उन्हाळ्यात शीतपेयांमुळे लहान-मोठय़ा आकाराचे रिकामे टिन घरात जमा होतात. सुक्या कचऱ्यात भर घालण्यापेक्षा त्यांचा पुनर्वापर करता येऊ शकतो. ते स्वच्छ करून त्यात इकडे-तिकडे विखुरलेल्या विविध लहान वस्तू भरून ठेवता येऊ शकतात. फक्त एकच समस्या असते.. त्याच्यावर लावलेल्या भडक स्टिकर्सची. या स्टिकर्समुळे हे डबे कुठेही ठेवले तरी बटबटीत दिसतात. पण हा प्रश्न चुटकीसरशी सोडवून आकर्षक चमचाघर किंवा पेनस्टँड तयार करता येईल.

साहित्य

टिनचा (पत्र्याचा) डबा, विविध रंगाचे नेल पॉलिश, रंगकामासाठी ब्रश आणि अन्य साहित्य.

कृती

  • टिनवरील म्हणजेच झाकणाच्या ठिकाणी असलेला भाग कापून काढून टाका. टिन स्वच्छ धुवून वाळवा.
  • वरील स्टिकरचा भाग सुरीने खरवडून काढा.
  • सर्व बाजूंनी फिकट रंगाचे नेलपॉलिश लावा.
  • पूर्ण वाळू द्या. हा रंग पटकन वाळतो.
  • अन्य रंग वापरून नक्षीकाम करा.
  • छोटे चमचे, काटे, पेन-पेन्सिल इत्यादी वस्तू ठेवण्यासाठी हा डबा वापरता येईल. डायनिंग टेबलची शोभाही वाढेल. छोटे देठ असलेली फुले ठेवून फुलदाणीप्रमाणे सजवताही येईल.
  • पाण्याने हलक्या हाताने धुता येईल.

apac64kala@gmail.com