आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन इंडिया आता ऑनलाइन मेडिसिन सेगमेंटमध्ये उतरली आहे. कंपनीने ऑनलाइन फार्मसी ही नवीन सेवा लाँच केली आहे.

बंगळुरूमधून अ‍ॅमेझॉन या सेवेची सुरूवात करणार आहे. नंतर येत्या काळात ही सेवा देशाच्या अन्य शहरांमध्येही सुरू केली जाईल. अ‍ॅमेझॉनकडून गुरूवारी याबाबत माहिती देण्यात आली.

“कंपनी आपल्या सर्व ग्राहकांची गरज पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. सध्या आम्ही बंगळुरूमध्ये अ‍ॅमेझॉन फार्मसी लाँच करत आहोत. याद्वारे ग्राहक प्रिस्क्रिप्शन आधारित औषधे घरबसल्या ऑर्डर करु शकतात. या सेवेअंतर्गत ग्राहकांसाठी औषधं, बेसिक हेल्थ डिव्हइस आणि प्रमाणपत्रधारक विक्रेत्यांकडून आयुर्वेदिक औषधे उपलब्ध असतील. करोना संकटकाळात ही सेवा ग्राहकांसाठी फायदेशीर ठरेल”, असे अ‍ॅमेझॉनच्या प्रवक्त्याने सांगितले.

करोना महामारीमुळे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासाठी बहुतांश लोकं ऑनलाइन सामान ऑर्डर करत आहेत. या संकटामुळे गेल्या काही महिन्यांत ऑनलाइन मेडिसिनच्या क्षेत्रात बरीच तेजी दिसून आली आहे. लोकं ऑनलाइन औषध खरेदीला प्राधान्य देत आहेत, याशिवाय ट्रीटमेंटसाठी देखील ऑनलाइन सल्ला घेतला जातोय. प्रॅक्टो, नेटमेड्स, 1mg, फार्मईजी आणि मेडलाइफ यांसारख्या स्टार्टअप्सकडे ऑनलाइन सेवांची मागणी वाढली आहे. अशातच आता अ‍ॅमेझॉननेही या क्षेत्रात उडी घेतली आहे.