आहारातलं प्रथिनांचं प्रमाण वाढवण्यासाठी हल्ली शाकाहारीही अंडी खाऊ लागले आहेत. अंडय़ाचा वापर केल्यानंतर कचऱ्यात टाकलं जाणारं त्याचं कवच वापरता येऊ शकतं. कसं ते पाहू या. खिडकीत हिरवळ फुलवायची असेल, तर त्याची प्राथमिक पायरी म्हणून अंडय़ाचं कवच वापरता येईल. धणे, लसूण, टोमॅटोतील बिया, मेथीचे दाणे अशा स्वयंपाकघरातल्या विविध जिनसांचा वापर करून आपण खिडकीत सहज बागकाम करू शकतो. या बिया मोठय़ा कुंडीत लावण्यापूर्वी आधी एका छोटय़ा पेपरकपमध्ये लावल्या जातात. या पेपरकपऐवजी आपण अंडय़ाचं कवच वापरू या. कवच धुवून स्वच्छ करून घ्या. ते आवडत्या रंगात रंगवा. त्यावर नाक-तोंड-डोळे किंवा अन्य कोणतीही नक्षी चितारा. आतील भागात माती भरा. त्यात बिया पेरून सावलीत ठेवा आणि अतिशय थोडे पाणी घालत राहा. काही दिवसांनी त्यात रोपे किंवा पाती उगवतील आणि या छोटय़ा, सुंदर, नैसर्गिक कुंडय़ा अधिकच आकर्षक दिसू लागतील. रोपे पुरेशी वाढली की या कुंडय़ा हलकेच फोडा आणि फुटलेल्या कवचासहित रोप मोठय़ा कुंडीत लावा. अंडय़ाचे विघटन होऊन झाडाला खतही मिळेल.