हानीकारक जिवाणू किंवा इतर रोगकारकांची लागण झाल्याचे अचूक आणि लवकर निदान करण्याची पद्धत वैज्ञानिकांनी विकसित केली आहे.

अमेरिकेतील टेक्सस विद्यापीठ सॅन अ‍ॅँटोनियो येथील संशोधकांनी संसर्गाची तीव्रता ओळखण्याची ही पद्धत विकसित केली आहे. त्यांनी रक्तातील पांढऱ्या पेशीतील विकरांसह जोडला जाणाऱ्या एका रेणूची निर्मिती केली आहे. हा रेणू संसर्गाची लागण दर्शविण्यासाठी विद्युत प्रवाह निर्माण करतो. या रेणूंना चाचणीच्या पट्टीवर ठेवण्यात येते.

संक्रमित शारीरिक द्रव्यांशी संपर्क झाल्यानंतर या पट्टीला संगणकाशी जोडले जाते. यावेळी विद्युत रासायनिक प्रतिक्रिया संसर्गाची तीव्रता संगणकावर दर्शवतात. संसर्ग चाचणीच्या सध्या वापरण्यात येत असलेल्या पद्धतीत संक्रमित शारीरिक द्रव्ये चाचणी पट्टय़ांवर घेतली जातात. यात संसर्ग झाले असल्यास पट्टीचा रंग बदलतो. संसर्ग चाचणीची ही पद्धत अस्पष्ट असून ही एक मोठी समस्या आहे, असे टेक्सास विद्यापीठ सॅन अ‍ॅँटोनियो येथील प्राध्यापक वॉल्डेमर गॉरस्की यांनी सांगितले. निव्वळ रंग किती गडद आहे हे पाहून या पद्धतीत संसर्गाच्या तीव्रतेचा निर्णय घ्यावा लागतो. द्रव्यांमधील रक्त अपारदर्शक असल्याने साधारणत: एक तृतीयांश नमुन्यांची तपासणी केली जाऊ शकत नाही, असे संशोधकांनी सांगितले. इतर पद्धतींमध्ये शरीरातील द्रव्यांच्या नमुन्यांचे परीक्षण सूक्ष्मदर्शक यंत्राखाली करून ल्यूकोसाइट्स म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशींची गणना केली जाते. ही पद्धत वेळकाढू असून यासाठी उच्च प्रशिक्षित लोकांची गरज असते. नव्या पद्धतीमुळे संसर्ग किती तीव्र आहे याचे निदान करण्याची प्रक्रिया लवकर होणार असल्याचे टेक्सास विद्यापीठ सॅन अ‍ॅँटोनियो येथील सहायक प्राध्यापक सॅस्टन मॅक्हार्डी यांनी सांगितले.