Health Special आहारातील आवश्यक प्रथिनांचा (प्रोटीन) समावेश करताना अचानक शरीर त्या प्रथिनांना नाकारू लागलं तर? प्रथिनांचा नियमित आहारात वापर सुरू केल्यावर जर पोटदुखी, गॅसेस यासारखे परिणाम दिसू लागले तर? या सगळ्यामुळे प्रथिनांबद्दल अनास्था वाढू लागते आणि ते वर्ज्य करण्याकडे कल वाढतो. पण हे कशामुळे होत असावं, ते आजच्या लेखात जाणून घेऊया

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुरुची आणि समर गेली १५ वर्षे सिंगापूरला राहतात. समरने गेल्या २ वर्षांत शरीरावर उत्तम काम करून साधारण १५ किलो वजन कमी केलंय. त्याला स्वतःच्या शरीराबद्दल उत्तम जाण आहे, मात्र प्रोटीन पावडर आणि एकूण वजन यात अडकल्यावर मात्र आहाराबाबत थोडी गल्लत झाली. “समरने गेले ६ महिने प्रोटीन पावडर घ्यायला सुरुवात केली आणि त्याला खूप केसगळती सुरु झाली” सुरुची सांगत होती… “तरी मी त्याला सांगत होते न विचारता, उगाचच प्रोटीन नको घ्यायला पण तो ऐकत नाहीए. तूच समजावं त्याला”

हेही वाचा – आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी हे पाच पदार्थ ठरतील फायदेशीर, वाचा तज्ज्ञ काय सांगतात..

प्रोटीनची गरज स्त्री- पुरुष दोघांनाही

“मी गेले २ वर्ष प्रयत्न करून वजन आटोक्यात आणलंय. आधी मी प्रोटीनसाठी अंड खायचो. आता अलीकडेच ही प्रोटीन पावडर सुरु केलीय. आणि हे पुरुषांसाठीचं प्रोटीन आहे.” समरने माझ्याकडे मदतीसाठी पाहिलं. – मी त्याला म्हटलं, “मुळात प्रोटीनची आवश्यकता स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही असते. मला असं वाटतंय की, तू आवश्यकतेपेक्षा जास्त प्रोटीन घेतोयस” समर म्हणाला, “मी माझ्या वजनाच्या बरोबर १.५ पॅट इतकंच प्रोटीन घेतोय. त्यात वजन कमी होतं. स्नायू बळकट होतात”

अतिरेकी प्रोटीनचा परिणाम!

मी म्हटलं, “बरोबर आहे. तू आयसोलेट घेतोयस का ?”

“हो, कारण ते बेस्ट आहे ना?” समरने आश्चर्याने म्हटलं.

“बरोबर! समर, तू नियमित व्यायाम करतोस ते उत्तम आहे. पण तुला प्रथिनांसाठी व्हे कॉन्सन्ट्रेट जास्त उपयोगाचं आहे. आयसोलेट बेस्ट असलं तरी तुला त्याची आता आवश्यकता नाहीये. आता तुझ्या आहारातील प्रथिन आणि दोन वेळा घेतलं जाणारं व्हे जवळपास ६० ग्राम इतकं प्रोटीन तुझ्या पावडर मधून मिळतंय, जे ऑन- रेकॉर्ड (पाठ्यपुस्तकी पद्धतीने पाहता) खूप भारी आहे पण प्रॅक्टिकल नाहीये. अतिरेकी प्रोटीन सातत्याने घेत राहिल्यामुळे तुझं टेस्टोस्टेरॉन वाढलंय आणि म्हणून तुझे केस गळतायत.”

जास्तीचं प्रोटिन शरीराबाहेर टाकलं जातं

“पण हे चूक आहे. असं व्हायला नको. म्हणजे हे प्रोटीन चूक आहे, वाईट आहे ” समर न राहवून म्हणाला.

“मी ऑफिसचा स्ट्रेस, झोप याचा परिणाम व्हायला नको म्हणून प्रोटीन घेतो म्हणजे मला जेवणातून थोडं कमी प्रोटीन मिळालं तरी व्हे आयसोलेट विल मॅनेज इट. पण उलटंच सगळं”

“असं नाही होत. आपलं शरीर जास्तीच प्रोटीन शरीराबाहेरच टाकतं.” यावर सुरुची आणि समर दोघेही लक्ष देऊन ऐकू लागले. “आहाराची शिस्त तू गेली २ वर्षे उत्तम पाळतोयस, ज्यातून तुला अपेक्षित परिणाम मिळाले आहेत. आता तुला फक्त आरोग्य सांभाळायचं आहे. तू जितका जास्त ताण घेशील तितकं केसगळती, कमी झोप अशा गोष्टी होत राहतील आणि पर्यायाने उलट परिणाम होऊ लागतील. उलट तुझ्या सोयीनं आहारनियमन केलंस तर तुलाच छान वाटेल. प्रोटीन वाढवताना आहारातील कार्ब्स देखील तितकेच महत्वाचे असतात त्यांचं प्रमाण कमी करून चालत नाही” …समरला माझं म्हणणं पटलं असावं.

हेही वाचा – तुम्ही आणि तुमचे हृदय खरंच तंदुरुस्त आहे का? काय आहे ‘क्वीन्स स्टेप चाचणी’? तुम्हीही एकदा करून पाहा

आवश्यकतेइतकंच प्रोटीन घ्या

“म्हणजे आजपासून प्रोटीन बंद ना ?” सुरुचीने उत्साहाने विचारलं -”मी म्हणाले नाही आयसोलेट नको. काँन्संट्रेट चालेल” त्यावर समरने हुश्श केलं. सुरुचीसारखे अनेक जण प्रोटीन्समुळे केसगळती होते म्हणून प्रोटीनलाच दोष देतात आणि सरसकट सगळ्याच व्हे प्रोटीन्सना वाईट असं लेबल लावलं जात. आपल्याला नेमकं कोणत्या प्रकारचं प्रोटीन हवं आहे किंवा शरीराला कोणत्या प्रकारच्या प्रोटीन्सची गरज आहे हे जाणून त्याप्रमाणे आहारात त्यांचा समावेश केला की, प्रथिनांचं पचन आणि आहारातील समावेश सोपा होऊन जातो. व्हे प्रोटीनचे तीन प्रकार असतात आयसोलेट, काँन्संट्रेट आणि हायड्रोलेज – अनेक खेळाडूंसाठी किंवा ज्यांना लॅकटोज आणि स्निग्धांशाचे अत्यल्प प्रमाण प्रथिनांतून आहारात यावे अशी अपेक्षा असते त्यांना आयसोलेट प्रथिने आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला दिला जातो. शारीरिक तंदुरुस्ती, शारीरिक व्यायाम आणि आहारातील आवश्यकता याप्रमाणे प्रथिनांच्या प्रकाराचा आणि उपलब्धतेचा विचार करून प्रथिनांबद्दलचे आहार-निकष ठरविले जातात.

केवळ केसगळतीच नव्हे तर प्रथिनांमुळे गॅसेस होणे, मुरुमे वाढणे यासारखे परिणाम प्रथिनांच्या अतिरेकी किंवा अचानक वाढीव वापराने दिसून येतात. ते टाळण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच प्रथिने आहारात समाविष्ट करावीत.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health special the body rejects artificial protein why does this happen hldc ssb