19 January 2021

News Flash

स्वावलंबन आणि आत्मसन्मान

नवराबायकोच्या संसारामधली जास्तीतजास्त भांडणं जोडीदाराचा आत्मसन्मान दुखावला गेल्यामुळे होतात.

प्रतिनिधिक छायाचित्र

स्वावलंबनाने आत्मसन्मान, आत्मसन्मानानेच निर्भयता येते. निर्भयतेमुळे नम्रता येते. नम्रतेनेच प्रगल्भता आणि समाधान मिळतं. पालकांना स्पष्ट शब्दात कळो न कळो, पण मुलाचं पालनपोषण, शिक्षण, खेळ या सगळ्यांचा मूळ उद्देश मुलाला ‘स्वावलंबी’ बनवणं हाच असतो. तरीदेखील प्रत्यक्षात मुलं आपल्यावर अवलंबून असली तर आनंद वाटणारे अनेक आई-बाप असतात.

नवराबायकोच्या संसारामधली जास्तीतजास्त भांडणं जोडीदाराचा आत्मसन्मान दुखावला गेल्यामुळे होतात. हे माझं निरीक्षण कोणीही ताडून बघावं. अशा भांडणांचा आवाज कदाचित मोठा नसेल, पण दुखवादुखवी चालू असते. दोघं एकमेकांना अटी घालताना दिसतात. रुसवे, अबोला हे सगळे त्याचेच प्रकार आहेत. याबाबतीत नवरे असं वागतानाचं प्रमाण जास्त आहे कारण पैसे त्यांच्या हातात असतात. तरीही बायकोकडून प्रेमाची अपेक्षा असते. अर्थात ती पुरी होणं कठीण असतं.

अन्न, वस्त्र, निवारा या प्रत्येकाच्या शरीराच्या प्राथमिक गरजा आहेत हे मान्यच आहे; पण आत्मसन्मान ही तर मनाची पहिली गरज असते. आत्मसन्मान दुखावला गेला तर चालतो, आवडतो अशी एकही व्यक्ती कुठेही नसते. स्वावलंबन आणि आत्मसन्मान हे निराळे शब्द असले तरी त्यांचा संबंध इतका जवळचा आहे की, स्वावलंबन म्हणजेच आत्मसन्मान असं म्हटलं तरी चालेल.

लहानपणी नैसर्गिक विधी तान्हं मूल करतं तेव्हा सफाई ही कल्पना मुलाची नसते, सांभाळणाऱ्या मोठय़ा माणसाची असते. भुकेसाठी आईच्या अंगावरचं दूध तान्हं मूल स्वत: पितं. त्यासाठी त्याला जे कष्ट करावे लागतात ते मूल स्वत:हूनच करतं. इथून स्वावलंबनाला सुरुवात होते. एक-दीड वर्षांचं मूल सगळ्या गोष्टी प्रथम स्वत: करायला बघतं. दुसरं कोणी तरी, कुठची तरी कृती आपल्याऐवजी करेल असं त्या मुलाच्या मनातही येत नाही. जी वस्तू आवडेल तिकडे रांगत, चालत जाणं हे मूल आपणहून करतं. ती कल्पना बाकीचे मुलाच्या मनात भरवतात आणि त्याला परावलंबनाचे धडे मिळायला लागतात. परावलंबनाच्या एवढय़ा तगडय़ा शिक्षणातूनही काही छोटी किंवा मोठी माणसं मूळची नैसर्गिक प्रेरणा शाबूत ठेवू शकतात. सगळ्या कृती स्वत: कराव्यात असं त्यांना बरेच वेळा आतला आवाज सांगत असतो. स्वत:ला काय आवडतं याचाही शोध नैसर्गिकपणे अखंड चालू असतो. काही गोष्टी मनात येतात, पण शब्दांत मांडता येत नाहीत. भाषा तेवढी तयार नसते.

मुळात भारतात स्वावलंबन हा सद्गुण आहे का दुर्गुण, हेच ठरत नाहीय. स्वावलंबनाशीच आत्मसन्मान जोडलेला असल्यामुळे तोसुद्धा सद्गुण का दुर्गुण हा प्रश्न आहे. शिवाय तो भारतीय संस्कृतीशी जोडल्यामुळे जास्त कठीण झाला आहे. या प्रत्येक बाबतीत शेवटी अंतिम निर्णय स्वत:लाच घ्यावा लागतो. पालकांना स्पष्ट शब्दात कळो न कळो, पण मुलाचं पालनपोषण, शिक्षण, खेळ या सगळ्याचा मूळ उद्देश मुलाला ‘स्वावलंबी’ बनवणं हाच असतो. तरीदेखील प्रत्यक्षात लग्नाच्या वयाची मुलं आपल्यावर अवलंबून असली तर आनंद वाटणारे अनेक आई-बाप असतात; पण काही वेळा मुलांना ते कळतं आणि ती स्वावलंबी होतात, स्वत:चे प्रश्न स्वत: सोडवतात. अशा वेळेला मदत शक्यतोवर मागायचीच नाही, असं एखाद्याने ठरवलं तर दुसरा मदत करणार कशी? तरुणपणापर्यंत स्त्री-पुरुष आकर्षण या महत्त्वाच्या विषयात आई-वडिलांनी मुलांना स्वावलंबी बनवणं फार महत्त्वाचं आहे.

एखादा मुलगा किंवा मुलगी लग्न करायला योग्य, पण जोडीदार निवडायला अयोग्य या विचारात काहीच तथ्य नाही, पण ही कल्पना लोकप्रिय आहे. परदेशातल्या कामाच्या वातावरणाबद्दल कमी माहिती असते. तिथे शिपाई नसतो. प्रत्येकाने स्वत:ची कामं स्वत: यंत्राच्या मदतीने करायची असतात.

मध्यमवयीन जोडप्यांना उद्देशून याबद्दल जरा सांगतो. तुमच्या तरुण मुलाचं किंवा मुलीचं उदाहरण घेऊ या. मुलगा किंवा मुलगी म्हणतेय की, सध्याचा चालू असलेला कोर्स अपेक्षेप्रमाणे नाही निघाला. त्यामुळे हे वर्ष झालं, की कोर्स, विषय बदलायचा त्याने निर्णय घेतला आहे. दुसऱ्या योग्य कोर्सची माहिती काढणं चालू आहे. या सगळ्यामध्ये एक वर्ष वाया गेल्यासारखं वाटेल, पण पुढे फायदा होईल. अर्थात, या निर्णयाची सगळी जबाबदारी त्याची किंवा तिची.

स्वावलंबनाने आत्मसन्मान, आत्मसन्मानानेच निर्भयता येते. निर्भयतेमुळे नम्रता येते. नम्रतेनेच प्रगल्भता आणि समाधान मिळतं. आचार्य विनोबा भावेंनी स्वावलंबनाच्या ३ पातळ्या वर्णन केल्या आहेत. १) स्वत:ची सगळी कामं स्वत: करणं, २) ज्ञान मिळवण्यासाठी एकाग्रता, वाचन, चर्चा, चिंतन यामधली क्षमता वाढवणं, ३) आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाबद्दल स्वत:चं मत बनवणं. हे खूप महत्त्वाचं आहे.

आपल्या कामाबद्दल माणूस कसा विचार करतो, यालाही महत्त्व आहे. ‘स्वत:च्या कामावरचा विश्वास म्हणजे जगण्याचं इंधन आहे. चरितार्थ चालवण्यासाठी पैसे मिळवावेच लागतात, पण त्याचबरोबर आपण करतो त्या कामावर प्रेम असणं खूप महत्त्वाचं आहे.’

पैशाचं स्वावलंबन कळायला हवं असलं तर एक माणसाने ठरवून टाकायला लागतं. फुकट मिळणारं काहीही घ्यायला नकार द्यायचा. पैसे उसने घेतले, दिले, तरी ते व्याजानेच द्यायचे, घ्यायचे. बिनव्याजी पैशाचं महत्त्व वाटत नाही, कारण काही ताणच जाणवत नाही. मग ते पैसे परत करण्यात दिरंगाई होते. आईवडील पैसे राखून असल्यामुळे स्वत:चं कर्तुत्व झाकोळलं गेल्याची बरीच उदाहरणं सापडतात.

पुढे वयस्क जोडप्यांनी एकमेकांना मदत करणं स्वावलंबन-तत्त्वाच्या आड येत नाही, पण एकाने दुसऱ्याकडून सेवा करून घेणं त्यात बसत नाही.

एक महत्वाचा स्वतंत्र मुद्दा सांगतो. समुपदेशकाने समुपदेशनार्थीला स्वावलंबी बनवायचं महत्त्वाचं असतं.

सगळ्या बाबतीत प्रत्येकाने स्वत: अंतिम निर्णय घ्यायचा असतो आणि त्याची अंमलबजावणी करायची असते. व्यक्तिस्वातंत्र्य हे सर्वोच्च मूल्य मानलेलं आहे. याचा पुढचा अर्थ म्हणजे ‘स्वत:च्या व्यक्तिस्वातंत्र्याबरोबर दुसऱ्याचं व्यक्तिस्वातंत्र्य तेवढंच महत्त्वाचं आहे.’ ते जरा निर्णयप्रक्रियेशी जोडू या. खरं तर व्यक्तिस्वातंत्र्याबरोबर माणसाची निर्णयक्षमता वाढायलाच हवी. तसं आपल्या समाजात झालं नाही. ‘योग्य का सोयीचं’ हा मुख्य प्रश्न प्रत्येक माणसाला सोडवायचा असतो. प्रत्यक्षात योग्य तसं वागू म्हणणारा वर्ग कमी कमी व्हायला लागला नि सोयीचं ते करू म्हणणाऱ्यांचा वाढला.

मानसशास्त्रात सांगितलंय की, ‘मुद्दा पूर्ण पटला की मगच त्याची अंमलबजावणी होते. तोपर्यंत नाही.’ त्यामुळे सगळीकडे अडचणी वाढल्या.  लोकांनी सोयीचं हा अंतिम निर्णय घेतलेलाच आहे. महत्वाचं असतं. अनेक प्रश्नांपैकी ‘ही अशी अंतिम निर्णयाबद्दलची परिस्थिती’ हा बराच मोठा गंभीर प्रश्न वाटतो.

हे मुद्दे निरनिराळ्या प्रकारांनी निरनिराळ्या शब्दांत सांगण्याचं प्रमाण या लेखात जरा

जास्त झालंय हे मला कबूल आहे, पण त्याचं कारण माझ्या मनातली गंभीर काळजी हे आहे. शेवटी याबद्दलचाही अंतिम निर्णय ज्याचा त्याचा आहे.

hianildada@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2018 3:48 am

Web Title: article on self reliance and self respect in children
Next Stories
1 व्यवस्थापन
2 वैवाहिक आयुष्यातलं व्यवस्थापन
3 वैवाहिक आयुष्य आणि करिअर
Just Now!
X