25 February 2021

News Flash

या वेळाचं करायचं तरी काय?

जेवण झालं. सुपारी तोंडात टाकतच शांताबाईंनी टीव्ही चालू केला व त्या सोफ्यावर रेलल्या. आता मधूनमधून टीव्ही पाहात वर्तमानपत्राचं वाचन करणं व नंतर लागली तर डुलकी

| July 31, 2015 01:09 am

जेवण झालं. सुपारी तोंडात टाकतच शांताबाईंनी टीव्ही चालू केला व त्या सोफ्यावर रेलल्या. आता मधूनमधून टीव्ही पाहात वर्तमानपत्राचं वाचन करणं व नंतर लागली तर डुलकी काढणं हा त्यांचा नित्यनियमच झाला होता! त्यांच्या मनात आले, या टीव्हीची किती सोबत आहे. जणू घरात एखादं माणूस वावरतंय. नुसत्या आवाजानेही घरातील शांतता भयाण वाटत नाही. मालिकांमधील पात्रांच्या सुखदु:खात मन रमवून घेता घेता रिकामा वेळ तरी जात राहतो..! वर्तमानपत्राचे वाचनही शांताबाई निगुतीने करत. अगदी त्यातली कोणतीही गोष्ट त्यांच्या नजरेतून सुटत नसे. राजकीय व इतर बातम्या, नवीन सिनेमांच्या जाहिराती, परीक्षणे, अगदी सर्व म्हणजे सर्वच.. अगदी छोटय़ा जाहिरातीसुद्धा त्या मन लावून वाचत. या छंदातून ‘या वेळाचे करायचे तरी काय?’ या प्रश्नातून निदान तास-दोन तासांची सुटका मिळे. टीव्ही, वर्तमानपत्र, शेजारी हे सध्या त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भागच बनले होते. एकटीचे काम ते काय असणार? पण तेदेखील त्या पुरवून पुरवून करत. हो! काम संपवून कुठे जायचेय? त्यापेक्षा सावकाश केले तर वेळ तरी पुरवून वापरला जातो, हाच सातत्याने विचार डोक्यात!
नेहमीप्रमाणेच वर्तमानपत्र वाचता वाचता छोटय़ा जाहिरातीमध्ये एका जाहिरातीवर त्यांची नजर खिळून राहिली. ‘नातवंडांसाठी निवासी, कायमस्वरूपी आज्जी अथवा आज्जी-आजोबा हवेत.’ खाली फक्त फोन नंबर दिला होता. त्यांच्या मनात आले, जाहिरातीतल्या तेवढय़ाच शब्दातून किती माणुसकीचा पाझर झिरपताना दिसत आहे. खरं तर घरातील लहान मुलं सांभाळण्यासाठी कोणी तरी हवं इतकाच त्याचा अर्थ अपेक्षित असावा; पण त्या चार प्रेमळ शब्दांनी शांताबाईंना बेचैन केले. मूलबाळ झालं नाही. अनाथाश्रमातील एखादे मूल सांभाळावे हा विचार करता करता खूप काळ लोटला; पण तो प्रत्यक्षात कधी अवलंबता आलाच नाही. नवऱ्यानेही दोन वर्षांपूवी साथ सोडली. दोघे होतो तोपर्यंत निदान एकमेकासाठी तरी जगतोय असे वाटायचे. आता कशाला.. कशासाठी जगायचे? मरण येत नाही म्हणून मरणाची वाट पाहात का जगायचे? असा प्रश्न रोजच शांताबाईंना पडे. फार श्रीमंत नसल्या तरी जगण्यासाठी पुरेसा पैसा नवऱ्याने ठेवला असल्याने ती काळजी नव्हती; पण काळजी होती ती एकटेपणाची. या ‘एकटेपणाचे’ करायचे तरी काय? हा प्रश्न मात्र दिवसेंदिवस एखाद्या व्रात्य लहान मुलासारखा त्यांना भंडावत होता.
शांताबाईंची नजर त्या जाहिरातीवरून काही हटेना. जेवण होऊन बराच वेळ झाल्याने आता पापण्यांवर वजन ठेवल्यासारखे डोळे जड होऊ लागले होते; परंतु झोप मात्र येईना. ‘आपण फोन करावा का?’ या विचाराने शांतबाईंचे मन सैरभैर झाले.. आणि डोळ्यावर आलेली पेंग खाडकन् उतरली. खरं तर जाहिरातीत आज्जी-आजोबाही म्हटले होते. आपण तर एकटय़ाच! आजोबा गेला ना मला सोडून! कोठून आणू त्यांना? आपल्याच मनाशी त्या काही काळ बोलत राहिल्या. ‘आजोबा’ ही हाक न ऐकताच गेले हो! परत नवऱ्याच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. खरंच किती लहान मुलांचा लळा होता त्यांना; पण नियतीच्या मनात काही पुत्रसुख.. नातवंडांचे सुख द्यायचे नशिबात नव्हते. आधी बाळ होईल म्हणून वाट बघण्यात खूप काळ घालवला. देवधर्म.. डॉक्टरी उपाय काय काय नाही केले? व नंतर दत्तक घेणे ही जबाबदारी वाटू लागली. असं करत करत शेवटी एकटेपणाच साथीला उरला झाले! नुसताच एकटेपणाच नाही, तर इतर नातेवाईक, जवळपासच्या मंडळींकडून होणाऱ्या अपमानाची होरपळही सहन करावी लागली होती; पण ते सहन करत असताना एकमेकाला दोघे तरी होतो. आता मात्र हे एकटेपण सहन होत नाही. त्या परत परत आपल्या मनाशी तक्रार करत राहिल्या. या जाहिरातीचे काय करायचे? करावा का फोन?
सुदैवाने शांताबाईंना चांगल्या तब्येतीची देणगी परमेश्वराने दिली होती. त्याचा उपयोग करून घ्यावा का? असे विचार शांताबाईंच्या मनात सारखे डोकावू लागले. उगीचच त्यांचं मन स्वप्नाळू होऊन अनोख्या नातवंडांशी खेळू लागलं. या अंधारी, एकाकी जीवनाच्या दलदलीतून सुटण्याचा एक आशेचा किरण त्यांना दिसू लागला होता. शेवटी अर्थार्जनासाठी नाही, पण फक्त एकटेपणा घालवण्यासाठी.. छोटय़ा बाळगोपाळांच्या सहवासासाठी हपापलेल्या मनाला दिलासा मिळवण्यासाठी त्यांनी त्या नंबरवर फोन करण्याचे ठरविले. ‘आजोबांना सोडून.. त्यांची मनात माफी मागून.. अगदी त्या एकटय़ा असल्या तरी..!’
नुसत्या विचारानेच त्यांच्या अंगात उत्साह संचारला. त्या देवघरापाशी आल्या. देवासमोर दिवा-उदबत्ती लावून, देवाला नमस्कार करून धडधडत्या अंत:करणाने त्यांनी फोन करायला घेतला. फोन लगेचच लागला. फोनवरील व्यक्ती बाईच होती. तिला त्यांनी जाहिरात वाचून फोन केल्याचे सांगितले व म्हणाल्या, ‘‘मी तुम्हाला हवी असलेली आज्जी.. मी शांताआज्जी बोलतेय!’’
त्यांचे हे वात्सल्यपूर्ण प्रेमळ शब्द ऐकून मग ती व्यक्तीदेखील मोकळेपणाने बोलू लागली,
‘‘माझं नाव नम्रता! मी व माझा नवरा सुहास.. दोघेही नोकरी करतो. माझी दोन लहान मुले आहेत. मला ‘सासुसासरे, आईवडील’ दोघेही नाहीत. माझ्या मुलांना त्यामुळे आजीआजोबांचे प्रेमच मिळत नाही. त्यातून माझ्या नोकरी करण्याने आमचा दोघांचा सहवासही कमी मिळतो; पण वाढत्या महागाईत नोकरी करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आमच्या मुलांचे हाल होतात हो! पाळणाघरात ठेवले तरी आपल्या घरात मोकळेपणाने आज्जी-आजोबांच्या सहवासात मुलं वाढावीत असं खूप मनापासून वाटतं.. म्हणून ही जाहिरात दिली आणि फक्त त्यांच्यासाठीच नाही आम्हालाही घरात कुणी तरी वरिष्ठ.. प्रेमाचं, मायेचं माणूस हवं आहे. जणू आमच्या दोघांच्या आई-वडिलांसारखे! माझ्या मुलांवर प्रेम करणाऱ्या आजी-आजोबांना मलाही छान सांभाळायचं आहे, आधार द्यायचाही आहे व आधार घ्यायचाही आहे. नातेवाईकांचं सौख्य आमच्या नशिबी नाही. म्हणून हे नवं नातं निर्माण करून एखाद्याला आधार देऊन.. त्याचाही आधार होऊन आमच्या मुलांना संपूर्ण घराला सांभाळणारं कोणी तरी प्रेमाचं माणूस आम्हाला हवंय.. आणि त्याच उद्देशाने जाहिरात दिलीय..!’’
शांताबाईंनी स्वत:ची सर्व माहिती नि:संकोचपणे नम्रताला सांगितली. आर्थिक गरजेपेक्षा मानसिक गरजेपोटी फोन केलाय हे वारंवार तळमळीने सांगितले. बोलण्यातील प्रेमाचा ओलावा, तळमळ ऐकून नम्रताचेही मन भरून आले. तिला वाटलं, आपली प्रतीक्षा संपली. यापूर्वी कधीही न भेटलेल्या शांताबाईंच्या बोलण्यातील आर्जवतेनेच तिचे मन भारावून गेले. मनात आले, याच माझ्या मुलांच्या आज्जी! यांच्या हातात माझी मुले अगदी सुरक्षित राहतील. आज्जीचे प्रेम त्यांना नक्कीच मिळेल. न पाहिलेल्या शांताबाईंच्या ठिकाणी तिला तिच्या फक्त फोटोतच पाहिलेल्या, लहानपणी देवाघरी गेलेल्या आईची मूर्ती दिसू लागली. दुसरे दिवशी भेटायचे ठरवून तिने शांताबाईंचा प्रेमाने निरोप घेतला. ‘‘मी तुमची वाट पाहातेय..!’’ असे बोलून शांताबाईंनीही फोन ठेवला.
शांताबाईंना एखादे गोड, शुभशकुनाचे सुंदर स्वप्न पडावे अन् त्यातून जागे होऊच नये असे वाटू लागले. परत परत त्या नम्रताचे त्यांचे झालेले बोलणे आठवू लागल्या. लगेचच देवाला साखर ठेवून, नमस्कार करून त्या मनामध्ये नम्रताच्या घरी जाण्याची तयारी करू लागल्या. आपलं जगणं ‘अर्थपूर्ण.. वात्सल्यपूर्ण’ होणार म्हणून आनंदून गेल्या. एखाद्या तरुण पोरीला लाजवेल असा उत्साह त्यांच्या अंगात संचारू लागला. उरामध्ये नवीन घरामध्ये जाण्याची धडधडही होत होती. आता तब्येतीची काळजी जास्त घ्यायची असं त्या मनाला वारंवार बजावू लागल्या. जणू काही आपलं आणि नम्रताचं बोलणं फायनल होऊन त्या लगेच नम्रताच्या घरी जाणारच आहेत असं..! नम्रताच्या घरी राहायला जायचंय या विचारानं त्यांना घेरलं. नवीन घर, नातवंडे, मुलगा-सून की मुलगी-जावई, काय नातं असेल आपलं नम्रताशी? अशी दिवास्वप्ने बघत त्यांनी दुपार आणि रात्र जागवली.
सकाळी वेळेआधीच नम्रता शांताबाईंकडे आली. नजरेनेच नजरेची ओळख पटली. मागच्या जन्मीची मुलगी असल्याप्रमाणेच पहिल्या भेटीतच दोघींच्या डोळ्यांत नकळत अश्रू आले. नम्रताने वाकून शांताबाईंना नमस्कार केल्यावर तर शांताबाई तिच्या अगदी प्रेमातच पडल्या. नम्रताने तिची सर्व माहिती सांगितली.. ‘लहानपणापासून आईविना दूरच्या नातेवाईकांचे शब्दबाण झेलत वाढलेली पोर होती ती. तिला तिच्या मुलांसाठी मायेचं, हक्काचं माणूस हवं होतं. मोलाने काम करवून घेण्यापेक्षा एक नवं नातं निर्माण करण्याचा तिचा उद्देश उदात्त होता. एकमेकांना आधार.. एकमेकांचा स्वीकार करत तिला आयुष्यभरासाठी तिच्या मुलांसाठी.. तिच्या कुटुंबासाठी सोबत हवी होती. शांताबाईंच्या सौहार्दपूर्ण बोलण्या-वागण्याने तिचे मन जिंकले होते. तिच्या मनाने लगेचच पसंतीची खास पावतीही दिली होती. कोणताही संशय मनामध्ये येत नव्हता. सगळं काही स्वच्छ, नितळ पाण्याप्रमाणे.. स्फटिकाप्रमाणे दिसत होतं. शांताबाईंच्या मनात वाहत असलेला वात्सल्याचा झरा तिच्या घरात घेऊन जायचा होता. त्या वात्सल्यात आपल्या मुलांना न्हाऊन काढायचे होते. व्यवहाराच्या गोष्टी बोलण्यासाठी तिने थोडी सुरुवात करताच शांताबाईंनी तिच्या तोंडावर हात ठेवला व म्हणाल्या,
‘‘मुलगी आणि आईच्या नात्यात व्यवहार बिलकूल आणू नकोस हो! मला तुम्हा कुटुंबाकडून मिळणारे प्रेम.. माझा सार्थकी लागणारा वेळ हाच माझ्या कामाचा मोबदला असेल हो! परमेश्वरकृपेने आवश्यक तेवढा पैसा माझ्याजवळ आहे. आपल्या प्रेमात व्यवहार नको.. आणि माझ्याकडून त्यासंबंधात कधी तुला त्रासही होणार नाही हे नक्की!’’
मग नम्रतानेही जास्त त्याबद्दल ताणून धरले नाही. शांताबाईंच्या बोलण्याचा मान ठेवला. या नवजीवन देणाऱ्या नात्याचा आयुष्यभर जिवापाड सांभाळ करायचा असं स्वत:च्या मनाला ती बजावत राहिली. रक्ताचं नसलं तरी हे एकमेकांना आधार देण्यामधून निर्माण होणारं हे नवं नातं शांताबाईंना दिलासा देत राहिलं. परमेश्वर व चांगली माणसं ही या जगात नक्की आहेत आणि ती नम्रतासारख्यांच्या रूपातून समाजात वावरतात याचा त्यांना साक्षात्कार झाला.
शांताबाई वृद्धापकाळातही आपल्या येणाऱ्या भाग्याकडे आश्चर्याने व डोळे विस्फारत पाहू लागल्या. मानलेल्या लेकीच्या.. नम्रतेच्या घरी जाण्याची तयारी करू लागल्या. ‘या वेळाचे करायचे तरी काय?’ या गहन प्रश्नाच्या उत्तराची प्रतीक्षा आता संपली होती. आता त्यांचा वेळ नक्कीच मनासारखा सत्कारणी लागणार होता..! नव्हे, आता त्यांना वेळ पुरणारच नव्हता!
कल्पना धर्माधिकारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 1:09 am

Web Title: story 13
टॅग Story
Next Stories
1 मेकअपवाले माकड
2 परत पायथ्याशी!
3 स्वप्नातील भारत २०७५
Just Now!
X