एअरटेल आणि व्होडाफोन आयडियानंतर आता रिलायन्सच्या जिओने देखील मोबाईल सेवांचे दर वाढवणार असल्याची मंगळवारी घोषणा केली. कंपनीच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. पीटीआयने याबाबत माहिती दिली आहे.

सर्वात स्वस्त दरात सेवा देणाऱ्या जिओने म्हटले, पुढील काही आठवड्यांमध्ये कंपनी मोबाईल सेवांचे दर वाढवणार आहे. दरम्यान, एकदिवसापूर्वीच भरती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने डिसेंबर महिन्यापासून त्यांच्या मोबाईल सेवांचे दर वाढण्याची घोषणा केली होती.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) मोबाईल सेवांच्या दरांमध्ये सुधारणा करण्यास प्रयत्नशील आहे. मात्र, ट्रायच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दूरसंचार कंपन्यांकडून सेवांच्या दरवाढीची अंमलबजावणी करण्याचा ट्रायचा अद्याप विचार नाही. सुरुवातीला कंपन्यांकडून करण्यात येणारी दरवाढ मर्यादेत आहे की नाही याची पडताळणी केली जाईल त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे जिओने म्हटले आहे.

अन्य कंपन्याप्रमाणेच आम्ही देखील सरकारसोबत काम करणार आहोत. टेलिकॉम उद्योगाला मजबूत करीत ग्राहकांच्या फायद्यासाठी नियामक व्यवस्थेचे पालन करणार आहोत. आम्ही पुढील काही आठवड्यांमध्ये सेवांची दरवाढ करणार आहोत मात्र, त्यामुळे ग्राहकांच्या इंटरनेट डेटाच्या उपयोगावर तसेच डिजिटायझेशनवर प्रतिकूल परिणाम होणार नाही याची देखील काळजी घेणार आहेत असे जिओने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.