विशिष्ट ऋतूमध्ये होणाऱ्या विशिष्ट फळांचे सेवन करणे हे आपल्या प्रकृतीच्या दृष्टीने निश्चितच हितकारक ठरते. उन्हाळ्यामध्ये उपलब्ध होणारी द्राक्षे प्रत्येकालाच आवडतात. नाशिकची द्राक्षे ही तर सुप्रसिद्धच आहेत, अशी ही द्राक्षे आपल्याला आरोग्यदायी कशी ठरतात. याचा ऊहापोह करण्यासाठी हा लेखप्रपंच..

द्राक्षांचे व त्यामध्ये असणाऱ्या विविध गुणधर्माचे वर्णन प्राचीन आयुर्वेदीय ग्रंथामध्ये केलेले आढळते. विशेष म्हणजे आजही हे वर्णन तंतोतंत लागू पडते. आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये द्राक्षांपासून बनवलेल्या काही औषधांचेही वर्णन आढळते. द्राक्षांपासून तयार केलेल्या मनुकांचेही अनेक उपयोग आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. आजही अनेक वैद्यकीय व्यावसायिक आपल्या रुग्णांसाठी त्याचा उपयोग करतात.

Ayodhya Ram Mandir Tourism
विश्लेषण: अयोध्येचे राम मंदिर ठरले ‘गेम चेंजर’, भाविकांमध्ये ५०० पटींनी वाढ; का वाजतोय धार्मिक पर्यटनाचा देशभरात डंका?
History of Geography Long lasting regimes For the economic prosperity of the people Water management
भूगोलाचा इतिहास: राजवटींच्या दीर्घायुष्याचे रहस्य?
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?

थंड गुणधर्म

थंड गुणधर्माची आणि स्निग्धता अंगी असणारी द्राक्षे फळांमध्ये उत्तम मानली जातात. गोड रसाची ही द्राक्षे पित्तशामक असतात. नेत्रांना हितकारक असे गुण त्यामध्ये आहेत. द्राक्षे ही गुणधर्माने सारक आहेत. मलावरोधाचा त्रास असणाऱ्यांनी द्राक्षे किवा मनुक्यांचे सेवन करणे उपयुक्त ठरते. विशेषत: लहान मुलांमधील मलावरोध मनुकांच्या सेवनाने कमी होतो. मलप्रवृत्ती साफ होण्यासाठीही द्राक्षांचा उपयोग होतो. द्राक्षे पचायला जड असतात. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी द्राक्षाचा उत्तम उपयोग होतो. आम्लपित्ताचा त्रास ज्यांना होतो अशांनी द्राक्षे, बाळहिरडे हे साखर सारख्या प्रमाणात मिश्र करून त्याचे सेवन केल्यास फायदा होतो. शरीराला बळ देण्याचेही काम द्राक्षे करतात. अतिश्रमामुळे थकलेल्या तसेच अशक्त लोकांना द्राक्षांचे सेवन हे अतिशय आल्हाददायक आणि हितकारक ठरते. अतिशय तहान लागणे या तक्रारीवरही द्राक्षे हे उत्तम औषध आहे. शरीरातील कोणत्याही प्रकारचा दाह (आग) कमी करणारी ही द्राक्षे मूत्रमार्गातील दोषांनाही कमी करतात. खोकला, श्वासविकार अशा विकारांवर याचा उपयोग होतो. काळ्या मनुकांचा काढा हा खोकल्यावर गुणकारी ठरतो.

विविध औषधांमध्ये उपयोग

द्राक्षांचा व त्यापासून बनवलेल्या मनुक्यांचा उपयोग अनेक आयुर्वेदीय औषधांमध्ये केला जातो. द्राक्षासव हे प्रसिद्ध आयुर्वेदीय औषध द्राक्षांपासूनच तयार केले जाते. त्यामध्ये द्राक्षांबरोबर इतर औषधी द्रव्यांचा समावेश असतो. च्यवनप्राश या औषधामध्येही मनुक्यांचा उपयोग केला जातो.

आधुनिक आहारशास्त्रानेही द्राक्षांचे वर्णन केले आहे. त्याचाही थोडक्यात परामर्श घेणे येथे उपयुक्त होईल. १०० ग्रम द्राक्षांमध्ये १६.५ टक्के काबरेहायड्रेट, ७१ के. कॅलरी ऊर्जा असते. २० मिलिग्रॅम कॅल्शिअम असते. द्राक्षांमध्ये ‘अ’, ‘ब’, ‘क’, ही जीवनसत्त्वे असतात. त्याचप्रमाणे लोहही असते. या सर्व वर्णनावरून असे दिसते की, आधुनिक आहारशास्त्रानेही द्राक्षांचे उपयोगित्व मान्य केले आहे, म्हणूनच उन्हाळ्यामध्ये योग्य प्रमाणात पाण्याने धुऊन स्वच्छ केलेल्या द्राक्षाचे सेवन करणे हे निश्चितच लाभदायक ठरते.