेमकी गरज काय आहे, त्यांना कशा पद्धतीने स्वयंपाकघर डिझाइन करून हवे आहे, याचा अंदाज घेतला जातो. त्यानंतर संभाव्य स्वंयपाकघराचे त्रिमितीय चित्र दाखवून प्रत्यक्ष स्वयंपाकघर कसे दिसेल याची कल्पना ग्राहकाला दिली जाते. तसेच डिझाइनसाठी बाजारात उपलब्ध असलेल्या विविध ब्रॅण्डेड साहित्याची माहिती ग्राहकांना दिली जाते. त्याच्या किमतीविषयी माहिती दिली जाते. ग्राहकाने मंजूर केलेल्या बजेट आणि साहित्यानुसार मॉडय़ुलर किचन फॅक्टरी फिनिश्ड मटेरिअल आणून ग्राहकाच्या घरी ते जोडले जातात. नव्या स्वयंपाकघराच्या निर्मितीसाठी अस्तित्वात असलेल्या स्वयंपाकघराच्या मोडतोडीपासून ते नीट सजावट केलेल्या मॉडय़ुलर किचन उभारणीपर्यंतची सर्व कामे नेटकेपणाने केली जातात. त्यामुळे घरात धूळ साचणे वगरे प्रकार घडत नाहीत.  मॉडय़ुलर किचनमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे हार्डवेअर. हार्डवेअर मजबूत असेल तर मॉडय़ुलर किचन दीर्घकाळपर्यंत टिकते. हॅफ्ले-ब्लम, हेटिक, ग्रास यांसारख्या नावाजलेल्या जर्मन ब्रॅण्ड्सचा वापर केला जातो. खास डिझाइन केलेल्या स्वयंपाकघराच्या क्षेत्रात या जर्मन ब्रॅण्ड्सना विशेष मागणी आहे.  कोणाला बठकीची खोली आणि स्वयंपाकघर एकत्र करून हवे असते, कोणाला स्वयंपाकघराची जागाच बदलायची असते, कोणाला पूर्णपणे नवीन स्वयंपाकघर तयार करून हवे असते, तर कोणाला खुल्या स्वयंपाकघराची (ओपन किचन) हौस असते. त्यामुळे ग्राहकांना हव्या तशा स्वरूपात मॉडय़ुलर किचन तयार करून देण्यावर आमचा अधिक भर असतो. सद्य:स्थितीत आयलंड किचन्स, यू शेप, एल शेप, स्ट्रेटलाइन, पॅरलल अशा विविध आकार आणि प्रकारच्या मॉडय़ुलर किचनचा ट्रेण्ड आहे. कमीतकमी जागेत जास्तीतजास्त वस्तूंना जागा करून देणारी मॉडय़ुलर किचन संकल्पना अतिशय ताजी आणि टवटवीत तर आहेच, शिवाय आपल्या प्रत्येकाच्या मनातल्या स्वयंपाकघराच्या चित्राला सुखद छेद देणारीही आहे. त्यामुळे आज अनेकांचा ओढा या संकल्पनेकडे आहे.

मॉडय़ुलर किचनबरोबरच या डिझाइन केलेल्या स्वयंपाकघरातील वस्तूंबाबतही अलीकडे जागरूकता निर्माण होत चालली आहे. स्वयंपाक करते वेळी निर्माण होणारी वाफ किंवा फोडणीमुळे निर्माण होणारा धूर हे सर्व घरभर पसरू नये यासाठी धूर-वाफ बाहेर टाकणाऱ्या एक्झॉस्ट फॅनची जागा आता चिमणी घेऊ लागल्या आहेत. विविध ब्रॅण्ड्सच्या चिमण्या सध्या बाजारात उपलब्ध आहेत. याशिवाय स्वयंपाकघरात नेहमी वापरल्या जाणाऱ्या वस्तूही ब्रॅण्डेड स्वरूपात उपलब्ध होऊ लागल्या आहेत. स्वयंपाकघर डिझाइन करताना या सर्व गोष्टीही आपापल्या जागा घेतील, याकडे ग्राहकांचा कटाक्ष असतो. मॉडय़ुलर किचन रचनेनुसार फ्रीज, डिश वॉशर, मायक्रोवेव्ह, इत्यादी गृहोपयोगी वस्तूंची रचना केली जाऊन त्यांनाही मानाचे स्थान दिले जाते.

थोडक्यात, ‘सुंदर माझं घर’ या संकल्पनेत आता स्वयंपाकघराच्या सजावटीचाही विचार गांभीर्याने होऊन ‘सुंदर माझं स्वयंपाकघर’ असे अभिमानाने म्हटले जाते. त्यामुळे येणाऱ्या काळात अनेक घरांमध्ये खास डिझाइन केलेली स्वयंपाकघरे असल्यास आश्चर्य वाटणार नाही. कारण आजची गृहिणी स्वकर्तृत्वाला महत्त्व देणारी आहे. आणि तिच्या कर्तृत्वातूनच साकारलेल्या स्वयंपाकघराला मनमोकळेपणाने दाद द्यायलाच हवी ना?

elementskit@gmail.com