रस्त्यावरच्या महागडय़ा आलिशान गाडय़ांकडे बघत ‘जिंदगी में एक दिन ऐसी गाडी मेरे पास होगी’ असे डायलॉग (मनातल्या मनात) म्हणत किती तरी वेळा आपण उसासे टाकलेले असतात. टीव्हीवरच्या जाहिरातीत दिसणारे ते चमचमणारे दागिने हवेहवेसे वाटतात. मालिका, चित्रपटांमधलं डिझायनर वेअर बघितलं की, ‘काश.. ये मेरे पास भी होते’ असं वाटतंच. आपला ‘क्सासी’ चॉइस आणि बजेट याचं प्रमाण कायमच व्यस्त असतं, त्याला कोण काय करणार? पण नव्या पिढीने आपल्यापुरतं याचं उत्तर शोधलंय. ही पिढी जगतेय वर्तमानकाळात. ‘जिंदगी में एक दिन’चं लॉजिक त्यांना मान्य नाहीय आणि म्हणूनच मनमुराद जगण्यासाठी (थोडक्यात चंगळ करण्यासाठी) काही ना काही ‘जुगाड’ ते करतातच. या जुगाडाचाच एक भाग म्हणून एक नवा ट्रेण्ड रुजू पाहतोय.. ‘रेण्टेड लाइफस्टाइल’चा.
लक्झरी शॉपिंगचं प्रमाण हल्ली वाढलंय. लक्झरी ब्रॅण्ड्स भारतात उपलब्ध व्हायला लागले त्याला आता जमाना झाला. पण गेल्या काही वर्षांत नवश्रीमंत मध्यमवर्ग उदयाबरोबर या लक्झुरिअस लाइफस्टाइलची जवळून ओळख झाली. आता याच लाइफस्टाइलचा नाद लागलाय. लक्झरी वॉचेस, लक्झरी कार, लक्झरी स्मार्टफोन्स सगळं काही आलिशान, चकाचक, क्लासी हवं, असं म्हणणाऱ्यांची संख्या वाढतेय. पण या लक्झरीसाठी तेवढीच किंमत मोजायला लागते. काहींना ती परवडते, काहींच्या ती बजेटबाहेरची असते. मग ते पर्याय निवडतात वस्तू भाडय़ानं घेण्याचा. यालाच मगाशी रेण्टेड लाइफस्टाइल हा शब्द वापरला. या जमान्यात सगळं काही भाडय़ानं मिळतं. म्हणजे एखाद्या खास दिवसासाठी तुम्हाला महागडी डिझायनर साडी, ड्रेस, दागिने, लक्झरी वॉच, बॅग हवी भाडय़ानं मिळू शकते. तुमच्या आवडीची लक्झरी कारही तुम्ही भाडय़ाने घेऊ शकता. रेण्टेड लाइफस्टाइल गुड्स उपलब्ध करून देणाऱ्या सेवा अनेकांनी सुरू केल्या आहेत आणि त्याला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढतो आहे. ऑनलाईनच्या या जमान्यात अनेक नवे उमदे तरुण उद्योजक इ कॉमर्सला आपलंसं करताहेत आणि रेण्टेड लाइफस्टाइलच्या बिझनेसमध्ये उतरले आहेत. शहरी मराठी मध्यमवर्गापर्यंत ही नवी लाइफस्टाइल येऊन ठेपली आहे.
ठाण्याची गार्गी अष्टेकर म्हणाली, माझ्या दादाच्या लग्नासाठी मला डिझायनर लेहेंगा घालायचा होता. परंतु माझ्या बजेटमध्ये मला हवा तसा लेहेंगा मिळत नव्हता.असे कपडे आपण पुन:पुन्हा वापरू शकत नाही. त्यामुळे मी तो भाडय़ानं घ्यायचा ठरवला. सुंदर वर्क केलेला २० हजारांचा लेहेंगा मला तीन हजार रुपये भरून वापरता आला. त्याबरोबर ज्वेलरीसुद्धा मी भाडय़ानं घेतली होती.’
लक्झरी कार राइड
सेल्फ ड्रिव्हन कारमधून लाँग ड्राइव्हला जाणं हे अनेकांचं स्वप्न असतं. नव्याने रिलेशनशिपमध्ये अडकलेल्या अनेक कपल्सना यासाठी कार भाडय़ाने घ्यावीशी वाटते. पुण्या-मुंबईत अशा प्रकारे लक्झरी कार स्वत: चालवण्यासाठी भाडय़ाने घेणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे. व्हॅलेंटाइन डे, फ्रेंडशिप डेसारख्या ऑकेजन्सना किंवा जोडून आलेल्या सुट्टीच्या मुहूर्तावर अशा सेल्फ ड्रिव्हन रेण्टेड लक्झरी कारची मागणी वाढते, असं ‘झूमकार.कॉम’चे संस्थापक आणि ‘सीईओ’ ग्रेग मॉर्गन यांनी लोकसत्ता ‘व्हिवा’शी बोलताना सांगितलं. साधारण ताशी ५०-६० रुपयांपासून (यामध्ये पेट्रोल, जीपीएस आणि इन्शुरन्सच्या किमतीचा समावेश होतो.)अशा सेल्फ ड्रिव्हन कार भाडय़ाने मिळतात. लक्झरी कारसाठी अर्थात जास्त पैसे मोजावे लागतात. ‘सेल्फ ड्रिव्हन कार घेऊन रोमँटिक डेटला जाऊ इच्छिणाऱ्या अनेक जण लाँग वीकएण्डला कंपनीशी संपर्क साधतात. यामध्ये साधारण २० ते ३० वयोगटातील कपल्स अधिक असतात. महाबळेश्वर, माथेरान, लवासा, लोणावळा अशा ठिकाणी फिरायला जाण्यासाठी कार भाडय़ाने घेतल्या जातात,’ असं मॉर्गन म्हणाले. लक्झरी कारमध्ये तरुणाईची मागणी सगळ्यात जास्त मर्सिडीज हॅचबॅक कारला असते. ताशी १८० रुपयांपासून मर्सिडीजचं रेटकार्ड सुरू होतं, असंही त्यांनी सांगितलं. मर्सिडीज जीएलए, ए क्लास, ऑडी या गाडय़ांसाठीही विचारणा होत असते.
डिझायनर दागिने
लग्नासारख्या स्पेशल ऑकेजनला सर्वोत्तम तेच ल्यायला मिळावं अशी इच्छा हल्लीच्या तरुणींची असते. एखाद्या लग्नात मिरवलेला दागिना पुन्हा प्रत्येक फंक्शनला घालता येत नाही. अशा वेळी त्या ऑकेजनसाठी दागिने भाडय़ाने घेण्याचा पर्याय असतो. ‘रेण्टज्वेल’च्या प्रमुख तरुणा बियाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार कुंदन, प्रेशिअस स्टोन्स आणि नव्या पद्धतीच्या डिझायनर दागिन्यांना रेण्टल बिझनेसमध्ये मागणी असते. सगळ्या वयोगटातल्या स्त्रियांसाठी दागिने भाडय़ाने घेतले जातात. ‘आमच्याकडे ९९ रुपयांपासून काही हजार रुपयांपर्यंत दराने दागिने मिळतात. त्यासाठी दर दिवसाला नव्हे तर त्या ऑकेजनचा विचार करता भाडं आकारलं जातं. साधारण एक दागिना आम्ही ३ ते ७ दिवस ठेवून घेण्याची मुभा देतो. कारण लग्न समारंभासारख्या प्रसंगाची ती गरज असते. केवळ दिल्ली, मुंबईसारख्या मोठय़ा शहरांमधूनच नाही तर पुणे, नाशिक, नागपूर, नांदेड, जळगाव, औरंगाबाद, सोलापूरसारख्या शहरांमध्येही आमच्या दागिन्यांना मागणी असते. या छोटय़ा शहरांमध्ये उलट लोकांना अशा दागिन्यांचं जास्त अप्रूप असतं, कारण त्यांच्याकडे मर्यादित पर्याय उपलब्ध असतात,’ असं ‘रेण्डज्वेल’तर्फे सांगण्यात आलं.
शानदार पर्स
लक्झरी अ‍ॅक्सेसरीजमध्ये झोकदार बॅग, क्लच, पर्स यालाही मोठी मागणी असते. जिमी चू, मोशिनो, गुची, लुइ व्हिटन, फेंडी, जस्ट कॅव्हाली, गबाना या लक्झरी ब्रॅण्डच्या पर्सची किंमत ३० हजारांपासून सुरू होईन कित्येक लाखांपर्यंत पोचते. ‘शनेल’सारखे ब्रॅण्ड तर लाखांतच किंमत घेतात. प्रत्येक ड्रेसवर तीच बॅग घेऊन जाणं आजच्या तरुणीला शोभत नाही. म्हणून लक्झरी बॅग भाडय़ाने घेण्याचा पर्याय अनेक जणी स्वीकारत आहेत. बहुतेकदा अशा बॅग भाडय़ाने घेणाऱ्यांमध्ये सोशलाइट्समध्ये वावरावं लागेल अशा व्यवसायात असणाऱ्या नोकरदार महिलांचा समावेश असतो. आपला क्लास जपण्यासाठी, मोठय़ा फंक्शनला साजेशा पण अ‍ॅफोर्डेबल अ‍ॅक्सेसरीज असाव्यात म्हणून बॅग आणि दागिने भाडय़ाने घेतले जातात. ऑनलाइन बाजारातून मुख्यत: हे व्यवहार केले जातात. bag4aday.com या वेबसाइटच्या माध्यमातून दिल्लीच्या स्वपन तनेजा आणि कुकी सिंग या फॅशन डिझायनर्स आणि स्टाइलिस्टनी हा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला दिल्ली आणि दुबईपुरती मर्यादित असलेली त्यांची सेवा आता भारतातल्या बहुतेक सगळ्या मोठय़ा शहरांमध्ये सुरू झाली आहे. साधारण या लक्झरी बॅगचं भाडं ५०० रुपये दिवसाला यापासून सुरू होतं. घरपोच बॅग नेण्या-पोहोचवण्याची सोय यामध्ये असते. मुंबई-पुण्यातही बॅग भाडय़ानं देणाऱ्या छोटय़ा कंपन्या, संस्था सुरू झाल्या आहेत. फेसबुक पेजच्या माध्यमातून याविषयी प्रसिद्धी केली जातात.
डिझायनर वेअर
डिझायनर वेअर भाडय़ानं मिळण्याचा व्यवसाय तर आता चांगलाच फोफावलाय. या विषयावर ‘व्हिवा’मधून यापूर्वीही आम्ही माहिती दिली होती. ‘सत्यापॉल’, ‘मसाबा’सारख्या भारतीय डिझायनर्सच्या जोडीला अनेक परदेशी डिझायनर ब्रॅण्ड्स हल्ली या रेण्टेड डिझायनर वेअरच्या मार्केटमध्ये उपलब्ध झाले आहेत. http://www.secretwardrobe.in, the clothingrental.com, http://www.popindesigner.com या काही वेबसाइट्सवर असे वेडिंग ड्रेसेस, साडय़ा उपलब्ध असतात. त्यांच्याकडून फिटिंगही करून दिलं जातं. साडीबरोबर फिटिंगचं ब्लाउझ आणि मॅचिंग पेटिकोटही दिला जातो. रेण्टेड लाइफस्टाइल आता तरुणाईमध्ये रुळायला लागली आहे.
viva.loksatta@gmail.com