डॉ. अश्विन सावंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिखट-आंबट रसानंतर पित्तप्रकोप करणारा रस म्हणजे खारट! खारट रसामध्ये जल व तेज (अग्नी) या दोन तत्त्वांचे बाहुल्य असते. साहजिकच खारट चवीच्या खाद्यपदार्थांचे अतिसेवन  हे शरीरामध्ये पित्त (उष्णता ) वाढवते,यात शंका नाही. आता अतिसेवन म्हणजे नेमके काय? खारट पदार्थांचे अतिसेवन म्हणजे मीठाचे अतिसेवन. मग आपण मीठ अतिप्रमाणात खात आहोत, हे कसे ओळखावे? सरासरी विचार करता दिवसाला २.५ ते ५ ग्रॅम मीठाचे सेवन निरोगी व्यक्तीने करायला हवे,(जेसुद्धा थोडे अधिकच आहे,असे काही पाश्चात्त्य संशोधकांना वाटते.) मात्र २.५ ग्रॅमहून कमी मिठाचे सेवन आपल्याला (भारतीयांना) सोसत नाही व थकवा-अशक्तपणा याचा त्रास होताना दिसतो.

मीठ खाणे कमी केल्यावर शरीर गळून जाते हा मीठ कमी केलेल्या रुग्णांचा नित्य अनुभव आहे. आपला देश उष्ण कटिबंधातला आहे, इथे पारा बहुधा वरच असतो. वर्षातले आठ-नऊ महिने अंगातून घामाच्या धारा वाहात असतात त्या मुंबईसारख्या ठिकाणी तर हवामान दमट आहे. अशा स्थितीमध्ये शरीरामधून घामावाटे मीठ बाहेर फेकले जात असताना  शीत कटिबंधातल्या संशोधकांच्या मार्गदर्शनानुसार मीठाचे सेवन करायचे, हा निव्वळ वेडेपणा आहे. खरं तर मीठाबाबतच नव्हे तर आरोग्य आणि आहारासंबंधित  इतर अनेक विषयांमध्येसुद्धा शीत कटीबंधीय पाश्चात्त्यांच्या संशोधनाला अनुकरणीय समजण्याची घोडचूक आपण का करत असतो, कोणास ठाऊक? आपण नेमके किती सेवन करायला हवे मीठाचे? ते जाणून घेऊ.

हेही वाचा… Health Special: प्रदूषणाचा सामना करण्यासाठी अशी वाढवा प्रतिकारशक्ती

दिवसाला किती मीठ खावे?

उष्ण-दमट हवामानाच्या देशामध्ये अंगामधून दिवसभर घामाच्या धारा वाहत असताना व त्या घामामधून मीठ कमी होत असताना मीठाची शरीराची गरज वाढते. त्यामुळे आपल्याला मीठाचे सेवन फार कमी करुनही चालत नाही, मीठाचे पर्याप्त मात्रेमध्ये सेवन हे व्हायलाच हवे. पण पर्याप्त म्हणजे किती? तर निदान ५ ग्रॅम दिवसातून. वास्तवात दिवसभरातून किती मीठ खावे?या प्रश्नाचे उत्तर व्यक्तीसापेक्ष आहे.

दिवसभर इथे तिथे फिरणार्‍यांना, घामाच्या धारा बरसवणार्‍या लोकल ट्रेमधून प्रवास करणार्‍यांना, उन्हातान्हात वावरणार्‍यांना, मेहनत-कष्टाची कामे करणार्‍यांना कमी मीठ खाऊन चालणार नाही. अशा मंडळींनी सरासरी ७.५ ते १० ग्रॅम मीठ दिवसातून घ्यावे.

अन्यथा तुम्ही एकाच जागेवर बसून काम करत असाल, फारसे चालणे-फिरणे होत नसेल, कष्ट-परिश्रम अजिबात नसतील, फारसा घाम येत नसेल, उष्णतेच्या सान्निध्यात काम करावे लागत नसेल, सूर्यकिरणांचा शरीराशी संपर्क होत नसेल, उलट सभोवतालच्या वातावरणामध्ये थंडावा असेल, दिवसभर बहुतकरुन गारव्यातच वावरायचे असेल तर मात्र मीठाचे सेवन मर्यादेत असायला हवे. ते असावे साधारण ५ ग्रॅम च्या आसपास. अन्यथा मीठाचे अतिसेवन हे पित्तप्रकोपाबरोबरच इतर अनेक विकारांनाही आमंत्रण देते हे लक्षात घ्यावे.

हेही वाचा… Health Special : कंबरेतली ‘डिस्क’ खरच ‘स्लिप’ होते का?

एसी आणि मीठ

मीठाच्या सेवनाचा विचार करताना आधुनिक काळामध्ये ज्या गोष्टीशी मिठाची सांगड घातली पाहिजे,तो म्हणजे एसी अर्थात एअरकंडिशनर (मराठीमध्ये वातानुकूलन यंत्र). असं आहे की आता आपल्या प्रगत (?) समाजामध्ये अनेक लोक एसीमध्ये राहू लागले आहेत. घर एसी, ऑफिस एसी, कार एसी; नाहीच तर झोपण्याची खोली एसी; अशाप्रकारे एसीच्या थंडगार वातावरणामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा एसीमध्ये राहणाऱ्या मंडळींच्या शरीराभोवती थंड हवेचा गारवा असतो. दिवसाचे अनेक तास, कदाचित २४ ताससुद्धा यांची शरीरे थंड हवामानामध्ये असतात. त्यामुळे ही मंडळी उष्ण कटिबंधामध्ये राहत असली तरी त्यांच्या भोवतालचे वातावरण मात्र थंडच असते. साहजिकच यांच्या शरीरामधून फारसा घाम बाहेर फेकला जात नाही. दीर्घकाळ एसीमध्ये राहणाऱ्यांच्या शरीरामधून क्वचित घाम फेकला जातो आणि २४ तास एसीमध्ये राहणाऱ्यांना तर घाम येतच नाही. घाम येत नाही म्हणजे शरीरामधून मीठ बाहेर फेकले जात नाही. शरीरामध्ये मीठाचे प्रमाण अकारण वाढत जाते. साहजिकच यांच्या शरीराची मीठाची गरज कमी होते. त्यामुळे त्यांनी वास्तवात मीठाचे सेवन कमी केले पाहिजे. प्रत्यक्षात मात्र ही मंडळी यांच्या जुन्या सवयींप्रमाणेच आहारामध्ये मीठ टाकत असतात. कारण मागची वर्षानुवर्षे त्यांना जेवढ्या प्रमाणात मीठ टाकण्याची सवय होती, तेवढे मीठ टाकल्याशिवाय त्यांना अन्न रुचकर लागतच नाही. त्यामुळे होतं काय की मीठाचे सेवन जुन्या पद्धतीने अधिक मात्रेमध्ये आणि घामावाटे मीठ शरीराबाहेर फेकण्याचे प्रमाण मात्र घटलेले किंवा पूर्ण बंद झालेले, अशा अनारोग्यकर स्थितीमध्ये शरीर वर्षानुवर्षे एका विचित्र त्रांगड्यात पडलेले असते. काय करायचं त्या शरीराने? जमेल तसा-जमेल तितकं मीठ व अन्य टाकाऊ पदार्थांचा निचरा अधिकच्या मूत्रविसर्जनावाटे करण्याचे आटोकाट प्रयत्न शरीर करत राहते. (अशी अखंड एसीच्या गारव्यात राहणारी माणसे पुन्हा-पुन्हा मूत्रविसर्जन करत राहतात ते याचमुळे) पण “जेणो काम तेणो थाय, दुजा करे तो गोता खाय”, असेच काहीसे होते. जे काम स्वेदग्रंथींनी घामाची निर्मिती करुन करायचे ते मूत्रपिंडांना एकट्याने झेपत नाही आणि शरीरामध्ये मीठाचे (सोडीयमचे) प्रमाण वाढत जाते , जे केवळ उच्च रक्तदाबाला नव्हे तर अनेक पित्तविकारांनाही आमंत्रण देते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health special is there connection between salt and air conditioning hldc asj
Show comments