आजच्या मुलांच्या शेड्युलकडे एकदा नजर टाकून बघूया. सकाळची शाळा असेल तर उठून शाळेत, शाळा संपल्यावर विविध क्लास आणि अभ्यास. दुपारची शाळा असेल तर सकाळचा एखादा क्लास, मग शाळा, मग पुन्हा क्लास आणि घरी आल्यावर अभ्यास. कोविड महामारीच्या काळात हेच सगळं ऑनलाईन. म्हणजे मुलं सतत ऑनलाईन. या सगळ्यात मुलांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही. मुलं अशीच लोळत पडली आहेत, इकडे तिकडे करतायत हे दृश्य हल्ली दिसतच नाही. अनेक ठिकाणी मुलांसाठी मोठी ग्राउंड्स नाहीयेत, घराबाहेर आणि बिल्डिंगबाहेर खेळायला जागा नसते. मुलं संध्याकाळची खेळत नाहीत. ती स्पोर्ट्स क्लासेसना किंवा कोचिंगला जातात. मैदानं खेळायला उपलब्धच नसल्यामुळे ‘ग्राउंड’ लावण्याची पद्धत रूढ झालेली आहे. म्हणजे पुन्हा त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे खेळायला, हुंदडायला काही संधीच आजच्या जीवनशैलीत राहिलेली नाही. मग अशी मुलं शाळा, अनेक प्रकारचे क्लासेस आणि अभ्यास संपल्यावर थकतात आणि टीव्हीसमोर किंवा मोबाईलच्या स्क्रीनसमोर जाऊन बसतात.

या सगळ्याचे गंभीर शारीरिक, मानसिक आणि भावनिक परिणाम मुलांना भोगायला लागू शकतात. नातेसंबंध, लैंगिकता आणि संभोगाविषयी अतिशय उथळ कल्पना तयार होणं हा त्यातला सगळ्यात मोठा धोका आहेच. त्याचप्रमाणे मुलांच्या शरीरावर याचे विपरीत परिणाम होतात. मुलांची भूक कमी होते. अभ्यासाकडे लक्ष लागत नाही. स्वतःला इजा करून घेण्याकडे मुलं वळतात. ड्रगइतकंच हे भीषण व्यसन आहे. यालाच डीजीपी सिंड्रोम म्हणतात. डी म्हणजे ड्रग्जस, जी म्हणजे गेमिंग आणि पी म्हणजे पॉर्न. आजची अनेक मुलं या तीन गोष्टींमध्ये अडकलेली आहेत. मुलांमध्ये प्रचंड नैराश्य आहे. आत्महत्येचं वय कमी होतंय, बाल लैंगिक शोषणाचं प्रमाण वाढतंय. या सगळ्याचा मुलांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो हे लक्षात घेतलं पाहिजे.

Counselling Be a smart parent
समुपदेशन : स्मार्ट पालकत्व करा
autism spectrum disorder
Health Special: स्वमग्नता (autism spectrum disorder) म्हणजे काय? उपचारांवर लक्ष केंद्रित करा…
what is learning disorder marathi, learning disorder marathi article
Health Special: अध्ययन अक्षमता म्हणजे काय ? अशा मुलांसाठी काय करायचं?
Keep Your Childrens Away From three Habits doctor revealed things that would never allow her as a mother
निरोगी राहण्यासाठी तुमच्या मुलांना ठेवा ‘या’ सवयींपासून दूर; डॉक्टरांनी दिला सल्ला, पाहा VIDEO

आणखी वाचा: Health Special: खऱ्याखुऱ्या तब्येतीसाठी डिजिटल वेलबीइंगचा उतारा

पालकांना मुलांशी बोलायला वेळ नाही ही वस्तुस्थिती झाली आहे. संवाद बहुतेक वेळा फक्त अभ्यासाविषयी असतो. निवांतपणा माणसांच्या आयुष्यातून निघूनच गेला आहे. तो पालकांच्या जगण्यात नाही त्यामुळे मुलांच्याही जगण्यात नाही. कुठल्यातरी अदृश्य ताणात आणि स्पर्धेत सगळे अडकल्यासारखे असतात. पालकही फोनमध्ये अडकलेले असतात. मग ते व्हॉट्सॲप असो, वेब सिरीज असतो नाहीतर पोर्नोग्राफी. जिथे पालकांनाच ऑनलाईन जगातून खेचून बाहेर काढण्याची गरज येऊन ठेपली आहे तिथे मुलांच्या व्यसनाकडे बघायला वेळ आहे का हा प्रश्न उरतोच. दुसरं म्हणजे, आपलं मूल ऑनलाईन व्यसनात अडकलेलं आहे हे ज्यावेळी पालकांच्या लक्षात येतं, तेव्हा ते कठोर पालक होतात.

अशा वेळी कठोर होण्याची नाही, तर मुलांना समजून घेण्याची आणि समजावून सांगण्याची गरज असते. मुलांना विश्वासात घेऊन त्यांना असणारे धोके पालकांनी सांगितले पाहिजेत. पण अनेक ठिकाणी असं होत नाही. पालक शिक्षा करतात. हा प्रश्न शिक्षेने नाही तर संवादाने सुटतो, हे पालकांच्या लक्षात येत नाही. व्यसनात असलेली मुलं शिक्षेला दाद देत नाहीत. शिक्षा केली की मुलांचं व्यसन सुटेल अशा भ्रमात पालक असतात, मग ते व्यसन कुठलंही असो. आणि तसं झालं नाही, शिक्षेनंतरही व्यसन सुटलं नाही की मुलं दाद देईनाशी होतात. मुलं कोडगी बनली आहेत असं लेबल मुलाच्या माथी मारून पालक मोकळे होतात.

आणखी वाचा: मुलांचा स्क्रीन टाईम पालकांमुळे वाढतोय का?

साधी गोष्ट आहे, मुलांना दहाव्या किंवा बाराव्या वर्षी गाडी चालवायला देतो का? त्यांचं लग्न लावतो का? त्यांना शेअर बाजाराचे व्यवहार करायला देतो का? त्यांना एकट्याला शॉपिंग करायला पाठवतो का? नाही. का नाही? कारण या सगळ्या गोष्टी करण्याचं त्यांचं वय नसतं. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ते योग्य वयाचे आहेत की नाही हे आपण बघतो, तर मग मोबाईल हाताळायचं योग्य वय ८ आणि १० वर्ष आहे हे आपण कसं काय ठरवलं? मोबाईल हाताळायला सोपा आहे, सहज उपलब्ध आहे आणि मुलं घरातच असतात, म्हणजे आपल्या समोर असतात म्हणजे ती सुरक्षित असतात का? घरातच, शेजारच्या खोलीत मुलं बसलेली असतील तरीही ऑनलाईन जगात ती एकटी, एकाकी आणि घाबरलेली असू शकतात हा विचार आपण कधी करतो का?

आठव्या, नवव्या, दहाव्या, बाराव्या वर्षी मुलांनी दणकून खेळलं पाहिजे, धम्माल केली पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजेत, भांडणं केली पाहिजेत. पण आधुनिक जगाने आणि तंत्रज्ञानातल्या सगळ्यात महत्त्वाच्या दोन क्रांतींनी, इंटरनेट आणि स्मार्ट फोन्सनी मुलांना धोक्यात आणलं आहे. जग जवळ येत असताना आपल्या घरातली चिमुकली मुलं जर आपल्यापासून दूर जाणार असतील, त्यांचं शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य जर धोक्यात येणार असेल आणि या माध्यमांचा योग्य वापर त्यांना समजावून सांगता येणार नसेल, त्यांचा योग्य वापर शिकवता येणार नसेल तर या सगळ्याचा उपयोग काय?