राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमानात अचानक बदल होत आहे. हवामान बदलामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सध्या अनेक जण सर्दी, खोकला, तापानं हैराण आहेत. सतत घशाला होणारी खवखव तर डोकेदुखी ठरतेय. घशामध्ये खवखव होण्यासोबतच बोलतानाही त्रास होतो. सारखा खोकला येतो. अशातच हवामानातील बदलांपासून बचाव करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणं फायदेशीर ठरतं ते जाणून घेऊयात सविस्तर… काही आसनं आणि श्वासोच्छवासाच्या पद्धती या ऋतुमानातील बदलांना तोंड देण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

योगतज्ज्ञ कामिनी बोबडे यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

सूर्यनमस्कार : सूर्यनमस्कार तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे. सूर्य नमस्कार हा योगाचा सराव सुरू करण्याचा उत्तम मार्ग आहे. १२ आसनांची ही एकात्मिक मालिका आसन पद्धत आहे. रोज सकाळी सूर्य नमस्कारासोबतच १३ मंत्रांचा उच्चार केल्याने आजार तुमच्या जवळसुद्धा भटकणार नाही आणि सूर्य नमस्कार केल्याने वजनपण कमी होते. दररोज पाच ते दहा वेळा सूर्यनमस्कार केल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. जर तुम्ही सूर्यनमस्काराच्या सगळ्या स्टेप करू शकत नसाल, तर ताडासन करू शकता.

प्राणायाम : कपालभाती आणि भस्त्रिका हे दोन्ही शक्तिशाली, उत्साहवर्धक आणि विषमुक्त करणारे प्राणायाम आहेत, जे पाचक अवयवांनादेखील उत्तेजित करतात, रक्त शुद्ध करतात आणि तुमचे मन स्थिर करतात.

कपालभाती : या प्राणायामामध्ये जलद श्वासोच्छ्वासाचा समावेश होतो, ज्यामुळे फुफ्फुस स्वच्छ होण्यास मदत होते. दम्याच्या रुग्णांसाठी विशेषतः याची शिफारस केली जाते.

कसं करायचं कपालभाती

१. कपालभाती करण्यासाठी प्रथम वज्रासन किंवा पद्मासनात बसा. यानंतर आपल्या दोन्ही हातांनी एक आरामशीर मुद्रा तयार करा. आता हे आपल्या दोन्ही गुडघ्यांवर ठेवा. आतून खोल श्वास घ्या आणि श्वासोच्छवास करताना पोट आतल्या बाजूस खेचा. हे काही मिनिटे सतत करत राहा. हे एकावेळी ३५ ते १०० वेळा करा.

२. जर आपण कपालभातीस प्रारंभ करत असाल तर ३५ पासून सुरुवात करा आणि नंतर वाढवत जा.

३. कपालभाती केल्यानंतर थोडावेळ टाळ्या वाजवल्यास तुम्हाला अधिक फायदे मिळतील.

४. दोन्ही हातांच्या बोटांना ताणून टाळ्या द्या आणि तीन वेळा टाळ्या वाजवा, खांद्यासारखे दोन्ही हात ताणून टाळ्या द्या. किमान १० वेळा या प्रक्रियेची पुनरावृत्ती करा आणि नंतर वेग वाढवा.

५.आता जर आपण दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर ठेवले तर आपल्याला शरीरात कंप जाणवेल. जे टॉक्सिन्स बाहेर पडण्याचे चिन्ह आहे. हे कंप आपल्या मेंदूला चांगले बनविण्यात मदत करेल.

६.असे केल्यावर काही काळ सुखासनात बसून आपल्या शरीराचे निरीक्षण करा. हळू हळू लांब लांब श्वास घ्या आणि श्वास सोडा.

भस्त्रिका प्राणायाम आरोग्याचे फायदे

भस्त्रिका प्रामुख्याने श्वास घेण्याचे संतुलित तंत्र आहे. वात, पित्त आणि कफ या तीन दोषांमध्ये असंतुलन संतुलित करण्यास मदत करते. हे मेंदूच्या ऑक्सिजनसाठी फायदेशीर आहे आणि आरोग्यासाठी इतर बरेच फायदे आहेत. अपचन, वायू किंवा ॲसिडिटीसारख्या पोटाशी संबंधित समस्या असलेल्यांसाठी हा प्राणायामदेखील चांगला आहे. भस्त्रिका प्राणायाम सर्वात महत्त्वाचा प्राणायाम आहे, कारण तो पाचक अवयव आणि चयापचय उत्तेजित करतो.

नाडी शोधन –

शारीरिक व मानसिक ताणतणाव घालवण्यासाठी हे प्राणायाम अधिक महत्त्वाचे आहे. या प्राणायामामुळे श्वसनमार्ग मोकळा होतो आणि रक्ताभिसरण सुधारते.

नाडी शोधन कसे करावे

१. सर्वप्रथम सरळ बसा. पाठीचा कणा ताठ ठेवा आणि खांदे सैल सोडा. चेहऱ्यावर मंद स्मित असू द्या.

२. डावा हात डाव्या गुडघ्यावर ठेवा, तळवा आकाशाकडे उघडा ठेवा किंवा अंगठा व तर्जनीचे टोक एकमेकांना हळूवारपणे स्पर्श करत ठेवावे.

३. उजव्या हाताची तर्जनी आणि मधले बोट यांची टोके भुवयांच्या मध्यभागी ठेवा. अनामिका आणि करंगळी डाव्या नाकपुडीवर आणि अंगठा उजव्या नाकपुडीवर. आपण अनामिका आणि करंगळी डावी नाकपुडी बंद करण्यासाठी किंवा उघडण्यासाठी वापरणार आहोत आणि अंगठा उजव्या नाकपुडीसाठी वापरणार आहोत.

४. तुमचा अंगठा उजव्या नाकपुडीवर ठेवा आणि डाव्या नाकपुडीतून हळूवार श्वास घ्या.

५. आता डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या, नंतर अनामिका आणि करंगळीने डावी नाकपुडी बंद करा. उजव्या नाकपुडीवरील अंगठा काढून उजव्या बाजूने श्वास सोडा.

६. उजव्या बाजूने श्वास घ्या आणि डाव्या बाजूने सोडा. आळीपाळीने एकेका नाकपुडीने श्वास घेणे व सोडणे चालू ठेवा.

हेही वाचा >> पाणी नव्हे, तुम्ही प्लास्टिक पिताय! प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी आरोग्यासाठी हानिकारक; संशोधनातून धक्कादायक माहिती स्पष्ट

सावधगिरीचा सल्ला:

ज्यांना हृदयविकार, उच्च रक्तदाब किंवा कोणतीही आरोग्याची समस्या आहे, त्यांनी सूर्यनमस्कार, कपालभाती किंवा भस्त्रिका करणे टाळावे, पण नाडीशोधन प्रत्येक जण करू शकतो.