|| जयंत नारळीकर

‘‘गिरिजा कॉलेजमध्ये असताना तिच्यावर रागवायचा एक (आणि एकमेव!) प्रसंग आला. काही कॉलेज कुठल्यातरी धर्मार्थ कामासाठी पैसे गोळा करत होती.  त्यात गिरिजाने भाग घेऊ नये असे वाटत होते. पण तिने भाग घेतला शिवाय घरी यायला उशीरही केला. अर्थात ‘पिता’ म्हणून मला काळजी होती व तिचे रूपांतर गिरिजा सुखरूप परत आल्यावर रागात झाले. तेव्हा, गीताने बहिणीची कड घेऊन आईकडे तक्रार केली की ‘लहानशा चुकीपायी बाबांनी इतके रागवायला नको होते.’ पण त्या दिवशी मी नारळीकरांचे जामदग्न्य गोत्र सार्थ केले..’’  सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ जयंत नारळीकर सांगत आहेत आपल्या मुलींविषयी..

nagpur, acid attack, acid attack in Nagpur, Girlfriend Throws Acid on Boyfriend's Face, Girlfriend Boyfriend Argument, Severe Injuries Reported, Nagpur crime news, crime in Nagpur, Nagpur accid attack case,
नागपुरात ॲसिड हल्ला; प्रेयसीने प्रियकराच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले
12-year-old child molested by minors
मुंबई : १२ वर्षांच्या मुलावर अल्पवयीन मुलांकडून अत्याचार
Rohit Sharma Shared Heart Wrenching Story of Daughter's Birth
लेकीच्या जन्मावेळी रोहित शर्मा पोहोचू शकला नाही, ‘हे’ दोन खेळाडू ठरले कारण; ५ वर्षांनी सांगितला मोठा प्रसंग
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया

प्राप्ते तु षोडशे वर्षे। पुत्रं मित्रवदाचरेत्। आजच्या लिंग समानतेच्या काळात मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता ‘अपत्ये मित्रतां चरेत’ असे म्हणावे. सोळाव्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या आपल्या अपत्याला समानतेने वागवावे, असे हे सुभाषित सांगते. मला तीन मुली असल्याने या सुभाषिताचा वापर अनेक वेळा अनेक प्रसंगी करता आला. वाढत्या वयानुसार आपल्या अपत्याचा बालिशपणा कमी होतो आहे आणि त्या ऐवजी परिपक्व विचारसरणी आणि अस्मिता वाढते आहे, याची जाणीव पुष्कळदा आई-वडिलांनाच होत नाही. मी पण त्याला अपवाद नव्हतो!

याचे एक उदाहरण ‘षोडशे वर्षे’ची टाइम लिमिट येण्यापूर्वीचे. मी ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ या संस्थेत प्राध्यापक असताना संस्थेपासून हाकेच्या अंतरावर तिच्या कर्मचारी निवासात राहात होतो. तेथून एक नाही तर दोन हाकांच्या अंतरावर केंद्रीय विद्यालयाची एक शाखा होती. आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाशिवाय तरणोपाय नाही, अशा भावनेने माझ्या बहुतेक सहवैज्ञानिकांनी आपल्या मुलांना दक्षिण मुंबईतील प्रख्यात, पण महागडय़ा शाळांत घातले होते. अर्थात मुलांना स्कूलबसमधून जाताना पुढील आयुष्यातील कम्यूटिंगची सवय होते! पण मला आणि माझी पत्नी, मंगलाला शाळा चालत जाण्याइतकी जवळ, वर्गात मुलांची संख्या ४०च्या अलीकडे, इंग्रजी व हिंदी दोन्ही माध्यमांची सवय, सी.बी.एस.सी.चा उत्तम अभ्यासक्रम इत्यादी गुण महत्त्वाचे वाटले म्हणून आम्ही मुलींना केंद्रीय विद्यालयात घातले.

जवळ शाळा असण्याचा फायदा म्हणून मी मुलींच्या शाळेपर्यंतच्या ‘प्रवासात’ सोबत म्हणून त्यांची दप्तरे घेऊन जात असे. प्रायमरीतून वरच्या कक्षांत हा प्रघात चालू होता. एक दिवस शाळेच्या प्रिन्सिपलनी ते पाहिले व मला म्हणाले, ‘‘आता मुले मोठी झाली. त्यांना स्वत:च्या हिमतीवर येऊ द्या!’’ मला वाटले : खरंच की, आपण मुलींना विचारूया. माझ्या प्रश्नावर त्यांनी प्रिन्सिपलच्या सूचनेला होकारच दिला. स्वतंत्रपणे आपले दप्तर सांभाळत जाण्यामध्ये, विशेषत: शाळेत त्याच मार्गाने जाणाऱ्या इतर सवंगडय़ांबरोबर गप्पा मारत जाण्यात त्यांना अधिकच स्वारस्य होते. पण आज मागे वळून पाहताना असे वाटते की प्रिन्सिपल साहेबांनी सुचवण्यापूर्वी- मलाच हे सुचायला हवे होते!

माझी सर्वात ज्येष्ठ कन्या गीता आय.आय.टी.च्या प्रवेश परीक्षेत निवडून आली. या परीक्षेसाठी तयारी करणे म्हणजे दिव्य समजले जाते. त्यासाठी क्लासेसचे पीक आले आहे. आम्ही गीताला एक पर्याय सुचवला.  एखाद्या क्लासच्या तयारीला लागणारे प्रश्नपत्रांचे संच विकत घे. पण ते स्वत: सोडव. गणितासाठी आम्ही दोघे (आई-वडील), भौतिकशास्त्राकरता मी आणि इतर गोष्टींकरता जरूर पडेल तसे टाटा इन्स्टिटय़ूट मधल्या एखाद्या शास्त्रज्ञाला विचार. थोडक्यात आम्ही स्वावलंबनावर जोर दिला. गीताला बायॉलॉजीत पण चांगले मार्क (१२ वीत) मिळाल्याने वैद्यकीय शाखेचे तिला आव्हान होतेच. पण शक्य असल्यास आय.आय.टी.मध्ये भौतिकशास्त्राकडे तिचा कल होता. आय.आय.टी.तर्फे नेमका कुठला विषय घ्यावा याचे मार्गदर्शन करायला गीताला आमंत्रण आले. तेव्हा मी तिच्याबरोबर पालक म्हणून गेलो. (अशा मार्गदर्शनाच्या वेळी पालक असणे जरुरी असते.) तेथील प्राध्यापकांनी सांगितले :  भौतिकशास्त्रातल्या सर्व जागा भरल्याने गीताच्या क्रमांकापर्यंत तेथे प्रवेश नव्हता. पण मार्गदर्शकांनी विचारले : तू केमिस्ट्री का घेत नाहीस. त्या विषयासाठी पुढे संशोधनाचे उत्तम पर्याय आहेत. गीताने तसा निर्णय घेतला. मी त्यांत स्वत:चे मत मांडले नाही. कारण माझ्यापेक्षा त्या क्षेत्रात अधिक माहीतगार मार्गदर्शक होते आणि खुद्द गीता. पुढे गीता त्या विषयात आय.आय.टी.चे सर्वोच्च पदक घेऊन स्टॅनफड- विद्यापीठात डॉक्टरेट करून आता युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सॅन फ्रान्सिस्को येथे प्राध्यापक म्हणून यशाच्या पायऱ्या चढत आहे.

माझी दुसरी कन्या गिरिजा हिने पण गीता प्रमाणेच स्वत:च्या हिमतीवर आय.आय.टी.ची प्रवेश परीक्षा उच्च श्रेणीत सर केली. पुढे तेथे कम्प्युटर सायन्सची पदवी घेऊन तिने कार्नेगी मेलन विद्यापीठात डॉक्टरेट मिळवली. ती आता ‘गुगल’ कंपनीत संशोधनाच्या उच्च दर्जात आहे. गिरिजा ज्युनियर कॉलेजमध्ये असताना मला तिच्यावर रागवायचा एक (आणि एकमेव!) प्रसंग आला तो प्रसंग असा. दक्षिण मुंबईतील काही कॉलेज कुठल्यातरी धर्मार्थ कामासाठी पैसे गोळा करत होती. त्यात महाविद्यालयाचे विद्यार्थी जाणाऱ्या-येणाऱ्या मोटरकार्स थांबवून त्यांना स्टिकर लावून पैसे घ्यायचे. एकंदर पद्धत मला आक्रमक वाटली आणि त्यात गिरिजाने भाग घेऊ नये असे वाटत होते. पण आपल्या कॉलेजातील मित्रांच्या दबावाखाली तिने भाग घेतला आणि शिवाय घरी यायला पुष्कळ उशीरही केला. अर्थात ‘पिता’ म्हणून मला बरीच काळजी होती व तिचे रूपांतर गिरिजा सुखरूप परत आल्यावर रागात झाले. तेव्हा मला आठवतंय, गीताने बहिणीची कड घेऊन आईकडे तक्रार केली की ‘लहानशा चुकीपायी बाबांनी इतके रागवायला नको होते.’ पण त्या दिवशी मी नारळीकरांचे जामदग्न्य गोत्र सार्थ केले हे मात्र खरे.

गणित हा विषय आम्हा सर्वाना प्रिय असल्याने गणिती कोडी हा आमच्यामध्ये चर्चेचा विषय असे. तसेच ओरिगामीमध्ये बसणारी कागदी विमाने, डबे, पक्षी इत्यादी बनवायला मी मुलींना शिकवले. मात्र घरी मुलगे नसल्याने लोकप्रिय असणारे मैदानी खेळ जरी विशेष नव्हते तरी बैठे खेळ बऱ्याच प्रमाणात खेळले जात. अर्थात आम्हा सर्वानाच वाचनाची हौस असल्याने, विशेष करून पी.जी. वुडहाऊस आणि कॉनन डॉयल हे आम्हा सर्वाचे लोकप्रिय लेखक आहेत. काही वर्षांपूर्वी गिरिजा आणि (जामात) राहुल यांच्याबरोबर न्यूयॉर्क- ते वॉशिंग्टन कारने जाताना पु. लं.च्या ‘असा मी असामी’ कॅसेटने उत्तम करमणूक केल्याचे स्मरणात आहे.

मला एका गोष्टीचे विशेष समाधान वाटले जेव्हा हायस्कूलमध्ये असताना गीताने एका विद्यार्थ्यांसाठीच्या नियतकालिकात विज्ञानकथा लेखन स्पर्धेत भाग घेऊन पहिला नंबर मिळवला.  माझी अशी अपेक्षा आहे की पुढे ती विज्ञानकथा लेखिका म्हणूनसुद्धा प्रसिद्धी मिळवेल. (मी तिला माझे गुरू फ्रेड हॉएल यांचे उदाहरण दिले : स्वत: जागतिक श्रेणीचे शास्त्रज्ञ असूनसुद्धा हॉएल यांनी विज्ञानकथा लेखक म्हणून नाव कमावले होते!)

माझी तिसरी मुलगी लीलावती शेंडेफळ म्हणून अवतरली. गिरिजाच्या पश्चात नऊ वर्षांनी मंगलाला आणि मला बालसंगोपनाचे धडे नव्याने घ्यावे लागले. मला वाटते की कळत नकळत आम्ही दोघांनी पहिल्या दोन मुलींपेक्षा लीलावतीच्या बाबतीत शिस्तीचे नियम ‘ढिले’ केले असावेत. मधून मधून वाटायचे की आपण लीलूच्या बाबतीत ढिलेपणा करणे योग्य नाही. दोन उदाहरणे आठवतात. मी ‘आयुका’ कॅम्पसमध्ये राहात असताना तेथे दोन टेनिस कोर्ट बांधून घेतले होते. पण काही (माझ्यासारखे!) निवडक लोक सोडल्यास सकाळच्या वेळी कोर्ट वापरणारे कमी होते. अर्थात कोर्ट वापरायला निश्चित केलेले शुल्क अत्यल्प असल्याने तक्रारीला जागा नव्हती. एकदा लीलावती आपल्या एका मैत्रिणीला घेऊन आली. त्या दोघींना सकाळी सातला कोर्ट वापरायचे होते. कोर्ट वापरायचे कूपन घेऊन मी त्यांना खेळाची परवानगी दिली. पण सकाळचे आठ वाजून गेले तरी यांचे खेळणे थांबेना. मंगला म्हणाली की, ‘त्यांचे कॉलेज साडेआठला सुरू होते याचे त्यांना भान नाही.’ कॉलेजचा पहिला तास चुकवून खेळणे हे माझ्या ‘कोड ऑफ कंडक्ट’मध्ये बसत नव्हते. मी तावातावाने कोर्टाकडे गेलो. माझा अवतार पाहून त्यांनी ताबडतोब खेळ थांबवला. ‘वेळ कसा गेला ते कळले नाही’ अशी मखलाशी करायचा प्रयत्न केला. पण त्यापुढे मात्र घडय़ाळाला साक्षी ठेवून खेळण्याचा प्रघात त्यांनी सुरू केला. लीलू ज्युनिअर कॉलेजात जाऊ लागली तेव्हा आमच्यामध्ये, म्हणजे लीलू विरुद्ध तिचे आईवडील, असा एक संघर्ष उद्भवला. कारण? तिला दुचाकी हवी होती. तिची मैत्रीण प्राची पंडित हिने नुकतीच दुचाकी मिळवली होती. म्हणून लीलूची मागणी अधिक ‘र्अजट’ झाली होती. दुचाकी घ्यायला आमची ‘ना’ नव्हती – एका अटीवर! ती अट म्हणजे दुचाकीवर बसताना तिने शिरस्त्राण (हेल्मेट) वापरले पाहिजे. ती अट ऐकून लीलू हसू लागली. तिच्या कॉलेजातली मुले हेल्मेट घालत नव्हती. जी काही मुले हेल्मेट वापरत त्यांची टर उडवली जाई. पण आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहिलो तेव्हा तिने रुदनास्त्राचा वापर केला. आम्ही समजावून पाहिले हेल्मेट का आवश्यक आहे ते. हेल्मेट न वापरल्यामुळे प्राणांना मुकावे लागले अशा तऱ्हेच्या बातम्या दैनिकात येतात त्या तिला दाखवल्या. पण त्याचा काही परिणाम झाला नाही. कॉलेजात हेल्मेट घालून न गेल्याने प्राण गेला तरी चालेल पण हेल्मेट घालून हसे करून घेणार नाही, हे तिचे काहीसे बाळ कोल्हटकरी नाटकातील वाक्य ऐकून मी चाट पडलो.

आमचा हा संवाद चालू असताना, मंगलाने पाहिले की साम, दाम आणि दंड या तीन उपायांनी बाबांचे काही चालत नाही तेव्हा तिने भेद नीतीचा वापर केला. तिने प्राचीच्या आईला फोन लावला आणि लीलावतीच्या हट्टाग्रहाची कल्पना दिली. प्राचीच्या घरी हेल्मेट घालण्याचा नियम अजून वापरात नव्हता जरी त्याचे महत्त्व पटले होते. तेव्हा दोघी आयांनी आपापल्या मुलींना समज दिली. तिचा सारांश असा : हेल्मेट घालण्याचा नियम तुला लागू केला तसा तुझ्या मैत्रिणीला ही. तेव्हा तुम्ही दोघी मिळून ठरवा तुम्ही काय करणार ते. अर्थात आपली मैत्रीण हेल्मेट घालते तर आपणही घालण्यात काही हरकत नसावी!  (कॉलेजातील मुले हसली तर आपण दोघी ‘सहन’ करू.) अशा भावनेने दोघी हेल्मेट घालायला तयार झाल्या.

स्कूटर खरेदीमध्ये लीलावतीला एक अनपेक्षित फायदा झाला. मंगला तिला घेऊन स्कूटरच्या दुकानात गेली. तिथे काही स्कूटर विकायला ठेवलेल्या होत्या. पण प्रत्यक्ष विकत घेणे शक्य नव्हते.  मोठी प्रतीक्षा यादी होती. ‘‘या सर्व दुचाक्या पूर्वी ऑर्डर केलेल्या आहेत.’’ दुकानदार म्हणाला. ‘‘मग या सगळ्या इथे का?’’ लीलावतीने विचारले. विक्रेता म्हणाला, ‘‘पितृपक्ष चालू असल्याने तो संपेपर्यंत ग्राहक त्या विकत घेणार नाहीत.’’ त्यावर मंगलाने म्हटले, ‘‘मग आम्ही आज पैसे भरून यापैकी एक दुचाकी घेतली तर पितृपक्ष संपेपर्यंत तुम्ही फॅक्टरीतून मागवू शकता.’’ दुकानदाराला ते पटले, पण त्याला आश्चर्य वाटले की पितृपक्षात खरेदी करणारे काही लोक असतात तर! घरी जाताना मंगलाने लीलावतीला पितृपक्षाचा महिमा सांगितला आणि तिच्या माहितीच्या भांडारात आणखी एका अंधश्रद्धेची भर टाकली.

असे काही निवडक अनुभव! माझ्या लहानपणाच्या आठवणीत माझ्या वडिलांचा प्रचंड दरारा असे. त्यांना लोक तात्यासाहेब म्हणत. लग्न झाल्यावर त्यांचे एक वयस्कर नातलग आईशी बोलता बोलता म्हणाले होते, ‘‘तात्यासाहेबांशी वागताना, बोलताना आम्ही कधी त्यांना विरोध करत नाही. ते म्हणतील ती पूर्व दिशा.’’ पुढे आम्हालाही तोच अनुभव आला. याचे एक उदाहरण : ४-५ वर्षांचा असताना मी आईला विचारले की तात्यासाहेब केस कापून घेतात तेव्हा न्हावी केसामध्ये खळगा का करतो? तिने टक्कल म्हणजे काय वगैरे न सांगता एवढेच सांगितले : ‘‘तात्यासाहेबांना तशी स्टाइल आवडते म्हणून.’’ मी आणि माझा धाकटा भाऊ वडिलांच्या काव्यशास्त्र विनोदाचा भरपूर आनंद घ्यायचो तरी त्यांची जरब अजून आठवते.

म्हणून आज मागे वळून पाहताना आपण तशीच जरब मुलीवर सोडली नाही असे वाटते. माझ्या टकलावर त्यांचे विनोद चालू असताना मी स्वत: त्यात भाग घेतो. आम्ही (मी आणि मंगला) मुलींना फार शिस्त लावली नसेल पण जी लावली तिचे महत्त्व त्यांच्या मनात बिंबवले – जेणे करून त्यांनी स्वत:ला स्वत:च शिस्त लावून घेतली. जर त्यांना हे विधान पटत असेल तर आई-बाप म्हणून आम्ही सफल झालो.

jvn@iucaa.in