Health Special वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये आपल्याला लक्षात येते की, काही तरी गडबडले आहे. आपल्या आजूबाजूला असलेला वयस्कर मंडळी भान हरवल्यासारखं वागू लागली आहेत. पण अनेकदा आता काय वयं वाढलं असं म्हणून आपण दुर्लक्ष्य करतो. तसं न करता गरज असते ती अशा वेळी त्यांच्या आरोग्य चाचण्या करण्याची. कारण चाचण्या वेळीच झाल्या तर वेळीच केलेल्या उपचारांनी रुग्ण बरा होण्याची शक्यता सर्वाधित असते. स्मृतिभ्रंश या विकाराच्या बाबतीत ते कसं ओळखायचं हे आपण आजच्या लेखात पाहू.

लताताई आमच्या शाळेतल्या अतिशय विद्यार्थीप्रिय शिक्षिका. त्यांचे गणित शिकवणे अप्रतिम आणि गेल्या अनेक वर्षांच्या विद्यार्थ्यांची नावे लक्षात ठेवणेही कमालीचे. काल त्यांचा एक लाडका विद्यार्थी सुहास त्यांना बँकेत भेटला. सुहासने स्वाभाविकच विचारले,”बाई, ओळखलेत ना?” त्या म्हणाल्या, “हो, अरे कालच घरी येऊन गेलास ना?” सुहासला हा धक्का होता. चेक भरताना बाईंची गडबड होते आहे, असे त्याच्या लक्षात आले. त्यांना दहा हजार रुपये हे अंकात लिहिताच येईनात. एक शून्य जास्त लिहिले. बँकेच्या कॅशियरशी हुज्जत घालू लागल्या, की त्यालाच कसे कळत नाही आणि तो कसा त्यांच्या विद्यार्थ्यासारखा आहे!

हेही वाचा – स्क्रीनकडे बघून डोळे सतत कोरडे होतात? फक्त ‘हा’ एक व्यायाम करा, ‘ड्राय आय सिंड्रोम’ची समस्या झटक्यात दूर; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

मनात वाढलेला गोंधळ

बाहेर पडल्यावर बाई गोंधळल्या. उजवीकडे जायचे की डावीकडे ते त्यांना कळेना. सुहासने कसेबसे समजावून त्यांना त्यांच्या घरी नेले. घरी सगळे शोधायला बाहेर पडत होते. त्यांचा मुलगा म्हणाला, त्या रोज बँकेत जातात आणि पैसे काढायचा प्रयत्न करतात. आपण आदल्या दिवशी गेलो होतो, हे त्या पूर्णपणे विसरलेल्या असतात! सुहास व्यथित मनाने घरी परतला. आपल्या लाडक्या शिक्षिकेची काय ही अवस्था? असे त्याला वाटत राहिले.

स्मरणशक्तीवर परिणाम

अल्झायमर डिमेन्शियामध्ये स्मरणशक्तीवर सगळ्यात आधी परिणाम होतो. सुरुवातीला नुकतीच घडून गेलेली गोष्ट विसरायला होते, जसे की, दिलेला निरोप, घडलेली घटना म्हणजे अगदी आपण जेवलो की नाही ते, तसेच कोणी भेटायला आले असेल तर ते. हळूहळू जुन्या घडलेल्या गोष्टीसुद्धा स्मरणशक्तीच्या पडद्याआड जाऊ लागतात; अगदी आपल्या मुलांची नावे, आपली शाळा, आपल्या घराचा पत्ता अशा कायम लक्षात असलेल्या गोष्टीसुद्धा स्मृतीत राहत नाहीत. आपल्या लक्षात राहत नाही हे न पटून राग येतो, ज्या गोष्टी आपण पूर्वी सहजपणे करत होतो त्या करताना आपल्याला हल्ली त्रास होतो हे सुरुवातीला लक्षात येते, नंतर नंतर तेही लक्षात येत नाही.

बौद्धिक क्षमतांवर परिणाम

पूर्वीची आपली कौशल्ये हळूहळू नष्ट होतात. मग स्वयंपाकात चूक होते, हिशेब ठेवण्यात चुका होतात, एखाद्या यंत्राची दुरुस्ती करताना गडबड होते. एखाद्या कृतीची योजना करणे आणि ती कार्यवाहीत आणणे ही गोष्ट जमेनाशी होते. हळूहळू भाषेवरही परिणाम होतो, नक्की शब्द आठवत नाही, काय म्हणायचे ते स्पष्टपणे सांगता येत नाही. ‘हे.. ते, त्याचे, कसे’ असे काही बाही बोलले जाते. जेव्हा या सगळ्या बौद्धिक क्षमतांवर परिणाम होतो तेव्हा बहुतेक वेळा अल्झायमरचा आजार असतो. एमआरआय केल्यानंतर विशिष्ट बदल विशिष्ट ठिकाणी आढळून येतात त्यावरून निदान करता येते व आवश्यक ते उपाय करता येतात.

वसंतराव गेले अनेक महिने एकटे एकटे बसतात, कोणाशी बोलत नाहीत, पूर्वी मित्रांशी गप्पा मारणे, फिरायला जाणे, अशा गोष्टी उत्साहाने करणारे ते आता घराबाहेरच पडत नाहीत, अतिशय उदास असतात, एखादे वेळेस म्हणतात की जगून काय फायदा आहे? त्यांना ब्लडप्रेशर आणि डायबिटीस असे दोन्ही आजार आहेत. पूर्वी एकदा चक्कर येऊन रस्त्यात पडले होते तेव्हा डॉक्टरांनी सांगितले, की मेंदूचा रक्तपुरवठा बहुधा तात्पुरता खंडित झाला असावा. वसंतराव असे का वागत आहेत हे लक्षात न येऊन त्यांना घरचे लोक सायकियाट्रीस्टकडे घेऊन गेले. डिप्रेशनचे निदान तर झालेच, पण त्याबरोबरच डॉक्टरांनी एमआरआय स्कॅन आणि बौद्धिक क्षमतेच्या विविध चाचण्या करायला सांगितल्या. एमआरआयमध्ये मेंदूच्या रक्तपुरवठ्यासंबंधी जी माहिती मिळाली आणि चाचण्यांचा जो निकाल आला, तो पाहून डॉक्टरांनी निदान केले, व्हॅस्क्युलर डिमेनशिया. यामध्ये ब्लडप्रेशर, डायबिटीस, कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असणे, हृदयरोग अशा अनेक कारणांमुळे मेंदूच्या रक्तपुरवठ्यावर वेळोवेळी होणारा जो परिणाम असतो, तो व्यक्तीच्या वागण्यामध्ये, स्मरणशक्तीमध्ये तसेच इतर बौद्धिक क्षमतांमध्ये बदल घडवून आणतो आणि त्यातून व्हॅस्क्युलर डिमेन्शिया होतो.

योग्य नियंत्रण आणि उपचार

सर्व शारीरिक आजारांवर योग्य नियंत्रण, तसेच उपचार केल्यास रुग्णाला त्याचा उपयोग होऊ शकतो. Frontotemporal dementia हासुद्धा एक विशिष्ट प्रकार आहे, ज्यामध्ये माणसाच्या स्वभावामध्ये, वागण्यामध्ये बदल होतो. काही रुग्ण अतिशय अलिप्तपणे वागू लागतात, तर काही रुग्ण अनिर्बंध वागू लागतात; उदाहरणार्थ लैंगिक अनिर्बंधता किंवा आरडाओरडा करणे, रागाचे अतिप्रमाण इत्यादी. याचबरोबर या प्रकारात हळूहळू वाचेवर परिणाम होतो, भाषेवर परिणाम होतो आणि नावे विसरणे, योग्य शब्द न आठवणे, असंबद्ध बडबडणे अशा विविध गोष्टी घडतात. याचे निदानसुद्धा योग्य वेळेस चाचण्या करून आणि एमआरआय स्कॅन किंवा पेट स्कॅन करून केले जाते.

हेही वाचा – तुम्ही रोज रात्री जेवल्यानंतर ३० मिनिटे शतपावली कराल तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…

भासमान स्थिती

लुई बॉडी डिमेन्शियामध्ये भास होणे हे महत्त्वाचे लक्षण असते. डोळ्यांसमोर दृश्य दिसणे आणि त्याबरोबर कंपवातासारखी लक्षणे असणे, त्याचबरोबर लक्ष सतत विचलित होणे ही काही वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे आहेत. याचे निदान एमआरआय स्कॅन करून करता येते आणि त्यानंतर योग्य ते उपचार करावे लागतात. बऱ्याच वेळा डिमेन्शियाबरोबरच संशय येणे, कोणीतरी आपल्या वस्तू चोरून नेत आहे असे वाटणे, भास होणे, अतिशय राग येणे किंवा उदास वाटणे, निराश वाटणे, झोप न लागणे अशी अनेक मानसिक लक्षणेसुद्धा दिसून येतात. यासाठी उपचार करणे आवश्यक ठरते. डिमेन्शियाचे उपचार कशा प्रकारे केले जातात हे आपण पुढील लेखात जाणून घेऊ.