पुरेशी झोप घेतल्याने कामाच्या क्षमतेत वाढ होत असल्याचे एका वैद्यकीय संशोधनात आढळून आले आहे. कॅनडातील कॅलगरी विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या या अभ्यासाचे निष्कर्ष अमेरिकन जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहेत.  कामाच्या वाढलेल्या वेळा, रात्रपाळीत काम करावे लागणे, ताणतणाव, दूरवरचा प्रवास, झोपेसंबंधी विकार अशा अनेक कारणांमुळे अनेक जणांना पुरेशी झोप मिळत नाही. त्यांचे दुष्परिणाम केवळ शरीरावरच नाही तर मानसिक आरोग्यावरही होताना दिसतात. सतत कमी झोप मिळाल्याने वाहन चालवताना त्रास होणे, कामाच्या क्षमतेवर परिणाम होणे अशा लक्षणांबरोबरच स्थूलपणा, मधुमेह आणि अन्य विकार जडतात.

जेव्हा आपल्याला माहीत असते की पुढील काही काळ पुरेशी झोप मिळणे शक्य नाही, त्याच्या आधी जर नेहमीपेक्षा अधिक वेळ झोपून ‘झोप साठवून ठेवली’ तर पुढील काळात कामाच्या क्षमतेत वाढ होते असे या संशोधनात दिसून आले. समजा तुम्ही दुसऱ्या दिवशी पूर्ण रात्र जागून अभ्यास करणार असाल तर त्याआधीच्या रात्री थोडी जास्त झोप घेतली तर दुसऱ्या दिवशीच्या कामावर सकारात्मक परिणाम होतो, असे यातून दिसून आले.

संशोधकांनी त्यासाठी सामान्य झोप घेणाऱ्या व्यक्ती आणि अपुरी झोप मिळालेल्या व्यक्ती यांच्यात तुलनात्मक अभ्यास केला. त्यात असे दिसले की ज्यांनी नेहमीपेक्षा थोडी जास्त झोप घेऊन ‘विश्रांतीची साठवणूक’ केली आहे त्यांना पुढील काही दिवस काम करताना कमी थकवा जाणवला.

या अभ्यासाचा उपयोग रात्रपाळीत काम करणारे कर्मचारी, संरक्षण दलांतील कर्मचारी, लांबचा प्रवास करावा लागणारे वाहनचालक, डॉक्टर, खेळाडू आदी गटांना होईल, असे संशोधकांचे मत आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)