जून महिन्याचा तिसरा रविवार हा जगात अनेक ठिकाणी ‘पितृ दिन’, बाबांचा दिवस म्हणून साजरा केला जातो. वास्तविक, मातृ दिन, पितृ दिन, मैत्री दिन असे ‘दिवस’ साजरे करून आपण त्या नात्यांमध्ये एक कृत्रिमता आणतो, असे अनेकांना वाटते. पण आम्हाला व आमच्या मित्रपरिवाराला या पितृ दिनाचे महत्त्व काही विशेष कारणांसाठी वाटते.
एक तर हा पितृ दिन कुठल्याही एका विशिष्ट धर्माशी जोडलेला नाही. व्यक्ती कुठल्याही धर्माची असो, तिचे व तिच्या वडिलांचे नाते खासच असते आणि त्या खास मानवी नात्याला उजाळा देणारा म्हणून हा पितृ दिन महत्त्वाचा.
‘हो, मग त्याच कारणासाठी मातृ दिनही महत्त्वाचा नाही का? पितृ दिनाचं एवढं वेगळेपण कशात आहे?’ आमचे स्नेही आज जरा ‘वादाच्या’ मूडमध्ये होते.
‘वडील व मुले यांच्या नात्यावरची १० गाणी जरा आठवून सांगा. अभिजात आणि आधुनिक साहित्यात ‘वडील’ या विषयावर आधारित कथा, कादंबऱ्या, नाटकं किती आहेत, ते जरा शोधून सांगा बरं.’
आमच्या गुगलीने ते एकदम बावचळले. पण तरीही ते कामाला लागले. मात्र त्यांची गाण्यांची गाडी सात-आठवरच अडकली. साहित्याच्या बाबतीतही चित्र जवळपास तसंच होतं.
‘आता ‘आई’ या विषयावरची गाणी व साहित्य शोधा बरं!’
त्यांना आमचा मुद्दा एकदम लक्षात आला. आणि हे वास्तव आहे. आई-मुलांचे नाते हा सर्व प्रकारच्या साहित्यात जितका लोकप्रिय विषय आहे, तितकाच वडील-मुलांचे नाते हा अभावाने हाताळलेला विषय आहे. याला सन्माननीय अपवाद निश्चित आहेत. पण ते अत्यल्प आहेत. असं का बरं?
याचं कारण कदाचित वडिलांच्या नात्याच्या व्यामिश्रतेत असेल. ‘सांग मला रे सांग मला, आई आणखी बाबा यांतून कोण आवडे अधिक तुला’ हे बालगीत सर्वानी ऐकलं असेल आणि त्यातला पेचही अनुभवला असेल.
आई हे आपल्यासाठी मूर्तिमंत प्रेम असतं, तर वडील म्हणजे धाक, दरारा! वडिलांशी मैत्री, जिव्हाळ्याचे नाते म्हणजे अगदी ‘ऑ’ वडिलांचे मुलांवरील प्रेम बहुतांशी अव्यक्तच असते. मुलांच्या हौसेसाठी आपल्या हौसेला मुरड घालणारे बाबा, त्यांना सर्व उत्कृष्ट मिळावं म्हणून जिवाचं रान करणारे बाबा, मुलाला चांगले बूट घ्यायचेत म्हणून आंघोळीच्या साबणाने दाढी करून काटकसर करणारे बाबा, मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी त्यांना कडक शिस्तीचा बडगा दाखवणारे, पण त्यांच्या आजारपणात तितकेच हळवे होणारे बाबा, कुठल्याही संकटात एखाद्या पहाडासारखे खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे बाबा.. आपलं प्रेम सहजपणे ओठांवर येऊ देत नाहीत, पण म्हणून त्यांच्या हृदयात प्रेम नसतं का?
त्यांच्या हृदयातील प्रेम आपल्यापर्यंत पोहोचलं आहे, हे त्यांना सांगण्यासाठी पितृ दिन साजरा करायचा. हा एक दिवस आपल्या वडिलांबरोबर व्यतीत करा. त्यांच्या पायावर मस्तक ठेवून नमस्कार करा व दिवसाचा प्रारंभ करा. जेवताना पहिला घास तुमच्या हाताने त्यांना भरवा. त्यांच्या आवडीच्या ठिकाणी त्यांना घेऊन जा, त्यांच्याशी गप्पा मारा. बघा, त्यांना किती मनापासून आनंद होईल!
वडील या नात्यातून जसा दरारा व्यक्त होतो तशीच व्यक्तीची ओळखही अधोरेखित होते. आज सामाजिक वास्तव बदलत असलं तरीही वडिलांचा डीएनए मुलांची ओळख पटवतो हे वैज्ञानिक सत्य आहे. अर्थात, आपण काही विज्ञानाचे तज्ज्ञ नाही, आणि या विषयाच्या वैज्ञानिक पैलूपेक्षा त्याचा मानवी पैलू आमच्या विशेष जिव्हाळ्याचा आहे. तो पैलू असा की, वडील जसे अपत्यांना ओळख देतात, घडवतात तशी अपत्येही वडिलांना घडवतात. अपत्याच्या जन्माबरोबर पिताही जन्माला येतो व अपत्य जसजसे मोठे होऊ लागते, त्याचबरोबर पिताही प्रगल्भ होऊ लागतो. त्या दृष्टीने ‘A child is a father of man’ या विधानाला अनेक अर्थछटा आहेत.
पण ‘पितृत्व’ ही काय फक्त शरीराशी निगडित संकल्पना आहे का? म्हणजे, केवळ जन्म देतो तोच पिता, इतका आपला संकुचित दृष्टिकोन आहे का? आपल्या जीवनात आपल्याला पितृतुल्य माया देणारे, तितक्याच अधिकाराने घडवणारे, संकटकाळी धीर देणारे, आणि हे सर्व निरपेक्षपणे करणारे अनेक जण आपल्याला भेटतात. त्यांचे स्थान कुठेही आपल्या वडिलांपेक्षा कमी नाही. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पितृ दिनाइतका सुयोग्य दिन आणखी कुठला असणार?
‘पिता’ या संकल्पनेचा अधिक उदात्त अर्थ महाकवी कालिदासाच्या ‘रघुवंशा’त आढळतो. रघुकुलातील राजा दिलीपाचे वर्णन करताना कालिदास म्हणतो, ‘‘स पिता पितरस्तासां केवलं जन्महेतव:।’’ (रघु, १.२४) ‘‘राजा दिलीप हा आपल्या प्रजेचा खराखुरा पिता होता, त्यांचे खरे वडील तर केवळ जन्मदाते होते. आपल्या मुलांना चांगले काम करण्याची प्रेरणा देणे, त्यांना वाईट कामांपासून रोखणे, त्यांना अन्न-वस्त्र-निवारा यांची ददात पडू न देणे, शिक्षण देणे, संस्कारित करणे आणि अत्यंत मायेने त्यांचे सर्वार्थाने पालनपोषण करणे, हेच पितृत्व ना? मग त्यासाठी शारीरिक जैविक नात्याची मर्यादा कशाला? आजही आपल्या अवतीभोवती असे आधुनिक, दिलीप रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन अनाथ मुलांना ‘आपलं घर’ देत आहेत. अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा भागवतानाच त्यांना मायेची ऊब देत आहेत. त्यांचे आपुलकीने पण डोळसपणे भरणपोषण करीत आहेत. आणि हे सर्व कुठल्याही प्रसिद्धिलोलुपतेतून नाही, तर केवळ मानवतेच्या ऊर्मीतून. अशा एका तरी आधुनिक दिलीपराजाची भेट घेऊन त्याला आदराने वंदन केले, तर पितृ दिन खरोखर सार्थकी लागेल नाही?
जाता जाता : आपल्या आधुनिकतेला स्मरून प्रत्येकाने निदान एक तरी रोपटे सार्वजनिक ठिकाणी लावावे. निसर्ग तुमच्या पितृत्वाच्या या अनोख्या भेटीचे दीर्घकाळ जतन करेल!
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com

येडेश्वरी देवी चरणी लाखो भाविकांचा जनसागर
ram navami 2024 date tithi and shubh muhurat know significance of the birth anniversary of lord shri ram
Ram Navami 2024 : रामनवमीच्या दिवशी पूजेसाठी २तास ३३ मिनिटांचा शुभ मुहूर्त; जाणून घ्या तिथी, मुहूर्त वेळ व पूजा विधी
Welcome New Year with Padwa Yatra in Akola
अकोला : पाडवा यात्रेतून नववर्षाचे चैतन्यमय स्वागत; मतदानाबाबत जनजागृती, पारंपरिक वेशभूषेत तरूणाई
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर