23 January 2018

News Flash

‘ताण’लेल्या गोष्टी : डाएटिंग की आजार?

डाएटिंग आणि अ‍ॅनोरेक्सिया वरवर दिसायला सारखे असले तरी त्यांच्यात खूप महत्त्वाचा फरक आहे.

डॉ. वैशाली देशमुख | Updated: August 11, 2017 1:05 AM

परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे पण तोलही जायला नको. करता येईल असं?

स्ट्रेसचा विषय समजावून देणाऱ्या गोष्टी दर आठवडय़ाला…

अनुष्का इंजिनीअरिंगला आहे. एक हुशार, सिन्सिअर मुलगी म्हणून ती सगळ्यांना माहिती आहे. शाळेत नेहमी टॉपर. व्यवस्थित तर इतकी की, सगळं अगदी जागच्या जागी. मैत्रिणी तिला नेहमी चिडवतात परफेक्शनिस्ट म्हणून. आणि एखादी गोष्ट एकदा मनावर घेतली की, ती तडीला नेल्याशिवाय तिला चैन पडत नाही. आई-बाबा म्हणतात, ‘किती टेन्शन घेतेस अनुष्का? तुझ्यामुळे आम्हालाही उगीचंच टेन्शन येतं.’ अकरावीत असताना डान्सचा प्रोग्रॅम होता तर त्याआधीचे काही दिवस तिनं इतकी जीव तोडून प्रॅक्टीस केली की, पायाला फोड आले. तिच्या या टोकाला जायच्या सवयीची आईला काळजी वाटते फार. असतो एकेकाचा स्वभाव म्हणून सुरुवातीला ती दुर्लक्ष करायची, पण गेल्या सहा महिन्यांपासून तिला जरा जास्तच काळजी वाटायला लागलीये.

सुरुवात खरं तर झाली शाळेत असताना. तेव्हा गुबगुबीत होती ती. अचानक गप्प गप्प राहायला लागली म्हणून आईनं खोदून खोदून विचारलं तेव्हा कळलं की, मुलं तिला ‘मोटी’ म्हणून चिडवतात. मग ती खाण्यावर कंट्रोल करायला लागली. रोज न चुकता व्यायामही करायला लागली. ‘अरे वा, मस्त बारीक झालीस की अनुष्का!’ अशा कॉम्प्लिमेंट्स मिळायला लागल्या तिला, पण खाण्यापिण्याचं हे प्रस्थ वाढतच गेलं. हळूहळू ती इतकं कमी खायला लागली की, तिचं वजन झपाटय़ानं कमी व्हायला लागलं. दर वेळी खाऊन झालं की, ती बाथरूममध्ये जायची. ते थोडंसं खाणंही तिला जास्त वाटायचं आणि ती ते उलटी करून काढायची. सारखी वजन करून बघायची. हळूहळू तिचे गाल आत गेले, केस, त्वचा रखरखीत झाले. चेहऱ्यावरची सगळी रया गेली तिच्या. सुरुवातीला तिच्या वेट-लॉसचं कौतुक करणाऱ्यांना आता तिला पाहून धक्का बसायला लागला. सहा महिने झाले, तिची पाळी आलेली नाही. एकदा दोनदा चक्कर येऊन पडली. अंगातलं रक्तही कमी झालंय.

अनुष्काला जो त्रास होतोय, तो आजार आहे का? की नुसतीच आहाराची वाईट सवय? हे नुसतं तात्पुरतं फॅड नाहीये. हा एक मानसिक आजार आहे आणि त्याचं नाव आहे ‘अ‍ॅनोरेक्सिया नर्वोजा’(anorexia nervosa). ज्यांना हा त्रास होतो त्यांना वजन वाढण्याची, खाण्याची चक्क भीती वाटते. त्यासाठी ते सतत आपण काय खाल्लं, किती खाल्लं, त्यात किती कॅलरीज होत्या याचा हिशेब करत बसतात. सतत वजन करत राहतात. अनुष्कानं तर चक्क अशी डायरी ठेवायला सुरुवात केली होती. कितीही बारीक झालं तरी त्यांचं समाधान होत नाही. मनाचा आणि शरीराचा किती जवळचा संबंध आहे हे या आजारातून स्पष्ट दिसतं. पूर्वीपेक्षा या आजाराचं प्रमाण आता जास्त वाढलंय असं वाटतंय. आधी फक्त पाश्चिमात्य देशांमध्येच अशा केसेस दिसायच्या. आता मात्र आशियात आणि भारतातही त्या दिसू लागल्यात. कारणं बरीच आहेत. आपली बदललेली जीवनशैली, ग्लोबलायझेशन, साईझ झिरोचं फॅड, दिखाऊपणावर नको इतका जोर, सोशल मीडियाचं वर्चस्व.. शिवाय जाणीव-जागृती झाल्यामुळेही निदानाचं प्रमाण वाढलंय. अनुष्काच्या आईनं तिला रागावून पाहिलं, धाक घातला, इतकं खाल्लंच पाहिजे अशी सक्ती केली. पण कशाचा उपयोग झाला नाही. मुळात आपण फार कमी खातोय किंवा आपल्याला काही प्रॉब्लेम आहे हेच अनुष्काला मान्य नव्हतं आणि हेही या आजाराचं टिपिकल लक्षण आहे. तिचं म्हणणं होतं की, ती फक्त डाएटिंग करतेय.

डाएटिंग आणि अ‍ॅनोरेक्सिया वरवर दिसायला सारखे असले तरी त्यांच्यात खूप महत्त्वाचा फरक आहे. आपण चांगलं दिसावं, छान कपडे घालता यावेत यासाठी डाएटिंग केलं जातं. पण अ‍ॅनोरेक्सियामध्ये बारीक होणं, आणखी बारीक होणं हाच एक ध्यास असतो. आणि त्याचं मूळ असतं मनातल्या विचारांमध्ये. स्वत:विषयी खूप कमीपणाची भावना असते. काही वेळा डिप्रेशन किंवा मंत्रचळेपणा, ऑब्सेशन यांसारखे मानसिक आजार असतात. मॉडेल्स, डान्सर्स, जिम्नॅस्ट्स अशा प्रोफेशन्स असलेल्या व्यक्तींमध्ये याचं प्रमाण जास्त दिसून येतं. कारण तिथे दिसण्याला अतिशय महत्त्व दिलेलं असतं. झिरो फिगर असलेल्या एखाद्या रोल मॉडेलच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी काही जण कमी खायला सुरुवात करतात. ‘बारीक म्हणजे देखणं’ असा दबाव मुलांपेक्षा मुलींवर जास्त असल्यामुळे असेल कदाचित, पण मुलींमध्ये या आजाराचं प्रमाण अधिक आहे. काही जेनेटिक कारणंही असतात.

आपल्याला काही तरी त्रास आहे हे त्या व्यक्तीनं मान्य केल्याशिवाय यावर उपचार करता येत नाहीत. हा एक गंभीर आजार आहे. औषधं-गोळ्या द्यायच्या नसल्या तरी उपचार खूप गुंतागुंतीचे असतात आणि चिवटपणे करायला लागतात. डाएटिशियनच्या मदतीनं योग्य तो आहार हळूहळू वाढवत न्यावा लागतो. कमी आहारामुळे काही गुंतागुंती झाल्या असतील तर त्या निस्तराव्या लागतात. आणि मुख्य म्हणजे काऊन्सेलिंग आणि मानसोपचार करावे लागतात. जितक्या लवकर हा आजार लक्षात येईल तितका उपाय परिणामकारक होतो. तुमच्या माहितीत कुणाला असा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

viva@expressindia.com

First Published on August 11, 2017 1:05 am

Web Title: dieting stress issue anorexia nervosa dieting problem
  1. No Comments.