डॉ. वृषाली देहाडराय

इग्लॅनटाईन जेब, बालकांच्या प्रश्नांना सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेण्याचे श्रेय त्यांना जाते. इग्लॅनटाईन ‘व्हाईट फ्लेम’ अर्थात ‘श्वेतज्योत’ या नावाने प्रसिद्ध होत्या. कारण आपत्कालीन स्थितीमध्ये सापडलेल्या बालकांच्या आयुष्यात धवल प्रकाश आणण्याचे काम त्यांनी आयुष्यभर निष्ठेने केले. त्यासाठी त्यांनी १९२० मध्ये ‘इंटरनॅशनल सेव द चिल्ड्रन युनिअन’ या संस्थेची स्थापना केली. आज २५ ऑगस्ट हा इग्लॅनटाईन यांचा जन्मदिवस, त्यानिमित्ताने..

बालकांच्या प्रश्नांना सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेण्याचे श्रेय जाते इग्लॅनटाईन जेब यांना. त्यांचा जन्म २५ ऑगस्ट १८७६ रोजी म्हणजे १४२ वर्षांपूर्वीचा. इंग्लंडमधल्या या उच्चवर्गीय कुटुंबाने प्रथमपासूनच सामाजिक कार्याला वाहून घेतले होते. त्यांची आई इग्लॅनटाईन लुईसा जेब यांनी ग्रामीण भागातील युवकांना कलाकुसर व हस्तकलेचे प्रशिक्षण देण्यासाठी संस्था स्थापन केली होती तर बहीण डोरोथी ही पहिल्या महायुद्धामध्ये स्त्रियांचे भूसैन्यदल स्थापन करण्यात सहभागी होती.

इग्लॅनटाईन यांनी ऑक्सफर्ड येथील लेडी मार्गारेट हॉल येथे इतिहास या विषयाचे शिक्षण घेतल्यानंतर पुढे शिक्षक होण्यासाठी प्रशिक्षण घेतले. एक वर्षभर शिक्षक म्हणून नोकरी केल्यावर त्यांची खात्री पटली की हे आपले काम नाही. पण या वर्षभराच्या अनुभवामुळे त्यांना लहान बालकांच्या समस्या, त्यांचे दारिद्रय़ यांची जाणीव झाली. पुढे त्या केंब्रिज इंडिपेंडंट प्रेस या साप्ताहिकामध्ये लिखाण करू लागल्या. १९०७ मध्ये त्यांची नेमणूक केंब्रिज बरो कौन्सिलच्या शिक्षण समितीवर झाली. तिथे त्यांनी काही काळ तरुणांसाठी रोजगार नोंदणीचे काम केले. १९१३ मध्ये इग्लॅनटाईन मॅसेडोनिअन रिलीफ फंडाच्या कामासाठी मॅसेडोनिआला गेल्या. युद्धखोर सर्बियाने अल्बानिअन निर्वासितांवर केलेल्या अत्याचारांबाबत माहिती जमवण्यासाठी त्यांना पाठवण्यात आले होते. हा अनुभव त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. निर्वासितांची उपासमार, नृशंस नरसंहार या दृष्यांनी त्यांना अंतर्बाह्य़ बदलले. या निर्वासितांसाठी निधी जमा करण्यात मात्र त्यांना फारसे यश आले नाही. कारण इंग्लंडमध्ये या घटनांबाबत फारशी आस्था नव्हती. युद्धाची काय किंमत चुकवावी लागते ते त्यांनी प्रत्यक्ष बघितले.

पहिले जागतिक महायुद्ध संपताना जर्मनी, ऑस्ट्रिया आणि हंगेरी या देशांची अर्थव्यवस्था पूर्णत: कोलमडली होती. इग्लॅनटाईन जेब आणि त्यांची बहीण डोरोथी यांच्या लक्षात आले की या देशांतील मुलांना भयानक उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. दोस्त राष्ट्रांनी या देशांची जी आर्थिक कोंडी केली होती त्यामुळे तिथे अन्नधान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. इंग्लंडमध्ये जेव्हा लोक महायुद्धातील विजयाचा आनंद साजरा करत होते तेव्हा या मुलांसाठी काय करता येईल याचा विचार इग्लॅनटाईन करत होत्या. ही नाकेबंदी थांबवावी म्हणून ब्रिटिश सरकारला विनंती करण्यासाठी ‘फाईट द फॅमिन’ हा दबाव गट इग्लॅनटाईनसारख्या काही समविचारी लोकांनी स्थापन केला. काही काळाने या संस्थेने आपले लक्ष मदत कार्य करण्याकडे लक्ष केंद्रित केले. त्यासाठी १५ एप्रिल १९१९ रोजी जर्मन आणि ऑस्ट्रियन मुलांकरिता निधी गोळा करण्यासाठी ‘सेव द चिल्ड्रन’ ही संस्था स्थापन करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

‘सेव द चिल्ड्रन’ या संस्थेच्या स्थापनेचा इतिहास मोठा रंजक आहे. १९१९ मध्ये इग्लॅनटाईन यांना ऑस्ट्रियातील लंडनच्या ट्राफलगार चौकात भुकेल्या बालकांचे फोटो असणारी हस्तपत्रके वाटण्याबद्दल अटक करण्यात आली. कारण या हस्तपत्रकांवरच्या मजकुराला शासनाने मंजुरी दिलेली नव्हती. तत्कालीन ब्रिटिश सरकारचा असा अंदाज होता की इग्लॅनटाईन यांना अटक केल्यामुळे तरी ही त्रासदायक बाई जर्मनीच्या नाकेबंदीविरुद्ध चालवलेली मोहीम मागे घेईल. खटला कोर्टात उभा राहिल्यावर त्यांनी स्वत:चा बचाव स्वत:च केला. त्यांनी या प्रश्नाची नैतिक बाजू मांडली. न्यायाधीशांनी त्यांना दोषी ठरवले. पण त्यांना शिक्षा म्हणून केवळ ५ पौंड दंड ठोठावण्यात आला. त्यांना जरी शिक्षा झाली तरी त्यांना आपला नैतिक विजय झाल्यासाखे वाटले. यातील पुढचा आश्चर्यकारक भाग म्हणजे सरकारी वकील सर आर्चिबाल्ड बोल्डविन यांनी तिला जाहीररीत्या स्वत:च्या खिशातून पाच पौंड दिले. ही देणगी ‘सेव द चिल्ड्रन’ फंडाला देण्यात आलेली पहिली देणगी ठरली. सकाळपर्यंत या खटल्याची बातमी वर्तमानपत्राद्वारे सर्वतोमुखी झाली. पण या प्रसिद्धीमुळे इग्लॅनटाईन यांचे समाधान झाले नाही. कारण बातमीमुळे उपाशी मुलांची पोटे भरणार नव्हती. योगायोगाने मिळालेल्या या प्रसिद्धीचा फायदा निधी जमवण्यासाठी करायचे ठरवले. त्यांनी त्यावेळचे सर्वात मोठे सभागृह रॉयल अल्बर्ट हॉल इथे एक सार्वजनिक सभा बोलावली. या सभेला कोणीच येणार नाही, अशी भीती त्यांना वाटत होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुंगीलाही शिरायला जागा मिळणार नाही एवढी गर्दी अल्बर्ट हॉलमध्ये या सभेसाठी झाली. पण त्यातले निम्मे लोक शत्रूपक्षाची बाजू घेणाऱ्या इग्लॅनटाईनची हुर्यो उडवण्यासाठी सडकी फळे आणि भाज्या घेऊन आले होते. इग्लॅनटाईन बोलायला उभ्या राहिल्या. त्यांचा आवाज सुरुवातीला भीतीने थरथरत होता. मात्र जसजसे त्या बोलू लागल्या तसा जणू काही कुठल्या तरी अनामिक शक्तीचा संचार त्यांच्यात झाला आणि त्या मोठय़ा आत्मविश्वासाने बोलू लागल्या. आपल्या भाषणाचा शेवट करताना त्या म्हणाल्या, ‘‘भुकेल्या मुलांना वाचवण्याचे कोणतेही प्रयत्न न करता त्यांना उपासमारीने मरताना बघत राहाणे हे एक माणूस म्हणून आपल्याला निश्चितच अशक्य आहे.’’ ते

सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेले. या सभेनंतर केवळ दहा दिवसात दहा हजार पौंड जमा होऊन व्हिएन्नाला पाठवण्यातदेखील आले.

या निधीचा उपयोग करून इग्लॅनटाईन आणि डोरोथी यांनी बालकांसाठी आंतरराष्ट्रीय चळवळ सुरू केली. ब्रिटिश ‘सेव द फंड’ आणि स्वीडिश ‘रद्दा बारनेन’ यांच्या संयुक्त प्रयत्नाने जिनेव्हा येथे १९२० मध्ये ‘इंटरनॅशनल सेव द चिल्ड्रन युनिअन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेची लंडनमधील सूत्रे इग्लॅनटाईन यांच्या हातात होती. मध्य युरोपमधल्या समस्या कमी व्हायल्या लागल्यावर ग्रीस आणि आजूबाजूच्या परिसरातील सतत चालू असणाऱ्या युद्धसदृश हालचालींचा परिणाम भोगावे लागलेल्या मुलांना मदत करण्यास ‘सेव द चिल्ड्रन’चे कार्यकर्ते धावले. तिथल्या निर्वासितांच्या प्रश्नामध्ये त्यांनी लक्ष घातले. तिथली स्थिती नियंत्रणाखाली येते आहे तोच रशियामध्ये पहिले महायुद्ध, क्रांती आणि अनर्थकारक शासकीय धोरणे यामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व अन्नटंचाईला तोंड देण्यासाठी ‘सेव द चिल्ड्रन’चा चमू रशियातल्या सारातोव इथे जाऊन थडकला.

यानंतर त्यांनी बालहक्कांच्या प्रश्नाला हात घालण्याचे ठरवले. राष्ट्रसंघाच्या सभेसाठी बालकांच्या सनदेचा कच्चा आराखडा घेऊन त्या जिनेव्हाला जाऊन थडकल्या. या आराखडय़ातून बालहक्कांचा जाहीरनामा तयार करण्यात आला. या जाहीरनाम्यामध्ये बालकांचे हक्क आणि त्याबाबतीतली आंतरराष्ट्रीय समूहाची कर्तव्ये देण्यात आली होती. या सभेनंतर एका वर्षांने म्हणजे १९२४ मध्ये हा जाहीरनामा राष्ट्रसंघाने अधिकृतरीत्या स्वीकारला. या जाहीरनाम्याला ‘जिनेव्हा जाहीरनामा’ असेही म्हणतात.

बालहक्कांच्या या जाहीरनाम्यामध्ये पाच महत्त्वाची कलमे होती.

बालकांची नैसर्गिक वाढ होण्यासाठी त्यांना भौतिक व आत्मिक साधने पुरवली जावीत.

भुकेल्या बालकाला अन्न, आजारी बालकाला शुश्रूषा आणि मागे पडलेल्या बालकाला मदत मिळायलाच हवी.

अपराधी बालकाचे पुनर्वसन आणि अनाथ व बेघर बालकांना आसरा आणि आधार मिळायलाच हवा.

आपत्कालीन स्थितीमध्ये मदत देताना बालके अग्रस्थानी असायला हवीत.

रोजीरोटी मिळवता येईल अशा ठिकाणी बालकाला ठेवले जावे आणि सर्व प्रकारच्या शोषणापासून त्याचे संरक्षण करण्यात यावे.

बालकाचे पालनपोषण अशा प्रकारे केले जावे; जेणेकरून त्याच्यातल्या क्षमता मानवतेच्या सेवेसाठी वापरल्या जातील.

त्यांच्या या प्रयत्नांमागे कोण्या ठरावीक देशांतल्या बालकांबद्दलची कणव नव्हती तर त्या संपूर्ण मानवतेबाबत वाटणाऱ्या आपुलकीने झपाटून गेल्या होत्या. त्यांच्या प्रयत्नांमागे केवळ भावनिक दृष्टिकोन नव्हता तर त्यांनी पूर्वी केलेल्या संशोधनाने निर्माण झालेली प्रगल्भ वैज्ञनिक दृष्टी होती. या संशोधनामध्ये असे दिसून आले होते की उपासमार झालेल्या प्रौढ व्यक्ती काही काळाने पूर्वपदावर येतात मात्र उपासमारीमुळे बालकांवर कधी भरून न येणारे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम होतात. त्यामुळे मदतकार्यात त्यांना अग्रक्रम देणे आवश्यक आहे. बालकांना सर्वप्रथम मदत करण्याचे दुसरे कारण म्हणजे न्याय्य आणि शांतताप्रिय आंतरराष्ट्रीय समाज निर्माण करणे हे केवळ त्यांच्या हातात आहे अशी त्यांची धारणा होती. ‘‘माझा कोणताही शत्रू सात वर्षे वयाखालचा नाही.’’ या जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या उद्गारांचा इग्लॅनटाईनने मोठय़ा खुबीने उपयोग करून घेतला. पुढे उर्वरित आयुष्य त्यांनी बालकांच्या हक्कांविषयी प्रबोधन करण्यात घालवले. त्यांच्या प्रयत्नांनी १९२५ मध्ये पहिली आंतरराष्ट्रीय बालकल्याण काँग्रेस भरवण्यात आली. थायरॉईडच्या दीर्घ आजाराने त्यांचे अखेर १७ डिसेंबर १९२८ मध्ये जिनेव्हा येथे निधन झाले. त्यांनी लावलेल्या ‘बालहक्क चळवळ’ आणि ‘सेव द चिल्ड्रन’ या रोपटय़ांचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे.

इग्लॅनटाईन ‘व्हाईट फ्लेम’ अर्थात श्वेतज्योत’ या नावाने प्रसिद्ध होत्या. कारण आपत्कालीन स्थितीमध्ये सापडलेल्या बालकांच्या आयुष्यात धवल प्रकाश आणण्याचे काम त्यांनी आयुष्यभर निष्ठेने केले.

* पहिले जागतिक महायुद्ध संपताना जर्मनी, ऑस्ट्रिया आणि हंगेरी या देशांची अर्थव्यवस्था कोलमडली होती. अन्नधान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. तेथील मुलांसाठी इग्लॅनटाईन व त्यांच्या समविचारींनी ‘फाईट द फॅमिन’ हा दबाव गट  स्थापन केला.

*  इग्लॅनटाईन यांच्या प्रयत्नांनी १९२५ मध्ये पहिली आंतरराष्ट्रीय बालकल्याण काँग्रेस भरवण्यात आली.  त्यांनी लावलेल्या ‘बालहक्क चळवळ’ आणि ‘सेव द चिल्ड्रन’ या रोपटय़ांचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे.

vrushalidray@gmail.com

chaturang@expressindia.com