डासांमार्फत पसरणाऱ्या आजारांबाबत राष्ट्रीय पातळीवरील आकडेवारी खरी मानली तर गेल्या काही वर्षांत मलेरियामुळे होणारे मृत्यू रोखण्यात यश येत आहे. मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत घट झालेली नसली तरी देशात गेल्यावर्षी मलेरिया मृत्यूंचे प्रमाण निम्म्यावर आले असून, राज्यातही २०१२ च्या तुलनेत मृत्यूंची संख्या एक तृतीयांशपर्यंत खाली उतरली आहे.

मलेरियाचा मुंबईत २०१० मध्ये उद्रेक झाल्यावर हा आजार रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले गेले. डासनियंत्रण व जनजागृती मोहिमेमधून शहरातील गरीब वस्त्यांमध्ये आजार नियंत्रणासाठी कार्यक्रम राबवले गेले. त्यानंतर मलेरियाबाबतची स्थिती सुधारल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसत आहे. राष्ट्रीय व्हेक्टर रोग नियंत्रण कार्यक्रमानुसार सर्व राज्यांमधून मलेरिया, डेंग्यू आदी  आजारांची माहिती गोळा केली जाते. या माहितीनुसार २०१२ पासून मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत फारसा फरक पडलेला नाही. महाराष्ट्रासह राजस्थान, छत्तीसगढ, गुजरात, मध्य प्रदेश, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, ओरिसा, पं. बंगाल या राज्यांत मलेरियाचा प्रभाव कायम आहे. गेल्या पाच वर्षांची आकडेवारी पाहता देशभरात दरवर्षी सरासरी एक लाख १० हजार, तर राज्यात सुमारे ५५ हजार जणांना मलेरिया झाला होता. मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत कोणतीही घट झालेली नसली तरी २०१५ मध्ये मृत्यूंचे प्रमाण कमी झाले आहे.

२०१२ मध्ये देशात मलेरियामुळे ५१९ जण मृत्यू पावले होते, तर २०१५ मध्ये ही संख्या २८७ वर आली. राज्यातही २०१२ च्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण निम्म्याहून कमी झाले आहे.

मलेरियाचे मृत्यू रोखण्यात यश आले असले तरी गेल्या सहा वर्षांत डेंग्यूचे रुग्ण व मृत्यू या दोन्हींमध्ये वाढ झाली आहे. २०१० मध्ये देशात २८,२९२ रुग्ण आढळले, तर २०१५ मध्ये ही संख्या तब्बल ९९,९१३ वर पोहोचली. डेंग्यूमुळे २०१० मध्ये ११०, २०११ मध्ये १६९, २०१२ मध्ये २४२, २०१३ मध्ये १९३, २०१४ मध्ये १३७, तर २०१५ मध्ये २२० मृत्यू झाले. डेंग्यूचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्रावर आहे. गेल्यावर्षी राज्यासह दिल्ली, पंजाब, हरयाणा आणि केरळमध्ये डेंग्यूची साथ होती.