घरोघरी आढळणाऱ्या दालचिनी या मसाल्याचा वापर अतिलठ्ठपणाविरोधात उपयुक्त ठरू शकतो, असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. दालचिनीमुळे चयापचय प्रक्रियेत सुधारणा होत असून यामुळे मेदयुक्त पेशींचा वापर शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो असा दावा या अभ्यासात करण्यात आला आहे. यापूर्वी केलेल्या अभ्यासात दालचिनीमध्ये आढळणाऱ्या ‘सिनामाल्डीहाइड’ या घटकामुळे दालचिनीला त्याची विशिष्ट चव प्राप्त होते, तर या घटकाचा प्रयोग उंदरावर केल्यानंतर त्यांच्यात अतिलठ्ठपणा आणि असामान्यरीत्या वाढणाऱ्या रक्तातील उच्च ग्लुकोजच्या पातळीला रोखणे शक्य असल्याचे आढळून आले. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील संशोधकांना ‘सिनामाल्डीहाइड’च्या प्रभावाचा अधिक अभ्यास करावयाचा असून हे लोकांसाठी उपयुक्त आहे का याचे संशोधन करावयाचे होते. दालचिनीमधील या विशिष्ट घटकामुळे चयापचय प्रक्रियेवर प्रभाव पडतो. उंदरावर त्याचा प्रभाव पडल्याचे प्रयोग झाल्यानंतर लोकांवर त्याचा कसा परिणाम होतो याचा अभ्यास आम्हाला करायचा होता, असे मिशिगन विद्यापीठातील संशोधन साहाय्यक प्राध्यापक जून वू यांनी सांगितले. यामध्ये दालचिनीमधील सिनामाल्डीहाइड मेदयुक्त पेशी किंवा ‘एडीओपोसाइट्स’ यांच्यावर थेट प्रक्रिया करित चयापचय क्रियेत सुधारणा करतो. यावेळी उष्मांक प्रक्रियेद्वारे चरबीयुक्त पेशींचा वापर शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी केला जातो. वू आणि त्यांच्या सहकार्यानी या घटकांची चाचणी विविध वयोगटांतील आणि वंशाच्या लोकांवर केली. चरबीयुक्त पेशींवर ‘सिनामाल्डीहाइड’चा वापर करून उपचार केल्यानंतर स्निग्ध पदार्थाच्या चयापचय प्रक्रियेसाठी कारणीभूत असणाऱ्या शरीरातील द्रव्यात आणि पेशींमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले. दालचिनीचा वापर आधीपासूनच आहारात होत असल्यामुळे लोकांना पारंपरिक औषधोपचाराच्या ऐवजी दालचिनीआधारित उपचारासाठी तयार करणे सोपे आहे, असे वू यांनी म्हटले. हा अभ्यास ‘मेटाबॉलिझम’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.