15 December 2019

News Flash

अंदमानच्या कारावासातील संघर्ष

स्वातंत्र्यासाठी चालू असलेल्या भूमिगत क्रांतिकारी चळवळीचा ते भाग होते.

स्वातंत्र्यलढय़ादरम्यान भारताच्या मुख्य भूमीपासून शेकडो मैल दूर असणाऱ्या अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये अनेक क्रांतिकारकांना काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी पाठविण्यात आले. भगतसिंगांचे जवळचे सहकारी असलेल्या विजय कुमार सिन्हा यांनी या अंदमानच्या कारावासातील संघर्षमय आठवणी १९३९ मध्ये पुस्तकरूपात प्रकाशित केल्या. त्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा आमचा अंदमानचा कारावासहा अनुवाद रुपेश पाटकर यांनी केला आहे. लोकवाङ्मय गृह प्रकाशित या पुस्तकाला अनिल राजिमवाले यांनी लिहिलेली ही प्रस्तावना..

भारतीय स्वातंत्र्य आणि क्रांतिकारी चळवळीतील विजय सिन्हा हे एक दुर्मीळ बहुआयामी व्यक्तिमत्त्व होतं. ते भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांचे जवळचे सहकारी होते. क्रांती हे त्यांच्या जीवनाचं ध्येय होते आणि त्यासाठी त्यांनी साम्यवादाचा मार्ग स्वीकारला होता.

स्वातंत्र्यासाठी चालू असलेल्या भूमिगत क्रांतिकारी चळवळीचा ते भाग होते. या चळवळीच्या उत्क्रांतीच्या महत्त्वाच्या टप्प्यांशी ते संबंधित होते. इतर सहकाऱ्यांच्या साथीने त्यांनी या चळवळीला समाजवादी विचारधारेच्या जवळ आणायला मदत केली. हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीचे नाव बदलून ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी करण्यात तसेच एचएसआर पार्टी बनवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ही १९२८ सालची गोष्ट, जेव्हा दिल्लीच्या फिरोझशहा कोटलाच्या प्रसिद्ध किल्ल्यात भूमिगत क्रांतिकारकांची गुप्त बैठक पार पडली होती. या बैठकीला भगतसिंगांसह अनेक दिग्गज क्रांतिकारक उपस्थित होते. विजयकुमार सिन्हांनी त्यांच्या संघटनेला प्रखर बनवण्यात महत्त्वाचं बौद्धिक आणि विचारधारात्मक योगदान दिले. भगतसिंग आणि इतरांसोबत सिन्हांना एचएसआरए/एचएसआरपीचे प्रमुख बनवण्यात आले.

१९२९ मध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्यासोबत त्यांना दोषी ठरवल्यानंतर वेगवेगळय़ा तुरुंगांत त्यांना अनेक वर्षे ठेवण्यात आले. त्यांना एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात सतत हलवण्यात येई. शेवटी त्यांना अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये काळय़ा पाण्याच्या शिक्षेसाठी पाठवण्यात आलं. त्यांना जहाजातील तळच्या अंधाऱ्या पिंजऱ्यातून अंदमानात नेलं जात असल्यापासून अंदमानातील काळय़ा पाण्याच्या शिक्षेच्या जीवनाचे अंगावर काटा आणणारे वर्णन त्यांनी या पुस्तकात केले आहे. त्यांचं जीवन सत्त्वपरीक्षा आणि क्लेश यांची मालिका बनलं होतं पण ते कधीही परिस्थितीमुळे झुकले नाहीत की मोडले नाहीत. ते सतत संघर्ष करत राहिले. कालांतराने त्यांना अंदमानहून परत आणून भारतीय तुरुंगात ठेवण्यात आलं.

अंदमानला भारताचं बास्टाइल म्हटलं जातं.  बास्टाइल हा फ्रान्समधला तुरुंग. फ्रेंच राज्य क्रांतीच्या वेळी फ्रान्सच्या क्रांतिकारकांना त्या तुरुंगात डांबलं होतं. आणि त्या क्रांतिकारकांनी मोठय़ा नाटय़मयरीत्या तो तुरुंग फोडला होता. याच तुरुंगाच्या नावाचा समावेश सिन्हा यांनी इंग्रजी पुस्तकाच्या शीर्षकात केला आहे, ‘इन अंदमान, दी इंडियन बास्टाइल.’ अंदमान आणि बास्टाइल यात जसं साम्य आहे, तसे फरकदेखील आहेत. क्रौर्य आणि छळाच्या बाबतीत अंदमानने बास्टाइलला मागे टाकले. पण हे दोन्ही तुरुंग भारतीय आणि फ्रेंच क्रांतिकारकांच्या दुर्दम्य लढाऊपणाचं प्रतीक आहेत. भारतीय बास्टाइलने आणि त्यात बंदीवासात असलेल्या विजयकुमार सिन्हांसारख्या क्रांतिकारकांनी आमच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांचं स्वत:चं असं योगदान दिलं आणि ते त्यांनी प्रभाव पाडण्याइतकं प्रखर केलं.

अंदमानपर्यंतचा प्रवास आणि तिथला त्यांचा कारावास याचं वर्णन मनाला सुन्न करतं. तेथील कैद्यांची मोठी संख्या क्रांतिकारकांची आणि साम्यवाद्यांची होती, ज्यांच्यात कंेद्रीय विधिमंडळात भगतसिंगांसोबत बॉम्ब फेकणारे बटुकेश्वर दत्त हे सुप्रसिद्ध क्रांतिकारकदेखील होते. तिथे डॉ. गया प्रसाद होते, आणखी अनेक क्रांतिकारक होते, जे साम्यवादी होते किंवा नंतर जे साम्यवादी बनले. ही १९३३ सालची गोष्ट आहे.

आजच्या नव्या पिढीला अंदमानच्या सेल्युलर जेलचा इतिहास आणि तेथील राजकीय कैद्यांविषयी माहिती नाही. अनेकांनी तर नावदेखील ऐकलेले नाही. हे धक्कादायक आणि दु:खद आहे. त्यामुळे अंदमानचा इतिहास सांगितला जाणे आणि त्याचा तरुणांत व्यापक प्रसार होणे आवश्यक आहे.

हे लक्षात घेतले पाहिजे, की अंदमान भारताच्या मुख्य भूमीपासून शेकडो मैल दूर जवळपास इंडोनेशियाला लागून आहे. जरी हा भारताचा भाग असला तरी ब्रिटिश काळात कैद्यांना मुख्य भारतभूमीपासून दूर असलेल्या या बेटावर काळय़ा पाण्याच्या शिक्षेसाठी पाठवले जाई. इतक्या दूरवरच्या तुरुंगात कोंडल्यामुळे या कैद्यांशी कोणताच संपर्क नाही, बातमी नाही, पत्र नाही आणि जरासुद्धा स्वातंत्र्य नाही. कैद्यांना वर्षांनुवर्षे सडण्यासाठी इथे पाठवलं जाई. पुन्हा आपल्या कुटुंबात कधी काळी परतू याची आशादेखील त्यांना उरत नसे. नंतर जनचळवळीच्या दबावाखाली आणि जगभरातून होणाऱ्या निषेधामुळे ब्रिटिश राज्यकर्त्यांना अंदमानच्या कैद्यांच्या मुख्य गटांना भारताच्या मुख्य भूमीवरील तुरुंगात परत आणावे लागले.

अंदमानच्या नरकात या लोकांनी आपलं जीवन कसं व्यतीत केलं? संघर्ष कसे चालवले? कोणत्या आशेवर आणि प्रेरणांवर ते असं करू शकले? त्यांना मारझोड, छळ, अवहेलना आणि नारकीय जीवन याला तोंड द्यावं लागलं. जेव्हा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना सर्वतोपरी चिरडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना दीर्घकाळासाठी अन्न सत्याग्रहाचा मार्ग पत्करावा लागला. हा उपोषणाचा लढा त्यांनी चिवटपणे चालवला. तो मोडून काढण्याचा अधिकाऱ्यांनी वेगवेगळा प्रयत्न केला, पण ते झुकले नाहीत आणि शेवटी काही सुविधा आणि अधिकार मान्य करून घेण्यात ते यशस्वी झाले. त्यांच्यापैकी एक कॉम्रेड उपोषणाच्या काळात झालेल्या छळामुळे आणि मेडिकल टीमच्या हलगर्जीपणामुळे शहीद झाला. त्याचे पार्थिव दगडाला बांधून समुद्रात फेकून देण्यात आले, माशांनी खाण्यासाठी. आणखी काही असेच शहीद झाले आणि त्यांच्याही नशिबी दगडाला बांधून समुद्रात फेकण्याचा अंत्यविधी आला.

अंदमान हे अतुलनीय धैर्य, निर्धार आणि अथक संघर्षांचे प्रतीक बनले. आजदेखील ‘अंदमान’ शब्दाचा उच्चार करताच स्वातंत्र्य चळवळीत लढल्या गेलेल्या सर्वात धैर्यशाली लढय़ांची आठवण होते.

तिथे कारावासात असणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या संघर्षांमुळे इंग्रज प्रशासन जबरदस्त हादरले होते. त्यांनी तिथे दीर्घकाळ केलेल्या अन्न सत्याग्रहामुळे ब्रिटिश सरकारला आपली दमनयंत्रणा मागे घ्यावी लागली. सरकारने केलेले क्रूर दमन स्वातंत्र्यसैनिकांना ना वाकवू शकले ना तोडू शकले. सरकारलाच माघार घेत कैदेतल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. त्यामुळे तुरुंगात काही प्रमाणात सुधारणा झाल्या. ब्रिटिश राज्ययंत्रणेमधील काही संवेदनशील घटकांना कैद्यांचे धैर्य आणि चिवटपणा मान्य करणे भाग पडले.

हे लक्षात घेतले पाहिजे की, अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये तसेच इतर दूरवरच्या जेलमध्ये कोंडलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना कसलाच आधार नव्हता. क्वचित अपवाद वगळता, त्यांना तुरुंगाबाहेरचा कोणताही सक्रिय आधार नव्हता. त्यांचा बा जगाशी संपर्क जवळपास संपूर्णपणे तुटला होता. ते मुख्य भूमीपासून पूर्णपणे विभक्त होते. त्यातून सुटण्याचा कोणताच मार्ग नव्हता. कोणता आधारही मिळणे शक्य नव्हते. असे असूनदेखील, त्यांनी कधीही आशा सोडली नाही, त्यांचे धैर्य आणि निर्धार अबाधित राहिला, हे समजून घेतले पाहिजे.

अंदमानच्या संघर्षांने भारताच्या मुख्य भूमीवरील जीवनाला आणि संघर्षांला खोलवर प्रभावित केले होते.

राजकीय शिक्षणासाठी संघर्ष

सेल्युलर जेलमधील आयुष्य म्हणजे दमन आणि त्याविरुद्धच्या अन्न सत्याग्रहाची केवळ कथा नव्हे. ही कथा त्या राजकीय कैद्यांनी तिथे जगलेल्या वेगळ्या सांस्कृतिक जीवनाची कथादेखील आहे. त्यांनी तिथे खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, सामान्य राजकीय जीवन हेही अनुभवले. त्यांनी साजऱ्या केलेल्या ‘दुर्गापूजा’ उत्सवाचे वर्णन विजयकुमार सिन्हांनी यात केले आहे. ते केवळ रोचकच नव्हे तर हेलावणारे आहे.

कैद्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या राजकीय अभ्यासवर्गाचं वर्णन सिन्हांनी केलं आहे. हे बहुस्तरीय अभ्यासक्रम तब्बल चार र्वष चालू होते. त्यांनी राजकीय शिक्षणाच्या तीन पातळ्या केल्या होत्या. व्याख्यानांसाठी द्वंद्वात्मक भौतिकवाद, ऐतिहासिक भौतिकवाद, राजकीय अर्थशास्त्र, जगाचा इतिहास, वसाहत बनलेल्या देशांची परिस्थिती, भारतीय समाज, संयुक्त आघाडीचे डावपेच, फॅसिझमविरुद्ध संघर्ष वगैरे विषय निवडण्यात आले होते. दिवसाकाठी अनेक तास हे अभ्यासवर्ग चालत.

पण हे विषय जे शिकवू शकतील असे लोक शोधण्याचं आव्हान त्यांच्यापुढे होतं आणि शेवटी त्यांनी त्यासाठी राजकीय कैद्यांतूनच प्रशिक्षित शिक्षक तयार केले. हे वर्ग खूपच लोकप्रिय झाले. या अभ्यासासाठी वापरण्यात आलेली पुस्तके , पत्रिका आणि साहित्याची यादी खरोखरच आश्चर्य वाटण्यासारखी आहे. दीर्घकाळच्या संघर्षांतून हे सगळं घडलं.

परतीसाठी संघर्ष

अंदमानच्या राजकीय कैद्यांच्या समर्थनासाठी पुन:पुन्हा देशव्यापी संघर्ष होत होते. मुख्य भूमीवर परत नेले जावे म्हणून सेल्युलर जेलमध्ये लक्षणीय अन्न सत्याग्रह आणि इतर संघर्ष झाले. या संघर्षांमुळे आंदोलनकर्त्यांना क्रूर दमनाला सामोरे जावे लागले. जबरदस्तीने जेल प्रशासन अन्न भरवण्याचा प्रयत्न करताना अनेकांना शारीरिक दुखापती झाल्या तर काही मरणदेखील पावले. परंतु स्वातंत्र्यसैनिकांनी माघार घेतली नाही.

१९३७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस मंत्रिमंडळे निवडून आल्यानंतर कैद्यांच्या परिस्थितीत थोडा बदल झाला. अंदमानच्या तुरुंगातील संघर्षांला व्यापक जनसमर्थन मिळाले आणि परिस्थिती स्वातंत्र्यसैनिकांच्या बाजूची बनली. परत परत होणाऱ्या संघर्षांमुळे कैद्यांना भारताच्या मुख्य भूमीवर आणणे आणि त्यांना वेगवेगळय़ा प्रांतातील तुरुंगात ठेवणे ब्रिटिश सरकारला भाग पडले.

आजच्या काळात या पुस्तकाचे आणखी एक महत्त्व आहे. संघपरिवाराच्या नेतृत्वाखालील प्रतिगामी शक्ती जाणीवपूर्वक साम्यवाद्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. साम्यवाद्यांना देशद्रोही म्हणत आहेत, त्यांनी ब्रिटिश सत्ताधाऱ्यांसोबत तडजोडी केल्याचे धादांत खोटे विधान पसरवत आहेत. त्यांनी अंदमानच्या राजकीय कैद्यांच्या संघर्षांचा इतिहास अभ्यासावा. त्यांनी तो प्रामाणिकपणे अभ्यासला तर त्यांना कळेल की साम्यवादी ब्रिटिशांशी कसे संघर्ष करत होते. एके काळी बहुतांशी राजकीय कैदी साम्यवादी होते. अनेक जण अंदमानात असताना आणि परत आल्यानंतर साम्यवादी कार्यकर्ते बनले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतलं हे सत्य कोणीही पुसून टाकू शकत नाही. स्वातंत्र्यसंघर्षांत असलेलं साम्यवाद्यांचं योगदान कोणीही नाकारू शकत नाही. राजकीय मतभेद हा वेगळा मुद्दा आहे.

First Published on October 30, 2016 1:48 am

Web Title: book aamacha andamanacha karavas
Just Now!
X