अनेकदा अपघात होतात, तेव्हा लगेच मेंदूचे स्कॅनिंग करण्याची सोय नसते पण आता मेंदूचे तत्काळ स्कॅनिंग करून त्रिमिती प्रतिमा देऊ शकणारे उपकरण ऑस्ट्रेलियात तयार करण्यात आले आहे.

ते सहजगत्या कुठेही नेता येते शिवाय त्यासाठी मेंदूला छेदही द्यावा लागत नाही.

यासाठीचे तंत्रज्ञान क्वीन्सलॅण्ड विद्यापीठ व एम व्हिजन मेडिकल डिव्हायसेस प्रा. लि या संस्थांनी विकसित केले असून त्यामुळे अनेकांचे प्राण वेळीच मेंदूची इजा नेमकी काय आहे. हे समजल्याने वाचणार आहेत.

अपघातातील व इतर मेंदू रुग्णांच्या पुनर्वसनासाठी येणारा खर्चही तुलनेने कमी होणार आहे. आपत्कालीन वैद्यकीय सेवेत त्याचा वापर करता येणार नसून जेथे प्रगत वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नाहीत, अशा ठिकाणीही त्याचा वापर करता येईल.

यात आयनीकरणाचा संबंध नसल्याने पुन:पुन्हा वापरले, तरी त्यामुळे मेंदूला धोका निर्माण होत नाही. यात अभिनव अलगॉरिथमचा वापर केला असून त्यामुळे मेंदूतील उतींचा नकाशा तयार केला जातो. कमी तीव्रतेच्या सूक्ष्मलहरींचा वापर काही मिनिटांत मेंदूची त्रिमिती प्रतिमा मिळवण्यासाठी केला जातो. मेंदूतील रक्तस्राव, गाठ यांसारख्या समस्या यातून उलगडता येतील.

दरवर्षी एड्स, क्षय व मलेरिया या तीन रोगांनी जेवढे एकूण लोक मरतात, त्यापेक्षा जास्त लोक पक्षाघाताने प्राण गमावतात. त्यावर वेळीच उपचार या यंत्रामुळे शक्य होणार आहेत. जर वेळीच उपचार मिळाले नाही तर दर तासाला तुमचा मेंदू ३.६ वर्षांइतका जुना होत जातो.