11 December 2017

News Flash

‘ताण’लेल्या गोष्टी : रॅट पार्क

मादकड्रग घेतला की आपल्या मेंदूमध्ये रासायनिक बदल होतात.

डॉ. वैशाली देशमुख | Updated: September 29, 2017 12:32 AM

परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे, पण तोलही जायला नको. करता येईल असं? स्ट्रेस मॅनेजमेंटच्या टिप्स देणाऱ्या गोष्टी दर आठवडय़ाला..

प्रोफेसर ब्रूस अलेक्झांडर पिंजऱ्यातल्या त्या उंदराकडे बघत होते. पिंजऱ्यात दोन बाटल्या टांगल्या होत्या. एकात होतं पाणी आणि एकात होते अमली द्रव. त्या छोटय़ाशा पिंजऱ्यात एकटाच होता हा आपला उंदीर. आणि त्याला चटक लागली होती त्या मादकद्रवाची. ती हळूहळू इतकी वाढली, की तो एक दिवस ओव्हरडोस होऊन मरून गेला.

आता त्यांनी दुसरा एक पिंजरा तयार केला. त्यात बनवलं एक ‘रॅट पार्क’. भल्या मोठय़ा या पिंजऱ्यात अनेक उंदीर होते. त्यांना खेळायला खेळणी होती, भरपूर आवडता खाऊ  होता. या पार्कमधले उंदीर एकमेकांशी मनसोक्त मस्ती करायचे, हवं तितकं खायचे, खेळायचे. त्यांना मात्र पाणीच हवं असायचं प्यायला. दुसऱ्या बाटलीकडे ते चक्क दुर्लक्ष करायचे. मग प्रोफेसर ब्रूसनी दुसऱ्या एका एकटय़ा, व्यसनी उंदराला रॅट पार्कमध्ये टाकलं. आणि काय आश्चर्य! तोही पाहता पाहता ड्रग्ज सोडून पाणी प्यायला लागला. असं कसं बरं झालं असेल? खरं सांगायचं तर त्याच्या नंतर केलेल्या प्रयोगांमध्ये असेच्या असे रिझल्ट्स मिळालेले नाहीत. पण तरीही प्रोफेसर ब्रूस यांचं संशोधन फार महत्त्वाचं आहे. व्हिएतनामशी अमेरिकेने जेव्हा युद्ध केलं, तेव्हा त्यातले बरेच सैनिक ड्रग्ज घ्यायला लागले. इतके की अमेरिकन सरकारला मोठी चिंता पडली इतक्या अ‍ॅडिक्टना कसं सांभाळायचं म्हणून. पण गंमत अशी झाली की जसे हे सैनिक आपल्या देशात, आपल्या माणसांत परत आले, तसं त्यांनी आपोआपच ते घेणं थांबवलं. ब्रूस यांच्या निष्कर्षांला खतपाणी घालणारीच ही घटना होती.

व्यसन हे एक कोडं आहे. जगभरातले लोक त्याच्याशी लढा द्यायचा प्रयत्न करतायेत. पण तो अयशस्वी होतोय. उलट ड्रग माफियांची मोठमोठी साम्राज्यं तयार झालीयेत. पैशाची सर्वात जास्त उलाढाल यातच होतेय. देशच्या देश नष्ट व्हायच्या मार्गावर आहेत. आपल्या भारतात पंजाबसारखी राज्यं एकेकाळी हिरवीगार आणि प्रॉस्परस होती. पण तीच आता व्यसनात बुडालेल्या तरुणाईला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात खचून गेलीयेत. त्यांची प्रॉडक्टिव्हिटी रसातळाला गेलीय. का असे अपयशी ठरतोय आपण? ड्रग्जचा सामना करताना आपण साप साप म्हणून भुई धोपाटतोय की काय? ड्रग्जवर बंदी घालणे, त्यांच्या विक्रीवर बंधनं घालणे, अ‍ॅडिक्टना वाळीत टाकणे असे मार्ग उपयोगी पडत नाहीयेत असं दिसतंय. आपल्या आजूबाजूची परिस्थिती तशीच राहतेय.

मग प्रश्न असा पडतो की, व्यसन नक्की कशामुळे लागतं? अर्थातच अमली पदार्थामुळे, ड्रग्जमुळे, बरोबर? पण तसं असेल तर त्या रॅट पार्कमधले उंदीर कसे व्यसनी झाले नाहीत? त्या दोन गटांमध्ये फरक इतकाच होता की, या उंदरांची मानसिक स्थिती आणि सभोवतालची परिस्थिती वेगवेगळी होती!

मादकड्रग घेतला की आपल्या मेंदूमध्ये रासायनिक बदल होतात. डोपामिन नावाचं केमिकल ती विशिष्ट नशा देतं. याचा अर्थ कुठलीही गोष्ट, जी मेंदूतलं डोपामिन वाढवेल, ती नशेसारखा अनुभव देईल. म्हणूनच काही लोकांना जुगार खेळून, काहींना मारामारी केली तरी, तर काहींना मोबाइल गेम्स खेळून नशा चढते, त्याची चटक लागते. याउलट काही जण पॉझिटिव्ह गोष्टी करून हाच आनंद मिळवतात. म्हणजे फुटबॉल खेळणे, ट्रेकिंग, चित्र-डान्स सारखी एखादी क्रिएटिव्ह गोष्ट करणे, वगैरे. दोस्तांशी गप्पा, सभोवतालचं आनंदी वातावरण, मनासारखं काम, व्यायाम अशा अनेक गोष्टी आतून आनंदाचा अनुभव देतात आणि डोपामिनचं प्रमाण वाढवतात.

अ‍ॅडिक्शन हा सोशल आणि मानसिक प्रॉब्लेम आहे हे आता पटलंय सगळ्यांना. या उंदरांसारखं शरीरानंच एकटं राहायला हवं असं नाही, इमोशनल किंवा मानसिक एकटेपणाही यासाठी पुरेसा आहे. एकटेपणाचा हा अदृश्य पिंजरा त्या उंदरांसारखाच माणसाला बिथरवतो. त्या फिलिंगशी सामना करण्याचा एक सोपा पण संकुचित मार्ग म्हणजे अ‍ॅडिक्शन. त्यात अडकू नये यासाठी नुसतं ड्रग्जवर बंदी घालणं पुरेसं नाहीये.

तुम्ही तरुण लोक काय बरं करू शकाल यासाठी? तुम्हाला स्वत:लाही या सगळ्यापासून वाचवायचंय आणि परिस्थितीही बदलायचा प्रयत्न करायचाय. उंदराच्या उदाहरणावरून काहीतरी शिकायला हवं आपण. एकटं, समाजापासून फटकून राहून काही चालणार नाही. एखादा मित्र असा राहात असेल तर त्यालाही मदत करायला हवी. छोटय़ा छोटय़ा दु:खांना कुरवाळत बसण्याइतकं मन रिकामटेकडं कशाला ठेवायचं? त्यापेक्षा कुठल्या ना कुठल्या कामात त्याला गुंतवून ठेवायला हवं. व्यसनात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांच्यावर औषधोपचार करायला हवेतच पण त्याचबरोबर त्यांना आपल्यात सामावून घ्यायला हवं, त्यांना नोकरीधंद्यला लावायला हवं. त्यांच्या बाबतीतला आपला दृष्टिकोन बदलायला हवा. थोडक्यात छोटय़ाशा पिंजऱ्यात राहणाऱ्या एकाकी उंदराला ‘रॅट पार्क’मध्ये मोकळं सोडायला हवं.

viva@expressindia.com 

First Published on September 29, 2017 12:32 am

Web Title: drugs issue in india drug addiction drug side effects stress management