13 August 2020

News Flash

कलात्मक दिवाळी

दिवाळी दिव्यांचा उत्सव, प्रकाशाचा सण. दिवाळीची खरी गंमत घर-जागा सुशोभित करण्यातच आहे.

छाया सौजन्य : ईशान्य मॉल फाउंडेशन, पुणे

दिवाळी दिव्यांचा उत्सव, प्रकाशाचा सण. दिवाळीची खरी गंमत घर-जागा सुशोभित करण्यातच आहे. त्यासाठी मोठं घर किंवा स्वतची स्वतंत्र खोलीच असली पाहिजे असं नाही. अगदी खोलीचा छोटा कोपरा मिळाला, तरी त्यातून तुम्हाला दिवाळीचा माहौल सहज उभा करता येईल. हल्ली तर कॉर्पोरेट हाऊसेसमध्ये ऑफिसचं क्युबिकल, कॉर्नर सजावटीच्या देखील स्पर्धा होतात. सजावटीच्या सामानासाठी बाजार पालथा घालण्याआधी काय लक्षात घ्याल?

दिवाळी म्हणजे रोषणाई, दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, दिवाळी म्हणजे सौंदर्य आणि कलेचा उत्सव. म्हणूनच दिवाळीपूर्वी घराची साफसफाई, थोडीफार सजावट करतात, सडा-रांगोळी, आकाशकंदील, पणत्या यांची पारंपरिक सजावट केली जाते. दिवाळीची खरी गंमत असं घर-जागा सुशोभित करण्यातच आहे. स्वत:चं मोठं घर किंवा खोलीच असली पाहिजे असं नाही. अगदी छोटा कोपरा जरी तुम्हाला तुमच्या आवडीची सजावट करायला मिळाला, तरी त्यातून दिवाळीचा माहौल सहज उभा करता येईल. मन प्रसन्न करणारी, साधी पण कलात्मक सजावट अशी छोटय़ा कोपऱ्यातही करता येते आणि बडय़ा महालातही. दिवाळीच्या निमित्ताने घराची, आपल्या खोलीची, ऑफिसच्या क्युबिकलचीही सजावट जरा हटके करावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. हल्ली तर क्युबिकल डेकोरेशनच्या स्पर्धाही मोठय़ा कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आयोजित केल्या जातात. तेव्हा मग सजावटीच्या सामानासाठी बाहेर पडल्यावर बाजारात नवं काय आणि आपलं डेकोरेशन युनिक कसं होईल याचे विचार सुरू होतात.
यंदा बाजारात दिसणाऱ्या सजावटीच्या वस्तूंमध्ये भर आहे तो विविध रंगांत रंगवलेल्या पणत्या, दिवे आणि कुंदनच्या रांगोळ्यांचा. मातीच्या पणत्यांवर रंगीबेरंगी नक्षी काढून त्या मणी, आरसे, कुंदन आणि टिकल्या लावून सजवलेल्या दिसताहेत. अशा पणत्या आपण घरच्या घरीदेखील सजवू शकतो. बाजारातून आणलेल्या मातीच्या पणत्या आधी काही तास पाण्यामध्ये भिजवून ठेवाव्यात. म्हणजे त्यावर लावलेला रंग जास्त शोषून घेतला जात नाही. त्यानंतर हवं तर पहिला हात गेरूच्या रंगाने रंगवून घ्यावा. हा बेस तयार झाल्यावर ऑइल पेंट आणि ब्रशचा वापर करून पणत्या रंगवायला हरकत नाही. रंग वाळल्यानंतर त्यावर मणी, आरसे, कुंदन चिकटवून पणत्या आणखी सुंदर बनवता येतात. अशा रेडिमेड रंगवलेल्या पणत्या बाजारात आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध आहेत. तुम्हीही घरच्या घरी अशा कलात्मक पणत्या बनवून त्या आप्तेष्टांना भेट देऊ शकता.
नेहमीच्या रंगीबेरंगी झिरमिळ्यांच्या आकाशकंदिलाखेरीज बाजारात अनेक नावीन्यपूर्ण डिझाइन्सचे आकाशदिवे आले आहेत. दिवाळीनंतरही सीटिंग रूमची शोभा वाढवू शकेल असा झुंबरवजा आकाशकंदील यंदा नव्याने दिसतोय. रंगीत कागदाचे गोल आकाशकंदील, हॅण्डमेड पेपरपासून बनवलेले दिवे तुम्ही वर्षभर वापरू शकता. हँगिंग लॅम्प म्हणून होम डेकॉर सेक्शनमध्ये मिळणारे दिवे आकाशकंदील म्हणून दिवाळीत लावायला उत्तम आहेत. त्यानंतर ते दिवाणखान्याची शोभा वाढवतील.
या वर्षी कुंदन रांगोळी हा प्रकार मोठय़ा प्रमाणावर दिसतोय. विविध आकाराच्या फायबर किंवा प्लॅस्टिकच्या बेसवर कुंदर, खरडे, मणी आणि टिकल्या चिकटवून ही रांगोळी केली जाते. बाजारात अशा तयार तुकडय़ांचे सेट मिळतात. साधारण १५०-२०० रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंतच्या रेंजमध्ये हे सेट उपलब्ध आहेत. जमिनीवर, टेबलावर, चौरंगावर हवी तिथे, हव्या त्या कॉम्बिनेशनने हे तुकडे लावायचे की, ही रांगोळी तयार. विविध रंगांचे, न सजवलेले तुकडेही बाजारात अगदी स्वस्तात मिळतात. कलाकार मंडळींनी आपल्या पसंतीनं त्यावर मणी, मोती, कुंदन चिकटवून घरच्या घरी रांगोळी तयार करण्यासही हरकत नाही.

क्रिएटिव्ह गिफ्टिंग
vv02सजावटीच्या साहित्यानं आणि भेटवस्तूंनी बाजार फुलला असला तरी आपण आपल्या हातांनी काही कलात्मक वस्तू बनवून मित्र-मंडळींना गिफ्ट द्यावी, असं वाटत असेल आणि हातात थोडीफार कला असेल अशा कलाकार मंडळींसाठी या टिप्स..
ल्ल ओरिगामी किंवा किरिगामी हस्तकलेचा वापर करून ती सजावट कागदावर चिकटवून वॉल हँगिंग तयार करा. ओरिगामी म्हणजे कागदाच्या घडय़ा करून बनवलेल्या वस्तू आणि किरिगामीमध्ये कागद कातरून घडय़ा केल्या तरी चालतात. किरिगामीतून कागदी दिवे, हँिगग लॅम्प्स, बाहुल्या, कर्टन डेकोरेशन तयार करू शकता. या संदर्भातले अनेक व्हिडीओ यूटय़ूबवर उपलब्ध आहेत.
ल्ल दिवाळीच्या पणत्या खरेदी करायला कुंभारवाडय़ात जाणार असाल तर एखादं छान आकाराचा मातीचा पॉट घेऊन या. त्यावर पेंटिंग करून, सिरॅमिक काम करून छान कॉर्नर पीस बनवता येईल. अ‍ॅक्रॅलिक कलरचा बेस मारून त्यावर वारली कलाकृती तुम्ही काढू शकता. तुमच्या ऑफिसच्या केबिनचा कोपरा किंवा खोलीचा कोपरा या एका पॉटनं अगदी उठून दिसेल.
ल्ल दिवाळीच्या शुभेच्छा आणि फराळासोबत तुम्ही बनवलेलं पेंटिंग दिलंत तर लोकांना नक्कीच आवडेल. त्यासाठी इंटरनेटवरून थोडे रेफरन्स घेऊन मधुबनीचे काही सिम्पल फॉर्म्स, नक्षीकाम हॅण्डमेड पेपरवर काढा आणि ते अ‍ॅक्रेलिक कलर्स किंवा मेटल कलर्स वापरून पेंट करा. पेंटिंग झाल्यावर त्याच्या बाजूला १-१ इंचाची जागा ठेवून फ्रेम करून घ्या. – गौरी संत
प्रतिनिधी – viva.loksatta@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2015 1:02 am

Web Title: artistic diwali
Next Stories
1 व्हिवा दिवा : सुचेता पाटोळे
2 आयलंड पोझिशन
3 गुंतवणुकीचा गुंता उलगडणार!
Just Now!
X