डॉ किरण नाबर
Health Special बहुतेक त्वचारोगांमध्ये त्वचेवर  त्या आजाराची पावले किंवा पाऊलखुणा दिसत असतात.  अंगावर पुरळ येते, एखादी  पुळी  येते, एखादा घाव दिसतो, एखादा  व्रण  दिसतो.  परंतु असेही काही आजार आहेत  की,  त्या आजारांमध्ये त्वचेला बऱ्यापैकी खाज येत असते पण त्वचेवर त्याची लक्षणे म्हणजेच एखादी  खट-पुळीही दिसत नाही.  असा रुग्ण जेव्हा  डॉक्टरकडे जातो तेव्हा  डॉक्टरही खाज असल्यामुळे त्याच्या त्वचेची पूर्ण तपासणी करतात. पण त्याच्या अंगावर खाजवल्याचे नखांचे ओरखडे सोडल्यास बाकी काहीच पुरळ दिसत  नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एखाद्याला खरूज असेल तर त्याच्या हाताच्या बेचक्यात, काखेमध्ये,  पाठी – पोटावर, नितंबांवर व जननेंद्रियांवर  लालट खाजऱ्या पुळ्या येतात. एखाद्याला नायटा असेल तर त्याच्या  जांघेमध्ये, नितंबांवर,  कमरेला व अंगावर इतरत्रही गोल गोल  खाजरे चट्टे येतात.  सोरियासिसचा आजार असेल तर अंगावर अभ्रकासारखे पापुद्रे असलेले लालट चट्टे येतात.  ९० ते ९५  टक्के त्वचारोगांमध्ये अंगावर  आजाराचा काही ना काहीतरी पुरावा सापडतो. पण त्वचारोगतज्ज्ञांच्या दवाखान्यात जाणाऱ्या रुग्णांपैकी साधारण पाच टक्के रुग्णांना  अंगावर   काहीच पुरळ नसते, पण अंगाला खाज मात्र बऱ्यापैकी येत असते, हे काय गौड बंगाल आहे?

हेही वाचा >>> घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खरंच फायदेशीर? वाचा तज्ज्ञ काय सांगतात

शरीर हा मनाचा आरसा आहे, असे म्हटले जाते. एखाद्याच्या  चेहऱ्यावरून, देहबोली वरून, त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या हावभावांवरून आपल्याला त्याच्या  मनाचा थोडाफार तरी अंदाज येतो. तर त्वचा ही शरीराचा आरसा आहे असे म्हटले जाते. शरीरातील अंतर्गत घडामोडींचा व बदलांचा त्वचेवर परिणाम होत असतो. हे परिणाम पाहून आपण शरीरातील अंतर्गत घडामोडींचा व बदलांचा अंदाज बांधू शकतो. म्हणजे थोडक्यात त्वचा ही शरीर व मनाचाही आरसा आहे असं म्हटलं तर ते वावगे ठरणार नाही. त्यामुळे त्वचेवर खाज येत असेल व तिथे काहीच पुरळ दिसत नसेल तर तो  त्वचारोग नसून शारीरिक किंवा मानसिक आजारांचा  त्वचेवर होणार  परिणाम असण्याची शक्यता जास्त असते. ते आजार कोणते ते आज आपण जाणून घेऊया.

लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रक्तक्षय- (Iron deficiency anaemia)

रक्तामध्ये हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यास हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात तयार होऊ शकत नाही व त्यामुळे रक्तक्षय होतो. अशा व्यक्तीला प्रचंड थकवा येतो. जरा चालले की, धाप लागते, पायांना सूज येते. तर यापैकी काही जणांना अंगालाही बरीच खाज येते. रक्तातील हिमोग्लोबिन व लोहाचे प्रमाण (serum ferritin) तपासल्यावर या आजाराची कल्पना येते. लोहाची इंजेक्शन्स, गोळ्या किंवा पातळ औषधे सुरू केल्यानंतर अशा व्यक्तीचे हिमोग्लोबिन वाढते व अंगाची खाज देखील कमी होते. हिरव्या पालेभाज्या, लिंबू,मोसंबी,संत्री, बीट, गूळ, विविध प्रकारच्या शेंगा, राजगिरा, ब्रोकोली, डार्क चॉकलेट, कवचाचे मासे (उदा. शिंपले, खेकडे, कोळंबी इ.), काळजी, पेठा, मटण  आदी अन्नपदार्थात लोहाचे प्रमाण भरपूर असते. रक्तक्षय होऊ नये म्हणून आहारात या गोष्टींचे सेवन वाढवणे आवश्यक आहे.

दीर्घकालीन मूत्रपिंड विकार ( Chronic  kidney disease )

मधुमेह, उच्च रक्तदाब या आजारांच्या गुंतागुंतीमुळे तसेच काही विशिष्ट औषधांच्या दुष्परिणामांमुळे दीर्घकालीन मूत्रपिंड विकार होऊ शकतात. मूत्रपिंडांचे काम हे शरीरातील दूषित द्रव्यांचे उत्सर्जन हे असते. ते योग्य प्रकारे न झाल्यास देखील अंगाला खाज येऊ शकते. या आजारात रक्तातील serum creatinine या द्रव्याची पातळी वाढलेली असते. औषधोपचार आणि किंवा जरूर पडल्यास  डायालिसिस करून  क्रिएटिनची पातळी नियंत्रणात आणल्यास  खाज देखील आटोक्यात येऊ शकते.

हेही वाचा >>> यकृत निरोगी ठेवण्यासाठी ‘ही’ योगासने फायदेशीर; जाणून घ्या करण्याची सोपी पद्धत

यकृताचे व पित्ताशयाचे  आजार

पित्ताशयामध्ये खडे झाले व त्यातील एखाद्या खड्याने पित्ताशयाची नलिका बंद केली तर पित्त आतड्यामध्ये जाऊ शकत नाही व ते रक्तामध्ये शिरल्यामुळे कावीळ होते व अंगालाही खाज येते. स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे देखील पित्ताशयाची नलिका  बाहेरुन  बंद होऊन अशा प्रकारे खाज येऊ शकते. दारुड्या व्यक्तीचेदेखील यकृत खराब होऊन त्यालाही अशी अंगभर खाज येऊ शकते.

थायरॉईडचे आजार

थायरॉईड या अंतःस्रावी ग्रंथीचे स्त्राव कमी किंवा अधिक  झाल्यास देखील अंगाला खाज येऊ शकते.

मधुमेह

मधुमेही व्यक्तीच्या रक्तातील साखर नियंत्रणात नसल्यास अशा व्यक्तीच्या अंगाला खाज येऊ शकते.

रक्ताचा किंवा गाठींचा कर्करोग

रक्ताचे कर्करोग (leukemia) तसेच लसिका गाठींचे कर्करोग (lymphoma) या आजारात देखील  रुग्णांना तीव्र खाज येऊ शकते.

औषधांमुळे येणारी खाज

काही प्रतिजैविके, वेदनाशामक औषधे तसेच कर्करोगावरील काही औषधे यामुळे देखील अंगाला खाज सुटू शकते.

चिंता, वैफल्य, औदासिन्य

काही मानसिक आजारांमध्ये देखील अंगाला खाज येऊ शकते. चिंताग्रस्त व्यक्ती, वैफल्यग्रस्त  तसेच  उदास व्यक्ती,  अतिवृद्ध व एकाकी व्यक्ती,  हेकट व शीघ्रकोपी व्यक्ती अशांना कधीकधी अंगावर भरपूर खाज येते. हात जिथे जिथे पोहोचतो, तिथे तिथे नखांचे ओरखडे दिसतात. पण  अंगावर पुरळ तर काहीच दिसत नाही. काही व्यक्तींना तर खाजवणे हा एक मनाचा विरंगुळा होऊन जातो. अशा व्यक्तींची खाज कमी करण्यासाठी  चिंतानाशक किंवा औदासिन्य शामक गोळ्यांचा फार चांगला उपयोग होतो. प्रत्येक वेळी त्वचारोग हेच आपल्या अंगावर येणाऱ्या खाजेचे कारण नसते. त्यामुळे   घरगुती उपचार किंवा औषधांच्या दुकानातून औषधे किंवा मलमे आणून लावत राहू नका. ती अपायकारक ठरू शकतात. तसेच त्यामुळे  अंतर्गत आजाराचे  निदान  होण्यास  उशीर  होऊ  शकतो. यावरून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की खाज ही प्रत्येक वेळी त्वचारोगामुळेच येते असे नाही. कधी कधी या खाजेचे कारण हे आपल्या शरीरात किंवा मनामध्ये दडलेले असते. त्यामुळे अशा खाजेकडे दुर्लक्ष करू नका. ती एखाद्या गंभीर अशा शारीरिक किंवा मानसिक आजाराची नांदी असू शकते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tching all over body but no rash sign of something serious illness hldc zws