20 February 2019

News Flash

संयत संगतकार 

पं. तुळशीदास बोरकर यांचे नुकतेच निधन झाले. ज्येष्ठ गायक पं. मुकुल शिवपुत्र यांनी त्यांना वाहिलेली आदरांजली..

(संग्रहित छायाचित्र)

उस्ताद आमीर खान, पं. भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व अशा दिग्गजांना साथसंगत करणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ हार्मोनियमवादक पद्मश्री

पं. तुळशीदास बोरकर यांचे नुकतेच निधन झाले. ज्येष्ठ गायक पं. मुकुल शिवपुत्र यांनी त्यांना वाहिलेली आदरांजली..

पं. तुळशीदास बोरकर त्याच मार्गाचे पांथिक होते, ज्या मार्गावरून मी चाललो आहे. हे मला फार उशिरा- अगदी कालपरवा कळलं. विसाव्या वर्षांच्या आसपास मला श्रुतिशास्त्राचा ध्यास लागला. एखाद्या झपाटलेल्या मनुष्याप्रमाणे त्या वेळी मी श्रुतिशास्त्रकार गुरुवर्य बाळासाहेब आचरेकर यांच्यासमोर येऊन बसलो होतो. श्रुतिंच्या क्लिष्ट गणितांच्या वादळात माझी नौका हेलकावे खात असताना बाळासाहेब एखाद्या दीपस्तंभासारखे आयुष्यात आले होते. बाळासाहेबांच्या मागे त्यांच्या वडिलांची- श्रुतिशास्त्री आचार्य गं. भि. आचरेकर यांची घोर तपश्चर्या तेजस्वी सूर्याप्रमाणे तळपत होती. माझं केवढं भाग्य, की मी अगदी योग्य व्यक्तीकडेच मार्गदर्शनाच्या अपेक्षेनं आलो होतो. मला आचार्याचा सहवास मिळू शकला नाही, परंतु अभिजात शास्त्रीय संगीताच्या पायाभरणीचं त्यांनी करून ठेवलेलं थोर कार्य मला बाळासाहेबांच्या मुखातून समजून घेता आलं. बाळासाहेबांनी मला हातचं काहीही न राखता दिलं. तसं त्यांनी शिकण्यासाठी आलेल्या प्रत्येकालाच अनंत हस्ते दिलं. परंतु बहुसंख्यांनी त्यांना वाईट अनुभवच दिले. काहींनी आचार्याचं कार्य स्वत:च्या नावे खपवण्याचा वेडा खटाटोप केला. काही जण ज्ञान घेऊन पुन्हा मागं वळूनही न पाहता चालते झाले. परंतु पं. तुळशीदास बोरकरांसारखा एखादाच, जो आचरेकर पिता-पुत्रांचं ते थोर संशोधन संवर्धित करण्यासाठी, पुनरुज्जीवित करण्यासाठी झटला. जसा मी श्रुतिशास्त्राच्या ध्यासानं वेडावून आचरेकरांकडे गेलो, तसेच माझ्या आधी बोरकरही बाळासाहेबांकडेच श्रुतिशास्त्र शिकले होते. मात्र, एवढय़ा सगळ्या वर्षांत मला ते माहीत नव्हतं.

अलीकडेच अ‍ॅड. जयंत त्रिंबककर यांच्यामुळे माझा पं. बोरकरांशी परिचय झाला आणि नंतर अत्यंत जिव्हाळ्याचे ऋणानुबंध जुळले. श्रुतिशास्त्राच्या क्षेत्रात बोरकर माझे गुरुबंधू आहेत हे मला उशिरा का होईना, पण कळलं हे मोठं भाग्यच! मी कित्येक वर्ष ज्या संवादिनीच्या निर्मितीसाठी झटत होतो त्या माझ्या कार्यात बोरकर गुरुजींच्या एका कृतीनं अत्यंत मोलाचं सहकार्य झालं. आचार्य गंगाधरपंत आणि बाळासाहेब यांची बावीस श्रुतींची हार्मोनियम बोरकर गुरुजींनी अत्यंत मेहनतीनं पुनरुज्जीवित केली होती. ती मला फक्त पाहावयास मिळावी अशी माझी इच्छा होती. परंतु बोरकर गुरुजींनी ती स्वत:ची अत्यंत लाडकी संवादिनी मला कायमची सुपूर्द केली, तेही अतिशय प्रेमानं, समाधानानं! ज्यांना संवादिनी वादक नव्हे, तर ‘संवादिनी साधक’ म्हटलं गेलं त्यांना स्वत:ची मूर्तिमंत मेहनत दुसऱ्याच्या हाती ठेवताना नेमकं काय वाटलं असेल, या आशंकेनं माझं मन हुरहुरत होतं. परंतु त्यावरही त्यांचे शब्द होते- ‘‘माझी सुकन्या आज सुस्थळी पडली. मी आज धन्य झालो.’’

त्या प्रसंगानंतर लगेचच गंधर्वसभेनं ती संवादिनी बोरकर गुरुजींच्या हस्ते मला सुपूर्द करण्याचा जाहीर सोहळा केला. त्या वेळी झालेल्या मैफिलीत बोरकर गुरुजींनी मला संवादिनी साथ केली. मी वयाच्या एकोणिसाव्या वर्षांपासून जाहीर कार्यक्रम देत आलोय. परंतु बोरकर गुरुजींसारखा संगतकार मला अभावानेच लाभला असेल. संवादिनी वादनाचे एकल कार्यक्रम करणारे गुरुजी, परंतु त्यांची निपुण बोटं कुठंही साथ सोडून जुगलबंदी करायला धावत नव्हती. गाणाऱ्याला त्याच्या मार्गक्रमणेत फक्त साथ द्यायची आहे, त्याला अडथळा न करता ईप्सितस्थळी जाण्यास सोबत करायची आहे हे ज्याच्या डोक्यात पक्कं असतं तोच खरा संगतकार! अन्योन्यघाती असं वादन त्यांच्या हातून चुकूनही झालं नाही. अतिशय संयत अशी संगत गुरुजींनी त्या दिवशी केली. आणि त्यांच्याविषयी मनात स्फुरलेलं प्रेम अधिकच वाढलं. त्या कार्यक्रमानंतर रसिकांनी आग्रह धरला, की माझी व बोरकर गुरुजींची आणखी एक मैफल आचरेकरांच्या बावीस श्रुतींच्या संवादिनीसह व्हावी. पण ते योग नव्हते.

पाल्र्याच्या रमेश वाविकरांच्या घरी भेटणं हा जणू पायंडाच पडला होता. परंतु यंदा प्रकृतीच्या कारणास्तव वाविकर नेहमीसाठी अमेरिकेत स्थायिक झाले आणि भेटीगाठींत अंतर पडलं. गतवर्षी मे महिन्यात आम्ही गोव्यात बोरीला त्यांच्या घरच्या एका उत्सवाला उपस्थित राहिलो. संपूर्ण घराणं उच्चविद्याविभूषित, पण शालीन. त्यांच्या घराशेजारच्या नवदुर्गेच्या मंदिरात आम्ही त्या संध्याकाळी शांत बसलो होतो. आता त्या फक्त आठवणीच राहतील.

बोरकर गुरुजींच्या सहवासानं एक ऊर्जा मिळाली, श्रुतींच्या प्रवासातला एक नवा मार्ग मिळाला. त्या संयमित साथसंगतीनं मायेची ऊब मिळाली. ही शिदोरी घेऊन आता पुढे जायचं. ज्याप्रमाणे गुरुजींनी कुणाचं तरी कार्य जिवापाड जपलं, तसेच गुरुजींचं कार्य त्यांच्यापश्चात अबाधित राहावं म्हणून प्रयत्नशील राहायचं. गुरुजी पितृपक्षात कालवश झाले. हिंदू धर्मशास्त्रातल्या मान्यतेनुसार या पुण्यकाळात स्वर्गाचे दरवाजे उघडे असतात. गुरुजींना विनाअडथळा तिथं प्रवेश मिळाला. जसे ते इथं नवनवे मार्ग शोधत पुढे गेले तसेच यापुढेही सदैव नव्याच्या शोधात राहतील.

गुरुजींसाठी एवढंच म्हणेन, ‘शुभास्ते पंथानाम् सन्तु..’

mukulshivputra@gmail.com

First Published on October 7, 2018 12:21 am

Web Title: senior singer pt mukul shivputra pay tribute to renowned harmonium exponent pt tulsidas borkar