पडद्यामागे रनवेचं नाटय़ सांभाळणाऱ्यांना रनवे कोरिओग्राफरम्हणतात. रनवेगुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीरज गाबा आणि लुबना अडम यांच्याकडून पडद्यामागच्या या नाटय़ाविषयी जाणून घेणार आहोत..

दर वर्षीप्रमाणे यंदाही ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारीदरम्यान ‘लॅक्मे फॅशन वीक समर रिसोर्ट – २०१८’ हा फॅशनचा मोठा सोहळा मुंबईत रंगणार आहे. वर्षांतून दोनदा होणाऱ्या या फॅशन शोबरोबरच वर्षभरात अनेक फॅशन शो, फॅशन टीव्ही शो होत असतात. रॅम्पवर व्यवस्थित, रांगेत, एकामागोमाग चालणाऱ्या तर कधी वेगवेगळ्या पद्धतीने रॅम्पवर वॉक करणाऱ्या मॉडेल्सकडे बघून आपल्याला खूप आश्चर्य वाटतं. एवढय़ा सगळ्या जणी काही सेकंदांत झरझर कपडे बदलून आत्मविश्वाने सगळ्यांसमोर येत न चुकता, न पडता मागे वाजणाऱ्या गाण्याच्या प्रत्येक बीटनुसार वॉक करीत एक अ‍ॅटिटय़ूड नजरेत घेऊन सगळ्यांसमोर कशा येतात? पडद्यामागे हे नाटय़ सांभाळणाऱ्यांना ‘रनवे कोरिओग्राफर’ म्हणतात. रनवेगुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीरज गाबा आणि लुबना अडम यांच्याकडून पडद्यामागच्या या नाटय़ाविषयी जाणून घेणार आहोत..

कोणत्याही फॅशन शोचा गाभा म्हणजे रनवे. आणि त्याचे उद्दिष्ट डिझायनरने बनवलेले कपडे व्यवस्थितपणे प्रेक्षकांना दाखवायचे. आणि यासाठी महत्त्वाचा ठरतो तो रनवे वॉक. रनवेवर कधी यायचं, कसं यायचं, कोणापाठोपाठ कोणी यायचं, किती मिनिटं थांबायचं, कशी पोज द्यायची या सगळ्या गोष्टी रनवे कोरिओग्राफर ठरवतो. डिझायनरचे कलेक्शन सुंदररीत्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम रनवे कोरिओग्राफरला करावं लागतं. यासाठी काही स्टेप्स आणि काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्याबद्दल नीरज गाबा सांगतात, ‘रनवे कोरिओग्राफी ही एखाद्या नाटकापेक्षा कमी नसते. प्रत्येक कलेक्शनची स्वत:ची एक स्टोरी असते. ती त्याच्या कपडय़ातून, सिल्हाऊट्समधून, अ‍ॅक्सेसरीजमधून, रंगांमधून दिसून येते. डिझायनरच्या अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर हे कलेक्शन तयार होतं. कपडय़ांसोबतच त्याचं कलेक्शन, त्याचा त्यामागचा दृष्टिकोन, त्याची प्रेरणा रॅम्पवर कोरिओग्राफीच्या माध्यमातून मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मॉडेल, त्यांचा मेकअप त्यांची स्टाइल, शोचं संगीत (लाइव्ह किंवा रेकॉर्ड), रॅम्प, रॅम्पची जागा, लाइट, मॉडेलच्या मूव्हमेंटस्, सेट प्रॉडक्शन या सगळ्या गोष्टी एकत्र करून, त्या नीट लक्षात ठेवूनच कोरिओग्राफी केली जाते. या सगळ्या गोष्टींची सुरुवात डिझायनरच्या कलेक्शनच्या माहितीने होते’. तर डिझायनरचं कलेक्शन समजून घेऊनच मॉडेलचा रॅम्पवॉक ठरवला जातो. वॉकसाठी मॉडेलची स्टाइल आणि संगीत खूप महत्त्वाचं ठरतं, असं लुबना म्हणतात.

डिझायनरला त्यांच्या कलेक्शनमधील महत्त्वाचे फीचर नेहमीच ठळकपणे मांडायचे असतात. कधी गार्मेट्सची नेकलाइन तर कधी दागिने, अ‍ॅक्सेसरीज अशा कोणत्याही गोष्टी डिझायनरला ठळक कराव्याशा वाटतात. आणि याची पूर्ण जबाबदारी रनवे कोरिओग्राफरवर असते. यासाठी रनवे कोरिओग्राफर काय करतात याची माहिती देताना, ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ठळकपणे मांडायच्या आहेत त्या समोर ठेवून रनवेच्या पद्धती ठरवल्या जातात. यासाठी गारमेंट्सच्या फिटिंगच्या दरम्यान डिझायनर, स्टायलिस्ट यांच्याशी चर्चा करून कोणत्या गोष्टी लोकांसमोर आणायच्या, करायच्या हे ठरवलं जातं. आणि त्यानुसार आम्ही मॉडेलच्या पोज ठरवतो, असं गाबा म्हणतात. पोजबरोबरच रॅम्पवर येण्याचा लाइनअपसुद्धा महत्त्वाचा ठरतो. लाइनअप करताना कलेक्शनचे रंग, गारमेंटवरचे डिटेल्स, त्याची स्टोरी विचारात घेतली जाते. आताच्या दिवसांत वापरल्या जाणाऱ्या मोठय़ा एलईडी लाइट्स गारमेंटवरील महत्त्वाच्या गोष्टी हायलाइट करायला खूप मदत करतात, अशी माहिती गाबा यांनी दिली.

लुबना यांच्या मते कोणतंही गारमेंट सुंदररीत्या प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी ते परिधान करणाऱ्या मॉडेल खूप महत्त्वाच्या असतात. मॉडेल्सना त्यांनी घातलेलं गारमेंट प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. त्यामुळे कलेक्शन हायलाइट करताना प्रत्येक गारमेंट कोणत्या मॉडेलवर शोभून दिसेल याचा विचार करावा लागतो. या सगळ्यासोबतच त्यांचा वॉक, फोटोसाठीची पोज हायलाइट करण्यासाठी महत्त्वाची ठरते.

आपल्याकडे फॅशन शो अनेक वर्षांपासून होत आहेत. काळानुसार त्यात बदलही होत आहेत. साहजिकच रनवेमध्येही गेल्या पाच वर्षांत खूप बदल झाले आहेत. रॅम्पवर येऊन फक्त वॉक करण्यापुरताच फॅशन शो आता मर्यादित राहिलेला नाही. आताच्या काळात तुम्हाला रॅम्पवर छोटय़ा नाटकापासून ते नृत्यापर्यंत काहीही दिसू शकतं. याच बदलाबद्दल नीरज गाबा सांगतात, शोचा कालावधी आता कमी झाला आहे. फक्त १५ ते १७ मिनिटांचे शो आता होऊ  लागले आहेत. याशिवाय रॅम्पच्या लाइटस्मध्ये बरेच बदल झाले आहेत. लेजर, शर्पीस, मूव्हिंग हेड्स लाइटमुळे शोचा अनुभव हा सगळ्यात उत्तम, देखणा असा असतो. शोच्या जागा आता फक्त मोठय़ा ऐतिहासिक जागांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. आता त्यांची जागा जुन्या मिल्सनी, पार्किंग लॉटने, जहाज अशा जागांनीसुद्धा घेतली आहे. यामुळे शोमध्ये नाटय़ येतं. याशिवाय, रॅम्पवॉकच्या मार्गामध्येही बदल झाला आहे. आता मॉडेल प्रेक्षकांमधूनही वॉक करीत येऊ  शकतात. लुबना यांचं मत थोडं वेगळं आहे. त्यांच्या मते गेल्या पाच वर्षांमध्ये रनवे आणि रॅम्पवॉक यात फार बदल झालेला नाही. परंतु प्रोडक्शन लेव्हलमध्ये खूप बदल झाले आहेत. मोठय़ा लेव्हलवर आता प्रोडक्शन होऊ  लागलं आहे. यासोबतच साऊं ड सिस्टीममध्येही मोठा फरक पडला आहे, त्यामुळे रॅम्पवॉक जास्तीत जास्त आकर्षक-परिणामकारक होतो आहे. आम्ही वेगवेगळ्या ग्राफिक आणि मटेरियलचा वापर करून शोची रंगत वाढवण्याचा प्रयत्न करतो. अर्थात, रनवेवर किंवा मॉडेलच्या रॅम्पवॉकमध्ये कितीही बदल केले तरी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे डिझायनर्सचं कलेक्शन आणि मॉडेलचा आत्मविश्वास.. याबद्दल या दोघांचंही दुमत नाही. पण हे कलेक्शन उठावदारपणे पोहोचवण्यासाठी रनवे कोरिओग्राफरची जबाबदारी आधीपेक्षा दुपटीने वाढली असल्याचं ते सांगतात.

viva@expressindia.com